डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
भाग ४१
सकाळचे दहा वाजले होते. पुण्यातील सेनापती बापट रोडवर असलेल्या ओरियन टॉवर्सच्या त्या अवाढव्य काचेच्या इमारतीवर सूर्याचे किरण चमकत होते. या इमारतीच्या गेटपाशी एक साधी काळी बाईक थांबली. आलिशान गाड्यांच्या रांगेत ती टॅक्सी थोडी विसंगत वाटत होती, पण त्यावर स्वार झालेला माणूस मात्र कोणाही 'कॉर्पोरेट टायकून'पेक्षा कमी वाटत नव्हता. पांढरा कडक इस्त्रीचा शर्ट, गडद निळी पँट, डोळ्याला चष्मा आणि हातात एक लेदरची फाईल.तन्मय बाईक वरून उतरला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर कमालीचा शांत पण भेदक आत्मविश्वास होता.
त्याच्या मागे साक्षी उतरली. तिने आज अमेयने दिलेले ते महागडे पाश्चात्य पेहराव नाकारून,नर्मदा सदनच्या मातीशी नातं सांगणारी एक गडद जांभळ्या रंगाचा सुती कॉटनचा ड्रेस घातला होता. तिचे डोळे आज झुकलेले नव्हते , त्यात सत्याची एक धार होती.
दोघेही मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचले. तिथल्या धिप्पाड गार्ड्सनी त्यांना ओळखले.
" मॅडम, तुम्हाला इथे येण्यास बंदी आहे. सरांनी स्ट्रिकट ऑर्डर्स दिल्या आहेत." एका गार्डने त्यांचा रस्ता अडवत म्हटले.
तन्मयने शांतपणे आपल्या खिशातून आपले व्हिजिटिंग कार्ड काढले आणि गार्डच्या हातात दिले.
" मिस्टर अमेय जहागीरदार यांना सांगा, जन-आस्था बँकेचे सीनियर ऑफिसर आणि फॉरेन्सिक ऑडिट एक्सपर्ट आले आहेत. विषय स्कायलाईन प्रोजेक्ट मधील ५० कोटींचा आर्थिक घोटाळा आणि प्लँट केलेले खोटे पुरावे हा आहे. जर त्यांनी आम्हाला पाच मिनिटांत आत बोलावले नाही, तर हा रिपोर्ट थेट क्राईम ब्रँचच्या टेबलावर जाईल."
तन्मयचा आवाज इतका खणखणीत आणि अधिकारवाणीचा होता की गार्डच्या अंगावर सरसरून काटा आला. त्याने तातडीने इंटरकॉमवर मेसेज दिला आणि काही सेकंदांतच त्यांना आत जाण्याची परवानगी मिळाली.
दोघेही वेगाने लिफ्टमधून १९ व्या मजल्यावर पोहोचले. अमेयच्या केबिनकडे जाताना ऑफिसमधील कर्मचारी कामाचे नाटक सोडून त्यांच्याकडे आश्चर्याने बघू लागले.
डेटा चोर म्हणून अपमानित करून हाकललेली मुलगी आज एका अनोळखी तरुणाच्या सोबत इतक्या ताठ मानेने परत कशी आली, हे कोणालाच उमजत नव्हते.
तन्मयने कोणत्याही औपचारिकते शिवाय थेट अमेयच्या केबिनचा दरवाजा उघडला. आतलं वातावरण अत्यंत तणावपूर्ण होतं. अमेय जहागीरदार, मिस्टर खन्ना आणि कंपनीचे काही प्रमुख बोर्ड मेंबर्स स्कायलाईन प्रकल्प अधिकृतपणे बंद करण्याच्या आणि निटको कन्स्ट्रक्शन्सच्या प्रस्तावावर सही करण्याच्या अंतिम टप्प्यात होते.
" परवानगी घेतल्याशिवाय आत येण्याची तुमची हिंमत कशी झाली ? "
अमेयचा आवाज रागाने फाटला. त्याने टेबलावरची फाईल बाजूला सारली आणि तो खुर्चीवरून ताडकन उभा राहिला. त्याची नजर साक्षीवर पडली आणि त्याचा पारा चढला.
" साक्षी ! तुला सांगितलं होतं ना की पुन्हा या परिसरात दिसायचं नाही ? तू कोणत्या तोंडाने इथे आली आहेस ? आणि हा कोण माणूस आहे ? "
तन्मयने कोणत्याही संकोचा शिवाय समोरची रिकामी खुर्ची ओढली आणि तो अत्यंत आरामात तिथे बसला. त्याने आपल्या हातातील लेदर फाईल टेबलावर ठेवली. अमेयने आजवर असा उद्धटपणा पाहिलेला नव्हता.
" जहागीरदार साहेब, थोडा संयम ठेवा." तन्मय अत्यंत थंड स्वरात म्हणाला.
" मी इथे साक्षीचा जुना मित्र किंवा वकील म्हणून नाही, तर ओरियन ग्रुपला विनाशापासून वाचवणारा एक ऑडिटर म्हणून आलो आहे. आणि बसण्यापूर्वी तुम्हाला एक प्रामाणिक सल्ला देतो, तुमचा हा राग सध्या खिशात ठेवा, कारण पुढच्या दहा मिनिटांत तो तुम्हाला स्वतःवरच काढायला लागणार आहे. "
खन्नांच्या कपाळावर घामाचे थेंब उमटले. तन्मयची नजर खन्नांकडे वळली आणि तिथे एक उपरोधिक हास्य उमटलं.
" काय खन्ना सर ? तुमच्या मेहुण्याच्या रुद्रा इव्हेंट कंपनीला निटकोकडून जे ५० कोटींचं गिफ्ट मिळालंय, त्याचा हिशोब अमेय सरांना दिला की नाही ? "
तन्मयच्या या एकाच वाक्याने केबिन मधील हवा बदलली. बोर्ड मेंबर्स एकमेकांकडे बघू लागले आणि अमेयचा चेहरा पांढरा पडला. अमेयला ज्या कॉर्पोरेट लॉजिकचा गर्व होता, त्यासमोर आता एका बँकरचं सत्य उभं होतं.
तन्मयने फाईल उघडली आणि पहिला पुरावा अमेयच्या समोर सरकवला. युद्धाचा हा पहिला प्रहार होता.
क्रमशः
सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही
© ® वेदा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा