Login

क्षण मोहाचा, काळ प्रीतीचा भाग ४५

क्षण मोहाचा, काळ प्रीतीचा भाग ४५
डिसेंबर- जानेवारी 2025-26

दीर्घकथा लेखन स्पर्धा

भाग ४५

अमेय जहागीरदारच्या आलिशान केबिनमध्ये आता पश्चात्तापाचा दाट धुक पसरला होता. बाहेरच्या जगासाठी तो आजही किंगमेकर होता, पण या चार भिंतींच्या आत तो एका साध्या मध्यमवर्गीय तरुणासमोर वैचारिकदृष्ट्या नतमस्तक झाला होता. थोड्या वेळाने अमेयने स्वतःला सावरलं. तो खुर्चीवरून उठला आणि तन्मयच्या जवळ आला. त्याने अत्यंत आदराने तन्मयचा हात आपल्या हातात घेतला.

" तन्मय , तुझे उपकार मी शब्दांत व्यक्त करू शकणार नाही. आज तू फक्त साक्षीचं चारित्र्य वाचवलं नाहीस, तर माझे डोळे उघडले आहेत." अमेयचा आवाज आता मवाळ झाला होता.

" मला आजवर वाटायचं की जगात फक्त पैसा, पॉवर आणि ब्रँड्स चालतात. माणसाची किंमत त्याच्या बँक बॅलन्सवरून ठरते, असं मी मानत होतो. पण तुझ्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेने आणि तुझा साक्षीवर असलेला जो अढळ विश्वास आहे, त्याने आज माझ्या अहंकाराला पूर्णपणे हरवलं आहे."

अमेयने एक दीर्घ निश्वास सोडला आणि खिडकीबाहेर पसरलेल्या पुण्याच्या अफाट इमारतींकडे पाहत म्हणाला,

" खरं आहे तन्मय... कॉर्पोरेट जगात हजारो कोटी कमावणं सोपं असतं, पण खरी माणसं ओळखणं खूप कठीण असतं. मी या चकाकणाऱ्या जगाच्या मागे इतका आंधळा होऊन धावत होतो की, माझ्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या माणसाची प्रामाणिकता मी ओळखू शकलो नाही.

ज्या खन्नांना मी माझं सर्वस्व मानलं, त्यांनीच माझं घर जाळायची तयारी केली होती. तन्मय, तुझ्यासारखा मित्र आणि तुझ्यासारखी अफाट बुद्धिमत्ता असणारा माणूस माझ्या सल्लागाराच्या भूमिकेत हवा होता, पण मी तुला ओळखण्यात मोठी चूक केली."

अमेयने त्यानंतर साक्षीकडे वळून तिची मनापासून माफी मागितली.

" साक्षी, मला माफ कर. स्कायलाईन प्रोजेक्ट अजूनही तुझाच आहे. मी तुला पूर्ण सन्मानाने आणि मोठ्या पॅकेजसह ओरियनमध्ये पुन्हा जॉईन होण्याची विनंती करतो. तू या कंपनीचा कणा आहेस."

अमेयच्या या प्रस्तावावर तन्मयने शांतपणे साक्षीकडे पाहिले.

" साक्षी, निर्णय तुझा आहे. हा तुझा स्वाभिमान आहे आणि करिअरही तुझंच आहे," तन्मयच्या आवाजात कोणतीही सक्ती नव्हती, फक्त एक मोकळीक होती.

साक्षीने अमेयच्या त्या आलिशान केबिनकडे आणि तिथल्या चकाकत्या फर्निचरकडे शेवटचं पाहिलं. काही महिन्यांपूर्वी याच ग्लॅमरने तिला वेड लावलं होतं. अमेयची मर्सिडीज, महागडे परफ्युम्स आणि कॉर्पोरेट पार्ट्या हेच तिला तिचं जग वाटू लागलं होतं.

पण या संकटाने तिला आरसा दाखवला होता. तिला कळाले होते की हे प्रीमियम आयुष्य बाहेरून कितीही सुंदर दिसत असले, तरी आतून ते किती पोकळ, स्पर्धात्मक आणि क्रूर असू शकते. तिथे रक्ताची नातीही पैशांच्या तराजूत तोलली जातात.

" सर, ओरियनने मला खूप काही शिकवलं. व्यावसायिक जगाची ओळख करून दिली," साक्षीने अत्यंत नम्रपणे पण ठाम स्वरात नकार दिला.

" पण अमेय सर, नर्मदा सदनच्या त्या जुन्या गॅलरीत, तन्मयच्या गिटारच्या सुरांत आणि आईच्या साध्या हाताच्या वरण-भातात जी शांतता आहे, ती या १९ व्या मजल्यावरच्या काचेच्या इमारतीत नाहीये. मला माझ्या खऱ्या जगाची आणि खऱ्या माणसांची किंमत आता कळाली आहे. मला आता अशा उंचीवर राहायचं नाहीये जिथे श्वास घेतानाही कोणावर तरी संशय घ्यावा लागतो. मला माफ करा."

तन्मयच्या चेहऱ्यावर एक तृप्त हास्य उमटलं. साक्षीने 'मोहाचा क्षण' त्यागून आयुष्याचं सत्य निवडलं होतं. तन्मय आणि साक्षी केबिन बाहेर पडले. अमेय जहागीरदार आपल्या केबिनच्या खिडकीतून त्या दोघांना ओरियन टॉवर्सच्या गेटमधून बाहेर जाताना पाहत राहिला.

त्याच्याकडे सर्व काही होतं. पैसा, सत्ता, साम्राज्य पण आज त्याला आयुष्यातील सर्वात मोठा धडा मिळाला होता की, विश्वास विकत घेता येत नाही, तो कमवावा लागतो.

खाली आल्यावर तन्मयने आपली लॅपटॉप बॅग खांद्यावर नीट अडकवली. बाईक वर बसला.त्याने साक्षीचा हात आपल्या हातात घेतला. आता कोणतीही घाई नव्हती, कोणताही डेडलाईनचा ताण नव्हता. नर्मदा सदनच्या दिशेने जाताना साक्षीला वाटलं की, रस्ता कितीही छोटा असला तरी सोबत असलेला माणूस जर खरा असेल, तर प्रवास सुंदरच होतो.

क्षण मोहाचा कायमचा संपला होता आणि आता प्रीतीचा आणि समंजसपणाचा तो काळ सुरू झाला होता, जो काळाच्या पडद्याआड कधीही पुसला जाणार नव्हता. वाड्याच्या गेटपाशी पोहोचल्यावर तन्मयने गिटारच्या तारा छेडल्या... आणि पुन्हा एकदा सदाशिव पेठेच्या हवेत आनंदाचे सूर दरवळू लागले.

क्रमशः

सदर दीर्घ कथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही