Login

कुळीथ पिठाचे शेंगोळे Recipe In Marathi

कुळथाचे पौष्टिक शेंगोळे
कुळीथ पिठाचे शेंगोळे


रेसिपी बघण्याआधी आपण त्याचे फायदे जाणून घेऊया.

थंडीच्या दिवसात कुळीथ खाल्लेले चांगले असते. कुळीथ गरम असते त्यामुळे ते थंडीतच खातात. यात अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी मुबलक प्रमाणात आढळते, तर ते शरीरातील दुर्गधीची समस्या दूर करण्यास देखील फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. 

मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. यामध्ये व्हिटॅमिनसह प्रथिने मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असते. यात फायबर भरपूर प्रमाणत असते तसेच कॅलरीजचे प्रमाणही कमी असते.

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवायचे असेल, तर तुम्ही रोजच्या आहारात कुलथीच्या डाळीचा समावेश करू शकता.


साहित्य : कुळीथ पीठ दोन वाट्या, हिरव्या तिखट मिरच्या सात ते आठ, वाटीभर शेंगदाणे, लसूण पाकळ्या दहा बारा, जीरे एक चमचा, हिंग, हळद, मीठ चवीनुसार आणि फोडणीला तेल.


कृती : १) शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या भाजून घेणे.

२) आता मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे हिरव्या मिरच्या आणि लसूण हे थोडं जाडसर बारीक वाटून घेणे.

३) कुळीथ पिठ आधी चाळणीने चाळून घेणे आणि नंतर त्यात चवीनुसार मीठ घालायचे.

४) आता वाटलेले मिश्रण पण कुळीथ पिठात एकत्र करायचे.

५) पीठ मळतो तसे थोडे थोडे पाणी घालून ते सगळे एकत्र मळून घ्यायचे.

६) हाताला तेल लावून पिठाचे लांब शेंगोळे पोळपाटावर वळून घ्यायचे किंवा मग चकलीच्या साच्यात पीठ घालून त्याला जाड शेवची चकती लावून शेंगोळे तयार करून घ्यायचे किंवा मग गोल रिंग सारखे तयार करायचे. तुम्हाला जसे आकार आवडतील तसे तयार करून घ्यायचे.

७) लिंबा एव्हढा पिठाचा गोळा तसाच बाजूला काढून ठेवणे.

८) आता एका मोठ्या पातेल्यात तेल घालून त्यात जीरे, हळद, हिंग फोडणी करून त्यात भरपूर पाणी घालायचे म्हणजे शेंगोळे शिजायला पूरे होईल इतके.

९) पाण्याला चांगली उकळी आली की तयार केलेले शेंगोळे त्यात घालायचे.

१०) बाजूला ठेवलेला पिठाचा गोळा घेऊन त्यात पाणी घालून त्या पिठाचे पाणी तयार करून ते सुद्धा त्या मिश्रणात घालायचे. जेणे करून त्या उकळत्या पाण्याला घट्टसरपणा येतो.

११) हे शेंगोळे शिजायला साधारण अर्धा पाऊण तास तरी लागतो.

१२) शेंगोळे शिजले की नाही हे चेक करण्यासाठी चमच्याने ते तोडून बघायचे किंवा खाऊन बघायचे.

१३) तयार झालेल्या शेंगोळे वरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची.

१४) यात पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार.


अशाच नवनवीन रेसिपीसाठी मला वाचायला विसरू नका.

किचन तुमचे आणि रेसिपी माझी.

रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि मला वाचत रहा.