Login

कुलूप मनावरचं

गावात राहणारे सासू -सासरे शहरात येतात. आणि मग सून त्यांचासोबत कशी वाघते.
चॅम्पियन्स ट्रॉफी -२०२५
लघुकथा फेरी ( संघ -कामिनी )

शीर्षक : कुलूप मनावरचं

गावात राहणारे सोहनजी आणि मेघना, निवृत्तीनंतर शांत आयुष्य जगात होते. मुलगा धीरज शहरात मोठ्या कंपनीत कामाला होता. नुकतंच त्याचं लग्न झालं होतं त्याच कंपनीत काम करणाऱ्या मुलीसोबत. लग्नात फार गाजावाजा नव्हता; पण फक्त मुलाच्या आग्रहामुळे त्यांनी होकार दिला होता.

लग्नानंतर दोन महिन्यांनी मुलाने आईवडिलांना बोलावलं आणि सांगितलं, "काही दिवस आमच्याकडे रहा."


आईवडीलही खूप खूश होते. कारण त्यांना वाटत होतं नवीन सुनेसोबत वेळ घालवता येईल; पण त्यांना ठाऊक नव्हतं की, त्या शहराच्या फ्लॅटमध्ये जग किती वेगळं आहे.


पहिल्या दिवशी सकाळी मेघना उठल्या तर घरात शांतता होती. त्या स्वयंपाकघरात गेल्या आणि चहासाठी तयारी करू लागल्या; पण शहरातलं सगळं काही गावापेक्षा वेगळंच. प्रत्येक वस्तू कपाटाच्या आत बंद!

मेघना स्वतःशीच पुटपुटली, "गावात किती बरं होतं! साखर, पत्ती, भांडी — सगळं डोळ्यांसमोर असायचं. इथे तर कपाटात हात टाकायचा म्हणजे जणू खजिना शोधते आहे असं वाटतंय."

कसंबसं चहाचं भांडं मिळालं, पाणी चढवलं; पण दूध कुठे आहे हे शोधताना फ्रिजचं दार उघडेनासं झालं. कितीही प्रयत्न केले तरी उपयोग नाही झाला.

मेघना म्हणाली, "हा काय चमत्कार आहे? फ्रिज तर उघडतच नाहीये!"

तिने गॅस बंद केला आणि सोहनजींना बोलावलं.

सोहन ते दार पाहून म्हणाले, "अगं हे दार तर बंद आहे. बहुतेक मालानी कुलूप लावलंय."

मेघना थक्क होऊन म्हणाली, "फ्रिजलाही कुलूप? घरात ना मुलं, ना नोकरचाकर. मग कुलूप का? आपल्यासाठीच का?"

दोघं निःशब्द होऊन बाल्कनीत जाऊन बसले. घड्याळात आठ वाजले होते. तरी त्यांना चहा मिळालेला नव्हता.

नऊ वाजून गेले. माला अंग ताणत उठली. सरळ सोफ्यावर पडली. मागून धीरज आला. त्याने स्वयंपाकघरात बघितलं तसं लक्षात आलं की आईने चहा करण्याचा प्रयत्न केलाय; पण तिला दूध सापडलं नाही.

त्याने मालाकडून चावी घेतली. फ्रिज उघडला आणि चहा करून आई-बाबांना दिला.

दोघं गुपचूप चहा पित बसले; पण माला स्वयंपाकघरात जाऊन भडकली.

माला रागाने म्हणाली, "अरे देवा! तुम्ही चहा करायला घेतला होता का? हे भांडं बघा किती काळं झालंय. आई तुम्हाला कोणी सांगितलं होतं स्वयंपाकघरात शिरायला? आमचं खाणं-पिणं धीरजच बघतो. मग तुम्ही यात का पडलात?"

मेघना निःशब्द झाल्या. त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं; पण त्या काही बोलल्या नाहीत.

थोड्या वेळाने सोहनजींची औषधं घ्यायची वेळ झाली. त्यांनी हळूच पत्नीला सांगितलं, "मेघना, धीरजला विचार नाश्त्याला काय आहे? माझं गोळ्या घेणं बाकी आहे."

मेघनाने जाऊन धीरजला विचारले, "बाळा नाश्त्याला काय आहे? नाही तर मी पटकन बटाटा-पुरी करून टाकते. तुझा बाबांना आता उपाशी राहता येणार नाही."

धीरज म्हणाला, "आई काळजी नको करू. मालाने स्विगीवरून ऑर्डर केलंय. आत्ता येईलच."

मेघना चकित होऊन म्हणाली, "ऑर्डर? घरात तर सगळं आहे ना? मी करून देते म्हणते तर..."

तोवर माला बाहेर आली होती.

माला जोरात म्हणाली, "जेवण येतंय तर तुम्ही बनवण्याची काय गरज? किचन घाण होईल आणि आज बाईही नाहीये भांडी घासायला."

थोडयाच वेळात पिशवी आली. मालाने ती टेबलावर ठेवली आणि म्हणाली, "घ्या तुमचं जेवण. पॅकेटमधून खा आणि नंतर टाकून द्या."

सोहनजींनी पॅकेट उघडलं तर आत चाऊमिन आणि मोमोज होते.

सोहनजी म्हणाले, "मला वाटलं भाजी, चपाती असेल. गावाकडे तेच खायची सवय आहे ना."

तशी माला म्हणाली, "बाबा थोडे मॉडर्न व्हा. हे पण चविष्ट असतं. तुम्ही खाऊन बघा."

शेवटी दोघांनी गप्पपणे ते खाल्लं; पण मनात घरच्या जेवणाची आस तगमगत होती.

त्या दुपारी दोघं बाल्कनीत गप्पा मारत बसले होते.

मेघना म्हणाली, "आपल्या गावात कधी पाहुणासुद्धा उपाशी गेला नाही आणि इथे.... दोन कप चहा करायलाही कुलूप उघडावं लागतं."

सोहनजी शांत बसले. मग त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, "आपण जास्त दिवस राहणं योग्य नाही बहुतेक. मुलाच्या संसारात अडथळा नको."

दुसऱ्या दिवशी सकाळी मेघना भाजी चिरत बसल्या होत्या.

माला म्हणाली, "आई मी तुम्हाला नाही सांगितलं होतं ना. माझ्या किचनमध्ये हात लावू नका. मला माझ्या पद्धतीने सगळं लागतं."

मेघना हळूच म्हणाली, "बाळा मी इथलं काहीच बिघडवलं नाहीये. बाबांना औषधं घ्यायची होती म्हणून..."

माला त्यांना थांबवत म्हणाली, "ते माझं काम आहे. तुम्ही यात पडू नका. पुढे तुम्ही फ्रिजला हात लावला तर मला आवडणार नाही."

सोहनजींनी बाल्कनीतून हे सगळं ऐकलं होतं.

तिसऱ्या दिवशी सकाळीही तोच प्रकार... दुधासाठी फ्रिज बंद, औषधांसाठी घरचं जेवण नसायचं. सगळं गडबडीतच... धीरज ऑफिसला निघत होता. तेवढ्यात सोहनजींनी आवाज चढवला.

सोहन म्हणाले, “माला आम्ही पाहुणे नाही आहोत. आम्ही या घरातील मुख्य माणसं आहोत. तरीही जर आमच्यासाठी इकडे जागा नसेल, तर आम्ही परत गावाला निघतो."

तसा धीरज दारातून परतला.

धीरज घाबरून म्हणाला, "बाबा काय झालं? तुम्ही असं का म्हणता?"

सोहन म्हणाले,"आम्हाला सुखसोयी नको; पण किमान आमचं खाणं तरी कुलूपात नको. पोट भरायला रोजरोज ते पॅकेट नको. आम्हाला साध्या सरळ माणसासारखं जगायचं आहे."

मेघनाही म्हणाली, "बाळा आम्ही तुझ्या संसारात भार होऊ इच्छित नाही; पण इथे तू असूनही आम्हाला असं वागणं मिळेल असं मला वाटलं नव्हतं."

धीरज स्तब्ध झाला. त्याने आईबाबांच्या पायावर डोकं ठेवलं.

धीरज म्हणाला, "आई, बाबा... माफ करा मला. मला तुमचं दुःख दिसलंच नाही; पण आता असं होणार नाही."

त्या रात्री धीरज मालाला कठोरपणे म्हणाला, "माला, घर फक्त आपलं नाहीये. माझे आईबाबा माझ्यासाठी सगळं काही आहेत. त्यांना जर इथे त्रास होत असेल तर माझा काही अर्थ नाही.
ते जोपर्यंत इथे आहेत तोपर्यंत मी अपेक्षा करतो की तू नीट राहशील. कारण तुला जसे तुझे आईबाबा प्रिय आहेत तसेच मलाही माझे आईबाबा प्रिय आहेत. त्यांच्याशिवाय मी काहीच नाही."

तशी माला शांत झाली.

दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रिजवरील कुलूप गायब होतं. माला किचनमध्ये मेघनाची मदत करत होती. आज नाश्त्याला आलू-पुरी आणि दही होतं. जेवणाचा सुगंध घरभर पसरला.

सोहनजी हसत म्हणाले, "आज खऱ्या अर्थाने घरात जेवण तयार झालंय."

मालाही लाजून हसली. मनाशी तिने मान्य केले की नातं टिकवायचं असेल तर कुलूप केवळ फ्रिजवरच नाही, तर मनावरचंही काढावं लागतं.

समाप्त
©® निकिता पाठक जोग.
0