Login

कुलूप भाग-2

घराघरातली कथा
कुलूप
भाग -2

" आता आपण थकलो आपल्याकडून काही होत नाही. तोंडपाटीलकी करण्यापेक्षा शांत रहावं मग.

आज कालच्या मुलींना नाही आवडत हो त्यांच्या मध्ये मध्ये केलेलं. त्यांना त्यांच्या मनाने करू दिले तर सगळं करतात व्यवस्थित. थोडं समजून घ्यावे, प्रेमाने काही आपलेही सांगावं, विश्वास ठेवावा आणि कौतुकाची थाप द्यावी बघ कशा अवतीभवती करतील त्या तुमच्या. "

" अवतीभवती करतील म्हणे तोंड पहा त्यांचं. गेला तो काळ. कोणी कितीही बोललं तर ऐकून घेत होतो आम्ही. या तर उलट उत्तर द्यायला एका पायावर तयार. "

" म्हणूनच म्हणतोय आपल्याच हाताने आपला पाणउतारा कशाला करून घ्यायचा? शांत राहावं ना. फक्त डोळे उघडे ठेवावेत कान आणि तोंड दोन्ही बंद. हा सुखाचा मूलमंत्र आहे विभावरीबाई आजचा. "

पण विभावरीबाई काही ऐकायला तयारच नसायच्या.
बस मी सांगेन ती पूर्व दिशा.

विभावरीबाईंचे काही एकीसोबतही पटायचे नाही.
पंधरा दिवस महिनाभर पहिल्या सुनेकडे राहिल्या की तिथे काहीतरी वाजायचे. मग धुसफुस सुरू व्हायची. मग चला दुसऱ्या मुलासूनेकडे. तिथे महिना पंधरा दिवस मोठ्या मुश्किलीने निघायचे परत काहीतरी वाजायचे. मग... मग तिसऱ्याकडे.
वामनराव म्हणायचे, " बरं झालं सहा मुले आहेत म्हणून वर्ष निघून जाते कसेबसे. नाहीतर काय केले असते?
सहा मुलं असून अनाथाश्रमात जावे लागले असते.

विभावरीबाई सोबत वामनरावांनाही जावे लागायचे. नाहीतर त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता ते कुठेही राहत शांततेने. पण काय करणार ना 'गाड्या बरोबर नळ्याची यात्रा.'
पूर्वी घरात कुणा तरी मोठ्या व्यक्तीचा धाक असायचा.
त्याने नुसते डोळे जरी मोठे केले तरी सगळे चिडीचूप व्हायचे.
वातावरण निवळायचे. कुणाची बिशाद नव्हती एक शब्द पुढे बोलण्याची.

आता विभावरीबाईंचे वामन रावांना तेच म्हणणे असते तुम्ही बोलत नाही तुम्ही बोलायला पाहिजे.
पण वामनरावांना ते पटत नव्हते. त्यांचे विचार थोडे वेगळे होते. आपला काळ वेगळा होता. तेव्हा घरात ज्येष्ठांचा आदर होता.शब्दांना किंमत होती. पण आज तसं राहिलेलं नाही.
प्रत्येकाला वाटतं माझंही कुणीतरी ऐकलं पाहिजे. वामनराव म्हणायचे,

"तेही कुठे चुकीचा आहे"

त्यांनाही मत आहे विचार स्वातंत्र्य आहे ऐकून घ्यावे त्यांचेही कधी तेही बरोबर असतात.

प्रत्येकाला आपलं स्वातंत्र्य उपभोगु द्या. तुम्ही त्यांच्यावर जेवढी बंधन घालाल तेवढे ते जास्त मोकाट होतील.

मग मुलं सुना नातू वामनरावांच्या अवतीभवती असायचे त्यांच्याशी आपले विचार शेअर करायचे सल्लाही घ्यायचे कधीकधी. कारण ते आपले विचार कधी थोपवायचे नाहीत कुणावर. विचारलं तरच बोलायचे आपलं मत सांगायचे सल्ला द्यायचे.
मग विभावरीबाई कुरकुर करायच्या तुमचं ऐकतात ना म्हणून तुम्हाला तसे वाटते.
पण स्वतःत बदल करायला मात्र त्या तयार नव्हत्या.

क्रमश: बाकी वाचा पुढील भागात.
भाग -3 मध्ये
©®शरयू महाजन
0

🎭 Series Post

View all