सुलोचनाबाईंनी विनाकारण स्वतःची कामं वाढवून ठेवली होती आणि आता ती होत नसल्याने सुनांवर आगपाखड करत होत्या,
"काव्या, आज ऑफिसला नको जाऊस.."
"का???"
"गहू कोण निवडणार? उद्यासाठी पीठ नाहीये, आजच निवडून, पाखडून आणि दळून आणावं लागेल.."
काव्याच्या मनात संताप उफाळला, पण तिला जायच्या वेळी वाद नको होता, आता जर आपण काही बोललो तर या अजून चार शब्द बोलणार, आज तर ऑफिसमध्ये ऑडिट आहे त्यामुळे ऑफिसला न जाणं शक्यच नाही. काव्या काहीही न बोलता पटकन बाहेर गेली आणि गाडी काढून निघून गेली.
इकडे सुलोचनाबाईंना राग आला, त्यांची बडबड सुरू झाली..
"मेली मी एकटीनेच सगळं पाहावं का? घर माझ्या एकटीचंच आहे का? सगळे माझ्याच भरवशावर राहतात..स्वतः जबाबदारी कधी उचलणार?"
त्यांची बडबड सुरू असतानाच दुसरी सुनबाई आली, तीही तिच्या बुटीकमध्ये जाण्याच्या तयारीत होती,
"कुठे चाललीस? तू थांब घरी, एवढं गव्हाचं काम कर मग जा.."
"शक्यच नाही, आज बुटीकमध्ये एक नवरी येणार आहे, तिला तिचं सगळं फायनल करायचं आहे.."
धाकल्या सुनेने डायरेक्ट तोंडावर नाही सांगितलं. आता मात्र सुलोचनाबाईंच्या तळपायाची आग मस्तकात गेली, हातातले गहू त्यांनी भिरकावून दिले आणि म्हणाल्या,
"गव्हाचं काम नसेल करायचं तर करू नका, उपाशी रहा.मला एकटीला काही पडलेलं नाही"
धाकली दुर्लक्ष करत निघून गेली.
सुलोचनाबाईंच्या संतापाचा आज कडेलोट झाला होता. बुटीकमध्ये गेल्यावर धाकल्या सुनेने मोठया जावेला-काव्याला फोन केला-
"ताई घरात काय चाललंय हे? सासूबाईंनी काय लावून दिलंय गव्हाचं?"
"मला म्हणे जाऊ नकोस, गहू निवड"
"मलाही तेच..आजपर्यंत त्याच करत होत्या ना, मग आता अचानक का?"
"जीवावर आलंय त्यांच्या, पण मी म्हणते कशाला कामं वाढवून ठेवताय त्या? बाजारात चांगले निवडलेले स्वच्छ गहू मिळतात ना? ते नको, कुठूनतरी गावाकडून घेऊन यायचे ज्यात गहू कमी आणि खडेच जास्त असतात, बरं तर निवडले तर लगेच कीड लागणार, मग परत एवढं सगळं चाळत बसा..गेले कित्येक वर्षे हाच कार्यक्रम सुरू आहे, तरी मी कितीदा सांगितलं की नका यांच्या मागे लागू, मार्केटमध्ये चांगला स्वच्छ निवडलेला गहू आणते मी, पण नाही..पाच पन्नास रुपये वाचवण्यासाठी हा इतका खटाटोप.."
"हे रिकामे उद्योग अंगावर ओढवून घ्यायला कुणी सांगितलं त्यांना?"
"हे झालं गव्हाचं... तुम्हाला माहितीये का ताई, काल...."
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा