Login

कुणीही कुणाचं नसतं... भाग -२

नादार होईपर्यंत उदार होऊ नये
जलद कथालेखन स्पर्धा नोव्हेंबर 2025
विषय - अति उदार तो सदा नादार

कुणीही कुणाचं नसतं
भाग -२

विवेकचे किराणा दुकान. दोन मोठ्या एजन्सीज.अगदी शून्यातून विश्व निर्माण केले होते त्याने. भाग्याला पुरुषार्थाची साथ होती.

सुशिक्षित, समंजस वृंदाची साथ लाभली आणि संसार तर सुखाचा झालाच सोबत दुकानातही भरभराट झाली.
ती सुखवस्तू घरातून आलेली मुलगी पण तिने आपला फाटका संसार नेटका केला.
वास्तविक विवेक बहीण भावंडात सगळ्यात लहान पण आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या त्याने यथास्थितीत पार पाडल्या.
आई वडिलांचा सांभाळ बहिणींची माहेरपण सगळंच तो प्रेमाने करत होता.
आता सगळे भाऊ वेगवेगळे राहत होते तरी भावांना विवेक कडून अपेक्षा असायची.
दोन्ही मोठ्या भावाच्या बायका विवेकला घरी बोलवायच्या .त्याच्या आवडीचे पदार्थ करून खाऊ घालायच्या आणि हळूच आपली एक एक मागणी त्याच्यासमोर ठेवायच्या. विवेकचेही मन द्रवत होते.
आपली मुलं तसेच ही मुलं म्हणून विवेकही त्यांचं सगळं करायचा.
कधी काही दुखणे खूपणे आले तर दवाखान्याचा खर्च विवेकच करायचा.
दोन्ही मोठ्या जावा वृंदाचा मात्र काट खायच्या. कारण वृंदा त्यांना अडसर वाटायची.
अशात विवेक ला डोळ्यांचा त्रास व्हायला लागला आणि कितीतरी ठिकाणी उपचार घेता घेता निदान झाले आरपी.
ज्यावर काही इलाज नव्हता विवेकची दृष्टी जवळ जवळ नाहीच्याच बरोबर झाली. तो स्वतःचे स्वतः करू शकत होता एवढेच काय ते समाधान.

डोळ्यांच्या ऑपरेशन साठी म्हणून हैदराबादला ज्यावेळी वीस वीस दिवस दोन-तीन वेळा राहावे लागले त्यावेळी घरच्या लोकांनी फायदा घेतला.
दुकानातील नोकरांना फितवून दुकानात गड्डा पाडला.
नंतर एक खड्डा बुजवायला जायचं तर दुसरा गड्डा तयार व्हायचा.

एवढ्या मोठ्या व्यापात लक्षात आले नाही पण ज्यावेळी लक्षात आले त्यावेळी परिस्थिती हाताबाहेर गेलेली होती.

अगदी पहिल्यावेळी जेव्हा तो उपचारासाठी गेला त्याचवेळी आजूबाजूची दुकानदार त्याला सतर्क करत होते की विवेक दुकान बंद ठेव पण दुसऱ्याच्या भरोशावर सोडू नको.
पण विवेक चा त्याच्या भावांवर अतिविश्वास.तोच नडला.
त्यांनी संधी साधून घेतली.

आता विवेकची मुलं उच्च शिक्षण घेण्याच्या मार्गावर होती. दोन्ही मुले हुशार.त्यांची शिक्षणा कशी करायची हा मोठा प्रश्न विवेक वृंदासमोर ठाकला होता.

दोघाही भावाच्या मुलांनी आपले नीट करून घेतले होते. त्यांना काय आयतं धबाड मिळालं होतं. एकाने सावकारी सुरू केली होती तर दुसऱ्यानी कपड्याचे दुकान टाकले होते.
विवेकच्या एजन्सी ही बंद पडल्या होत्या .दुकानातही तेवढासा माल शिल्लक नव्हता. जेमतेम तोंड मिळवणी व्हायची पण मोठे खर्च कशातून करणार?
जवळ पुंजी ही काहीच नव्हती.

आता विवेकला वृंदाचे शब्द आठवायचे. पण वेळ निघून गेलेली होती.

पुढे काय घडते? बघूयात पुढील भागात