Login

कुपीतलं गुपित | भाग १

जाणून घेऊया अद्वैतने घरी आणलेल्या छोट्याश्या अत्तराच्या कुपीतलं गुपित...!
जलदलेखन स्पर्धा ऑक्टोबर 2025

विषय : अकस्मात.

शीर्षक : कुपीतलं गुपित

भाग १

"अरे वेडा आहेस का तू? टाक ती बाटली आधी खाली... काही रस्त्यावर पडलेलं उचलायचं नसतं आईने किती वेळा सांगितले आहे. तू चल घरी... तुझे नावच सांगते आईला."
श्वेता अद्वैतला म्हणाली.

"तू गप गं, काही नाही होत. किती छान बाटली आहे बघ ही अत्तराची छोटीशी. कोणाची तरी पडली असणार. ती उघडून त्याचा वास तरी बघू, नाहीच आवडला तर मी परत फेकून देईन ती. पूर्ण भरलेली आहे ती."
त्याचं ते बोलणं ऐकून ती वैतागून पुढे निघून गेली.

अद्वैत मात्र तिथेच थांबून ती हातातली छोटीशी बाटली उघडून ती नाकाला लावून त्याने आपले डोळे मिटले आणि तो त्या सुगंधात मोहून गेला.

अद्वैत आणि श्वेता दोघे जुळे बहीण भाऊ. त्यांना अजून एक मोठी बहीण होती. जिचे नाव होते रितिका तिचे नुकतेच लग्न झाले होते.

ह्या दोघांचे नुकतेच अकरावीचे कॉलेज सुरू झाले होते. त्यांचे कॉलेज तालुक्याला असल्यामुळे त्यांना एसटीने प्रवास करावा लागणार होता. सकाळी कॉलेजला जाऊन दुपारच्या उन्हात ते एसटीने त्यांच्या गावाजवळ उतरले. तिथून त्यांना त्यांच्या घरापर्यंत काही अंतर चालत जावं लागणार होतं.

एसटीतून उतरून चालत जात असतानाच वाटेत असणाऱ्या त्या पिंपळाच्या झाडा खाली अद्वैतला एक छोटीशी अत्तराची कुपी दिसली. उत्सुकते पोटी त्याने ती लगेच उचलली. आणि तिच्यातील अत्तराचा सुगंध घेऊन ती स्वतः जवळ ठेवून धावत जाऊन त्याने श्वेताला गाठले आणि घरी आईला त्याबद्दल नको सांगायला म्हणून विनवणी करू लागला. तिने देखील त्याच्या बोलण्याला तेव्हा होकार दिला.

घरी पोहोचून ते दोघे फ्रेश होऊन आत जाऊन जेवायला बसले. आईने दोघांपुढे जेवणाचे ताट ठेवले. श्वेता जेवत जेवत आई सोबत गप्पा मारू लागली पण अद्वैत मात्र गप्प होता. तो एकटक ताटाकडे बघत एका हाताने भात कुस्करु लागला.

बोलता बोलता आईच लक्ष त्याच्याकडे गेलं. त्याला तसं करताना बघून आई त्याला बोलू लागली,
"अद्वैत बेटा खा... असं काय करतो आहे भाताला? जेवण आवडलं नाही का? भाजी बघ तुझ्या आवडीची बनवली आहे."

आईच्या बोलण्याला त्याने काहीच उत्तर दिले नाही. तो हळूहळू त्याची मानवर करून आईकडे बघितले. त्याची नजर तिला भयानक भीतीदायक भासू लागली. ती त्याला काय झाल्याचं विचारू लागली. पण तो एक शब्दही बोलला नाही. त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड राग आणि त्याची नजर आग ओकत असल्याचं तिला जाणवू लागलं. ती पुढे काही बोलणार इतक्यात त्याने रागातच
' मला जेवायला नको '
असं म्हणून समोरचं ताट जोरात ढकलून दिलं आणि तिथून उठून खोलीत निघून गेला आणि आतून खोलीचा दरवाजा लाऊन घेतला.

क्रमशः

लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
0

🎭 Series Post

View all