Login

कुपीतलं गुपित. | भाग २

जाणून घेऊया अद्वैतने घरी आणलेल्या छोट्याश्या अत्तराच्या कुपीतलं गुपित...!
जलदलेखन स्पर्धा ऑक्टोबर 2025

भाग २

त्याच्या तश्या वागण्याने त्याची आई आणि श्वेता दोघी सुन्न झाल्या. काही क्षणांसाठी त्यांचा थरकाप उडाला. मग क्षणात सावरून त्या दोघी त्या खोली जवळ जाऊन जोरजोरात दरवाजा पिटू लागल्या. पण आतून त्यांना काहीच उत्तर मिळत नव्हते. त्या दोघींच्या ही डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले. त्याच्या आईने लगेच त्याच्या बाबांना फोन करून शेतातून घरी बोलावून घेतले.

घरी येताच त्यांनी तिला काय झाल्याचं विचारले. त्यावर तिने तिथे घडलेली संपूर्ण घटना त्यांना सांगितली. ते सगळ ऐकून त्याचे बाबा विचारात पडले. अचानक त्याच्या वागण्यात असा बदल झाला म्हणून त्यांना संशय येऊ लागला. त्यांनी जास्त वेळ न दवडता गावच्या गुरुजींना बोलावून घेतले.

काही वेळातच गुरुजी त्यांच्या घरी पोहोचल्यावर त्यांनी त्यांना आधी बाहेरच संपूर्ण घटना समजावून सांगितली. मग ते ऐकून गुरुजींनी श्वेताला प्रश्न विचारला,
"पोरी दुपारी तुम्ही कोणत्या रस्त्याने आलात? आणि वाटेत तुमच्यासोबत काय काय घडले? ते सांग मला सविस्तर."

त्यावर श्वेता त्यांना रडत रडतच सांगू लागली,
"आम्ही एसटीतून उतरून नेहमीच्या रस्त्याने गावात आलो. पण मध्ये त्या पिंपळाच्या झाडाजवळ त्याला एक छोटी अत्तराची बाटली पडलेली दिसली. मी नको सांगितलं तरी ती त्याने उचलली मग मी रागातच पुढे निघून आली. मागे त्याने ती बाटली फेकली की सोबत आणली मला नाही माहित."
इतकं बोलून ती आईला मिठी मारून रडू लागली.

गुरुजी तिचं बोलणं ऐकून विचारत पडले. मग काही वेळ विचार करून ते बोलू लागले,
"त्याचे मागासचे कपडे आणि त्याची ती बॅग इथे घेऊन या... त्यात आपल्याला ती कुपी कुठे सापडते शोधायला हवी. त्याने ती नक्कीच त्याने सोबत आणली असणार..."

त्यांचं ते बोलणं ऐकून त्याच्या आईने आणि श्वेताने लगेच त्याची कपडे आणि बॅग तिथे आणून ठेवली आणि ते सगळे मिळून त्यात शोधा शोध करू लागले. काही वेळ शोधल्यावर त्यांना त्याच्या बॅगमध्ये एका कोपऱ्यात लपवलेली ती छोटीशी बाटली सापडली.


गुरुजींनी ती बाटली हातात घेऊन ती आपल्या दोन्ही बोटांच्या मध्ये उभी पकडून ते डोळे बंद करून मंत्र पुटपुटू लागले.

काही क्षणात त्यांनी त्यांचे डोळे उघडले आणि ते त्या बाटलीकडे पाहत त्यांना बोलू लागले,
"ह्या कुपीतच गुपित दडलेले आहे. त्याने नक्कीच ही कुपी उघडून ह्याचा सुगंध घेऊन ह्यात जे काही होतं त्याला मुक्त केले आहे. आणि त्या मुक्त झालेल्या पिशाच्याने बाहेर येऊन त्याच्याच शरीराचा आसरा घेतला."

क्रमशः

लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
0

🎭 Series Post

View all