Login

कुपीतलं गुपित. | भाग ४ | शेवट

जाणून घेऊया अद्वैतने घरी आणलेल्या छोट्याश्या अत्तराच्या कुपीतलं गुपित...!
जलदलेखन स्पर्धा ऑक्टोबर 2025

भाग ४

ते आत आल्याचं कळताच त्याने त्याची मानवर केली आणि तो रागाने रितिकला बघू लागला. तिच्या डोळ्यांमधून अश्रू वाहू लागले होते. ती स्वतःला सावरून तिच्या भावाला सोडण्यासाठी त्याच्या जवळ विनवण्या करू लागली.

तिथे उपस्थित असलेल्या कोणालाच तिथे काय चालले आहे कळेना झाले. निखिल हे नाव त्यांच्या ओळखीचे होते  म्हणून तो कोण होता ह्याचा काहीसा अंदाज त्यांना आला , पण तो तिथे का आहे हे त्यांना कळेना झाले.

ती हळूहळू पाऊले टाकत त्याच्या जवळ जाऊन बसली. त्याच्या समोर बसून तिने आपले हात जोडून त्याची माफी मागितली. पण तो त्याच रक्ताळलेल्या नजरेने तिच्याकडे पाहत होता.

तो काही बोलणार करणार इतक्यात तिने हातांच्या मध्ये ठेवलेला, मगाशी आत येण्याआधी बाहेर गुरुजींकडून घेतलेला अंगारा लगेच तिच्या भावाच्या अंगावर फुंकला. त्यामुळे तो कळवळून हळूहळू खाली जमिनीवर कोसळला.

तो कोसळलेला बघून सगळे त्याच्या जवळ आले. त्याला उठवून बसवलं आणि त्याच्या चेहऱ्यावर पाणी मारू लागले.

त्याला हळूहळू शुद्ध येऊ लागली शुद्ध येताच. तो अचानक वर बघून जोरात किंचाळू लागला. त्याच्या किंचाळण्याने सगळे घाबरून पुन्हा मागे गेले.

मग ओरडायचा थांबून तो पुन्हा तिच्याकडे बघून हसू लागला. हसत हसत तो तिला भयानक आवाजात बोलू लागला,
"तुला काय वाटलं त्या वेळी सारखं मला संपवून आज परत सुटशील? तू माझ्यासोबत खोटं प्रेमाचं नाटक केलंस  माझ्याकडून पैशे लुबाडून मग जेव्हा माझ्या जवळच सगळ संपलं तेव्हा मला भेटायला बोलावून हीच अत्तराची कुपी विष भरून मला तू आणि तुझ्या नीच प्रियकराने दिली होती ना? ज्यामुळे माझा अकस्मात मृत्यू झाला. तू माझा माझ्या प्रेमाचा अकस्मात जीव घेतलास आता हीच कुपी तुझ्या संपूर्ण परिवारासाठी अकस्मात जीवघेणी ठरणार आहे..."

त्याचं ते बोलणं ऐकून तिच्या आई बाबांच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. त्यांना त्यांच्या मुलीची लाज वाटू लागली. ते दोघे ही त्याच्या समोर बसले.

त्याच्या समोर बसून अद्वैतची आई त्याला बोलू लागली,
"बाळा निखिल... तिच्या वतीने मी तुझी माफी मागते. आमच्या मुलाला सोड. मी तुला वचन देते आम्ही तुला न्याय मिळवून देऊ."

तिचं ते बोलणं ऐकून तो हळवा झाला. त्याच्या डोळ्यात पाणी दाटून आले. तो त्यांचे जोडलेले हात धरून बोलू लागला,
"काकी तुम्ही नका माफी मागू... मुलगा जवळ नसल्यावर एका आईला किती दुःख होते मी पाहिलं आहे. पण ह्या नराधमांनी मला मुक्ती देखील मिळू नाही दिली. माझा जीव गेल्यावर मला त्या झाडाच्या मागे पुरलं आणि मी घर आणि माझ्या आई बाबांना सोडून पळून गेलो असं गावात सर्वत्र सांगितलं. मी तुमच्या पुढे हात जोडतो मला न्याय आणि मुक्ती मिळवून द्या. मी तुम्हाला कधीच त्रास देणार नाही. आणि तुमच्या मुलाला काही नाही होणार कारण ह्या कुपीत विष नाही आता."
तो बोलताना ढसा ढसा रडू लागला. त्याचं बोलणं ऐकून बाकी सगळे देखील रडू लागले.

ते चालू असतानाच रितिका सर्वांच्या मागून त्या खोलीच्या बाहेर पळत असतानाच श्वेताने जाऊन तिला पकडले आणि मग तिच्या वडिलांनी पोलिसांना बोलावून त्यांनी त्यांच्या मुलीची आणि जावयाची कंप्लेंट केली.

पोलिसांनी निखिलचे मृत शरीर तिथून शोधून आधी त्या दोघांना त्याच्या खुनासाठी अटक करून तुरुंगात टाकले. आणि निखिलचे मृत शरीर त्याच्या आई वडिलांच्या स्वाधीन केले आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार होताच त्या अत्तराच्या कुपीतलं गुपित कायमचं संपून गेलं आणि त्याला मुक्ती मिळाली.

समाप्त.

लेखक : चेतन सुरेश सकपाळ.
0

🎭 Series Post

View all