Login

कुरुप कोण?.. भाग - १

The story of a dusky skin girl Minal, who is beautiful in heart and nature, mother-in-law doesn't like Minal but finally realizes who the real ugly is .
कुरुप कोण?...भाग - १


संतोषने पहिली मुलगी बघितली आणि पसंत पण केली.
"मला मुलगी पसंत आहे."
त्याने लगेच तिथेच सांगितले. लगेच पसंती कळवली म्हणून त्याच्या आई आणि भावाला त्याचा राग आला . घरी आल्यावर ते त्याला खूप बडबडले.

" काय पाहिलेस रे तू त्या मुलीत, एक तर पोरगी सावळी, तुझ्यासाठी गोऱ्यापान छप्पन मुली हजर केल्या असत्या".त्याची आई सुलभाताई म्हणाल्या.

" रंगरुपावर काय ठरवायच आई, मुलीचा स्वभाव महत्त्वाचा, मी तिच्या विषयी आधीच चौकशी केली होती, मुलगी स्वभावाला चांगली आहे समजले होते. स्वभाव चांगला, शिकलेली आहे, नाकीडोळी ही चांगली आहे,मग केवळ रंग बघून नाकारायची का?"....

"अरे बाबा ते पण महत्त्वाचे असते, समाजात वावरताना तुला शोभली पाहिजे. तू एवढा गोरा पान, उंचापुरा मुलगा तूला मुलगी पण गोरीच हवी."

" एवढा वेळ काय बोलत होतास मुलीशी म्हणालीस ना तू ..आई अगं आयुष्य भराचा प्रश्न असतो. तिचे विचार जाणून घेत होतो, तिचा स्वभाव विचार आवडले मला म्हणून तर मी होकार दिला लगेच."

संतोषला हे मान्यच् नव्हते, एकापाठोपाठ एक मुली बघायच्या आणि त्यांना नकार देत रहायचं. मोठा भाऊ राकेशच्या लग्नाच्या वेळी हेच झाले होते. पहिलेच स्थळ चांगले असताना अजून देखणी मुलगी मिळेल म्हणून त्याने नाकारले आणि एकापाठोपाठ एक अशा अनेक मुली बघत गेला. दुसऱ्या च्या मुली म्हणजे काय शेतातील भाजी आहेत का?....विनाकारण सहज नाकारायला.

काही कारण नसताना नाकारणे काय असते ते त्याला चांगले माहित होते. त्याच्या बहिणीला पहायला आलेला एक मुलगा बहिणीला पसंत पडला होता पण त्याच्याकडून नकार आला, त्याचे बहिणीला खूप दु:ख झाले होते.

संतोष आपल्या निर्णयावर ठाम आहे हे पाहून त्याच्या आईला सुलभाताईंना खूप दु:ख झाले होते. नाविलाजाने त्यांना त्याच्या हो मध्ये हो म्हणावे लागले, आणि लग्न ठरले.
सुलभाची मोठी सून गोरी होती. तशीच सून तिला हवी होती. येणारी सून तिची नावडती असणार होती.

मिनलासाठी मंगळसूत्र खरेदी करायचे होते म्हणून तिला संतोषने बोलवले होते. आता हा आतापासूनच बायकोची पसंती, मत विचारात घेऊ लागला म्हणून त्याची आई सुलभा नाराज होती.

दुकानात गेल्यावर वेगवेगळ्या डिझाईन सोनार दाखवत होता, सोन्याचे भाव गगनाला भिडले होते ते मिनलला माहित होते तिने त्यातुन अडीच तोळ्याचे मंगळसूत्र पसंत गेले, खूप चांगल्या डिझाईन समोर असूनही तिने तेच पसंत केले.

संतोष बोलला, "पैशाचा विचार करु नको तूला हवे ते घे .पण ती बोलली "हेच डिझाईन मला आवडले आहे".
सोबत आलेल्या जाऊबाईने स्वतः साठी कर्णफुले पसंत केली आणि ती घ्यायलाच लावली.
आता लग्न कुणाचे आहे? ...संतोषच्या मनात आले पण त्याने गुपचूप कर्णफुले खरेदी केली.
कपडे खरेदी करताना पण नवरीच्या शालू पेक्षा भारीतला शालू जावेने पसंद केला.
पण मिनलला मात्र जो शालू आवडला तोच घेतला. कमी किमतीतला पण सुंदर शालू होता.

संतोष बघतच राहिला तेव्हा मिनल बोलली "किंमत जास्त म्हणजे वस्तू चांगली असे नसते, बघताच आपल्याला आवडलेली वस्तू असो वा कापड मग किंमत कमी का असेना अशीच कोणतीही वस्तू मला आवडते. "
संतोष तिच्या विचारांनी प्रभावीत झाला होता.
खरेच कुरुप आणि सुंदर यातला फरक चांगल्या रितीने संतोष ला समजला होता म्हणूनच त्याच्या जीवनात आयुष्यभर संतोष टिकून रहाणार होता.
क्रमशः
©®सौ. सुप्रिया रामचंद्र जाधव
३१/५/२४