कुरुप कोण?.. भाग - २

The story of a dusky skin girl Minal, who is beautiful in heart and nature, mother-in-law doesn't like Minal but finally realizes who the real ugly is .
कुरुप कोण?... भाग - दोन


सुलभा लग्न ठरल्या पासून सगळे पहात होती पण तिला,हे सगळे नाटक आहे माझ्या मुलावर मोहिनी घालण्यासाठी असे वाटत होते. साखरपुडा झाला होता. लग्न दोन महिन्यांनी होते. दरम्यान च्या काळात सुलभाच्या भावाच्या मुलाचे लग्न होते. संतोषने मिनलला पण लग्नाला बोलवले होते. सुलभाला हे समजताच ती त्याच्या वर चांगलीच रागावली होती. मिनलला फोन करुन तिने सांगितले ब्युटीपार्लरला जाऊन ब्लिचिंग, फेशियल करुन घे आणि लग्नाला येताना चांगली साडी नेसून ये. "हो आई" ती बोलली .

लग्नादिवशी मिनलने आकाशी रंगाची काठपदर साडी नेसली होती, लांबसडक मोकळ्या केसांना क्लिप लावली होती. हलकासा मेकअप मध्ये तिचे सोज्वळ सौंदर्य खुलून दिसत होते. पण तिला बघून सुलभाताईने नाक मुरडले
"आली काकूबाई "ती पुटपुटली.

लग्नात मोठी जाऊबाई भरजरी साडी नेसून, भडक मेकअप करून, भरपूर दागिने लेवून इकडून तिकडे मिरवत होती. मिनल वरपक्षाच्या रुममध्ये गेली आणि म्हणाली,
"मामी माझी काही मदत लागली तर सांगा."
तिच्या अशा चांगल्या स्वभावाची पाहुण्यांना ही चुनूक पहायला मिळाली होती.
मामी लगेच म्हणाल्या,
"आमच्या संतोषची पसंत चांगली आहे हो."
त्यावर सुलभाताई ने नाक मुरडले.


दोन महिन्यांनी मिनल आणि संतोषचे लग्न झाले. लक्ष्मीच्या पाऊलांनी मिनलने गृहप्रवेश केला. ती हळूहळू घरकामात मदत करु लागली. तिने पहिला बनवलेला गोडाचा शिरा तिचे सासरे मोहनरावांना खूप आवडला त्यांनी तिची खूप तारीफ केली. हळूहळू तिने सर्वांना आपलेसे केले तरी सासू आणि जाऊबाई तिच्याशी फटकून वागत होत्या. तिच्या जावेला स्वतः च्या गोऱ्या रंगाचा फारच गर्व होता. ती घालून पाडून मिनलला बोलत असायची तरी मिनल तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायची.

लग्नानंतर संतोष मिनलला घेऊन महाबळेश्वरला फिरायला निघाला तेव्हा जाऊबईने टोमणा मारलाच,
"काय पण पदवा पाडत आहेत काळिची....

त्यावर संतोष बोलला,
"वहिनी येथे रंगाचा प्रश्न येतोच कुठे, आता ती माझी पत्नी आहे, माझी जीवनसाथी, तिचा तुला काय त्रास आहे. परत असं बोललेलं मला चालणार नाही."
तिने नाक मुरडले.

मिनल महाबळेश्वर वरून परत येताना प्रत्येकाला काही ना काही वस्तू घेऊन आली होती. सासऱ्यांना स्वेटर, लहान मुलांना खेळणी, जेली चॉकलेटस, भरपूर स्ट्रॉबेरी. सासरे खूप खूश झाले आणि सुनेची तारीफ करू लागले तर लगेच फणकाऱ्याने सुलभाताई बोलल्या "माझ्या लेकाच्या कमाईतूनच घेतले ना सगळे, मग एवढे काय कौतुक."

मोहनराव बोलले, "तुझी मोठी सून पण लग्नानंतर केरळला फिरायला गेली होती तेव्हा तिकडून तिने काय आणले होते तुझ्यासाठी? आठव जरा."
यावर तिथून लगेच सुलभाताई रागाने निघून गेल्या.
©® सौ. सुप्रिया रामचंद्र जाधव
३१/५/२४