कुरूप (भाग १)

माणसाची ओळख त्याच्या दिसण्यावर अवलंबून नसते!
"ऐकलंत का अहोsss विभाताई कडून सांगून आलेलं हे सोहनींचं स्थळ म्हणजे आपल्या कस्तुरीला लागलेली अगदी लॉटरीचं आहे. काय गडगंज श्रीमंत स्थळ सांगून आलं आहे आपल्या लेकीला. तिच्या आयुष्याचं अगदी सोनं झालं बाई."

शालिनीबाई अगदी खुशीत होत्या. त्याला कारणसुद्धा तसंच होतं. त्यांच्या धाकट्या लेकीला शहरातील नामवंत उद्योगपती सोहनी ह्यांच्या एकुलत्या एका मुलाचं श्रेयसचं स्थळ सांगून आलं होतं. आपल्या मोठ्या लेकीला त्या मनानं साधारणचं सासर मिळालं असं त्यांना नेहमी वाटे. तिने प्रेमविवाह केला होता त्यामुळे त्यांचं तिच्या हट्टापुढे फार काही चाललं नाही. पण ती ऐकेल तर शप्पत. शेवटी ह्यांनी मन झुकवली आणि लेकीच्या आनंदाखातर त्यांनी लग्न लावून दिलं होतं पण शालिनीताईंची हौस मात्र राहून गेली. त्यांना त्या लग्नात हवं तसं मिरवता आलं नव्हतं त्यामुळे तेव्हापासून त्यांनी मनाशी पक्की गाठ बांधली की दिपालीने केलं तसं कस्तुरीचं होऊ द्यायचं नाही. हिचं लग्न आपण पसंत करू त्याचं तरुणाशी होईल आणि आज त्यांचं स्वप्न खरं व्हायच्या मार्गावर होतं. कस्तुरी तशी वयानी लहान होती. जेमतेम अठरा वर्ष पार केलेली. मुसमुसलेली, गोरी गुलाबी कांतीची कस्तुरी दिसायला सुंदर होती.

तसं पाहिलं तर ह्यांच्या घरात कशाची कमी नव्हती. गरजेच्या सगळ्या वस्तू घरात होत्या. सोफा, टीव्ही, फ्रिज, मिक्सर, वॉशिंग मशीन, जेवणाचं टेबल झालंच तर दोन मोठे पलंग आणि पुण्यात सुसज्ज चार खोल्यांचा ब्लॉक त्यांच्या मालकीचा होता. गुंज गुंज साठवत शालिनी ताईंनी बऱ्यापैकी सोनंही जमवून ठेवलं होतं. दोन्ही लेकींना लग्नात द्यायला सारख्याचं वजनाचे छानसे दागिने करून ठेवले होते. दारात चारचाकी गाडी होती, हाताखाली दोन बायका घरकामाला मदतनीस म्हणून होत्या. सारं अलबेल होतं. मोठ्या लेकीचं लग्न झाल्यामुळे तिची जबाबदारी कमी झाली होती. धाकटीचं शिक्षण होतंय ना होतंय आणि त्यात हे स्थळ सांगून आलं. सोन्याहून पिवळं होतं सगळं.

पाहुणे घरी येऊन रितीनुसार मुलीला पाहून गेले. आपली पसंती त्यांनी कळवली आणि घरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. येताजाता सगळे कस्तुरीला चिडवत. आपली लेज लग्नानंतरही हाकेच्या अंतरावर राहणार म्हणून आईवडील आनंदात होते. सगळे लहानमोठे तिची मजा घेत. ती पण वरवरचं हसे पण मनातून मात्र ती नाराज होती. तिला हा श्रेयस अजिबात पसंत नव्हता. कस्तुरी दिसायला खुप सुरेख. सायी सारखी मऊ तिची त्वचा, तेजस्वी शुभ्र रंग, लांब केस आणि डाव्या गालावर उमटणारी खोल खळी. ती मूर्तिमंत सौंदर्याची खाण होती. पण त्या मानानी श्रेयस अगदीचं डावा होता. खूपचं सावळा, ओबडधोबड चेहऱ्याचा, राकट त्वचेचा आणि आपली श्रीमंती अंगावर वागवणारा. असा हा श्रेयस तिला अजिबात आवडला नव्हता.

"दोन्ही बाजूंचा लग्नाचा सगळा खर्च आम्ही करू. तुम्ही फक्त मुलगी आणि नारळ घेऊन हॉल वर यायचं."
असं कस्तुरीच्या होणाऱ्या सासूबाईंनी बैठकीत सांगितलं. ह्यामुळे खरंतर शालिनी ताई आणि सुहासराव दुखावले गेले. त्यांच्याएवढी नसली तरी ह्यांचीसुद्धा आर्थिक परिस्थिती चांगली होती. आपल्या कडून लेकीचं लग्न पार पडावं असं त्यांना वाटत होतं. पण सोहनींचा परिवार मोठा होता. लग्नाला हजारेक माणसं येतील असा अंदाज होता त्यामुळे शालिनीताईंनी त्यांच्या म्हणण्याला होकार दिला.

"आम्हाला जमेल तसं करून देऊ की लग्न. चांगलसं कार्यालय घेऊन धुमधडाक्यात उडवून देऊ बार."
सुहासराव म्हणालेसुद्धा पण सोहनींनी ते खोडूनचं काढलं.

बैठीकीनंतर निघताना श्रेयसने सुहासरावांच्या हातात एक चिट्ठी हळूच ठेवली आणि काही नं बोलता निघाले. त्यात लिहिलं होतं कि,

"आमच्या वडिलांचं बोलणं मनावर घेऊ नये. एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यावे." हि चिट्ठी वाचून शालिनीबाई जरा शांत झाल्या. किमान होणाऱ्या जावयाला तरी आपलं म्हणणं पटतंय हे पाहून जरा सुखावल्या.

महिनाभरात लग्न उरकलं. सगळं उत्तम पार पडलं पण कस्तुरी मात्र आनंदी नव्हती. जेमतेम तारुण्यात प्रवेश केलेली ती. आपल्या जोडीदाराबद्दलच्या तिच्या अपेक्षा निराळ्या होत्या. तो दिसायला सुंदर असावा, रुबाबदार असावा असं तिला वाटे. कस्तुरी वागण्यातून आपली नाराजी अजिबात दाखवत नव्हती पण श्रेयसला ते कळलं होतं. आपण कस्तुरीला आवडलो नाही ते त्याला ठाऊक होतं पण त्यानेही कुठेही ते दिसू दिलं नाही.


पाचपरतवणी झाली आणि आईच्या घरून निघतांना धाय मोकलून आईच्या गळ्यात पडून कस्तुरी रडली.
"समजुतीने घे. त्यांचा स्वभाव चांगला आहे." आईने समजावलं. तिने मग सगळं स्वीकारायचं म्हणून मान होकारार्थी डोलावली आणि नव्या आयुष्याच्या वाटेवर चालू लागली....


-----क्रमशः

कस्तुरी आणि श्रेयसचा संसार सुखी होतो कि आणखी काही. पुढच्या भागात पाहूया.

©️®️सायली पराड कुलकर्णी.

🎭 Series Post

View all