कुरुप (भाग २)

कोणत्याही व्यक्तीची ओळख त्याच्या दिसण्यावरून करू नये!
लग्नानंतर गृह्प्रवेशाच्या वेळी श्रेयसची बायको म्हणून तिचं सोहनींच्या घरी खूप कोडकौतुक झालं. कुंकवाच्या भरल्या पावलांनी ती घरात आली. घर एकदम भरून गेलं. तिच्या सोबत आनंद, शांती, समृद्धी आली असं सगळ्यांना वाटलं. श्रेयस तर अगदी खुशीत होता. नखशिकांत सुंदर, सुलक्षणी बायको मिळाली म्हणून काय करू आणि काय नको असं त्याला झालं होतं.

लग्न झाल्यावर दोन दिवसांनी सत्यनारायणाची पूजा उरकली आणि मधुचंद्राची रात्र आली. आज कस्तुरी आणि आपण एकांतात पहिल्यांदाचं भेटणार त्या कल्पनेनेचं श्रेयस सुखावला होता. रोमांचित होत होता पण कस्तुरी मात्र नाखूश होती. खोलीत आल्यावर एकांतात श्रेयसने हळुवारपणे तिचे हात हातात घेतले. तिच्या अंगावर सर्रकन काटा आला. तिला त्याचा स्पर्श नकोसा वाटत होता. तिच्याही नकळत ती मागे सरकली. त्याच्यापासून जरा दूर बसली.

"काय झालं कस्तुरी. इथे बस ना. माझ्याशी काहीतरी बोल." त्याने विनवले.

"हूं" तिने फक्त हुंकार भरला आणि परत त्याच्या पाशी बाजूला येऊन बसली.

"लाजते आहेस का?" त्याने प्रेमानी कस्तुरीला विचारलं. बोलता बोलता कवेत घेतलं.

मनाविरुद्ध का असेंना पण हा आपला नवरा आहे. आता इथून पुढे हेंच आपलं नशीब असं समजून मन मानत नसतांनाही कस्तुरीने आपलं सर्वस्व श्रेयसच्या स्वाधीन केलं.

श्रेयस खूप आनंदात होता. रोज विनातक्रार कस्तुरी त्याला जवळ येऊ द्यायची. मशिनप्रमाणे सगळं यंत्रवत सुरु होतं. कस्तुरीच्या सहवासात श्रेयस खुलायचा पण ती मात्र निश्चल असायची. केवळ कर्तव्य आहे म्हणून साथ देत राहायची.

ह्या सगळ्याच्या बदल्यात तिला मात्र सगळं मालकीपण मिळालं होतं. सोहनींच्या एवढ्यामोठ्या कारभाराची ती आता मालकीण झाली होती. मुलाचा संसार सोन्याचा झाला ह्या आनंदात कस्तुरीचे सासुसासरे आनंदाने तीर्थयात्रेला निघून गेले होते. दिवसभर कस्तुरीच्या हाताखाली कामाला माणसं होती. स्वयंपाकही तिला करावा लागत नसे. दोन स्वयंपाकी घरी राहायला होते त्यामुळे तिला चहाचा कप सुद्धा हातात मिळे. श्रेयस दिवसभर ऑफिसमध्ये व्यस्त असायचा. त्यामुळे घराची राणी कस्तुरीचं होती.

बघता बघता सात वर्ष झाली. संसारात आता ते दोघे चांगले मुरले गेले पण बाळाची चाहूल लागत नव्हती. कस्तुरीची ओटी रिकामीचं होती. खरंतर ह्या "कुरूप" नवऱ्याचं बीज आपल्या गर्भात वाढावं असं कस्तुरीला अजिबात वाटत नव्हतं. मनापासून ती कधी खुललीचं नव्हती. निसर्गनियम म्हणून रोज त्याला शरण जात होती.

सगळे दिवस सारखे नसतात. नियती आपल्या समोर कोणते फासे टाकेल ह्याचा काहीच नेम नसतो आणि तसंच त्या दिवशी झालं. ऑफिसच्या कामानिमित्त बांधकामाच्या साईटवर गेलेल्या श्रेयसला अपघात झाला. बांधकाम अर्धवट सुरु असेल्या त्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून त्याला जबर मार लागला होता. त्याला बऱ्याचं ठिकाणी खोल जखमा झाल्या होत्या. सोबतच्या लोकांनी त्याला तातडीनं हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. कस्तुरीला निरोप गेल्या गेल्या ती होत्या त्या अवस्थेत घरातून निघून हॉस्पिटलमध्ये पोहचली होती.

दरम्यान श्रेयसवर अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या होत्या. नाकातोंडातून नळ्या घातलेला, डोक्याला, हाताला आणि पायाला प्लास्टर घातलेला श्रेयस बेडवर निपचीत पडला होता. काय करावे हे नं समजून खोलीत एका कोपऱ्यात घाबरून कस्तुरी उभी होती. त्याने हातानेचं तिला जवळ बोलवलं.

"काय झालं? काय हवंय का तुम्हाला? फार दुखतंय का ओ?" तिने काळजीने त्याला विचारलं.

"ऐक कस्तुरी, मी आता ह्यातून काही वाचणार नाही. मला ठाऊक आहे तुला मी आवडत नाही. अगदी पहिल्या दिवशीपासून आवडत नाही पण तुझा पत्नीधर्म तू आज्ञाधारकपणे निभवलास. कधीच तुझी नाराजी माझ्यापर्येंत पोहचू नाही दिलीस. मी आभारी आहे तुझा कस्तुरी. माझी सगळी प्रॉपर्टी, बिझनेस सगळं तुझं असेल पण आता मी नसेन." त्याला बोलता बोलता धाप लागली. श्वास वर खाली होऊ लागले.

कस्तुरीच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. ज्या माणसाला "कुरूप" म्हणून आपण नाकारलं. त्याचा कायम तिरस्कार केला त्या माणसाच्या मनात आपल्या बद्दल एवढ्या सुंदर, कोमल भावना आहेत आणि आपण मात्र कायम त्याच्या दिसण्यावर चफडत राहिलो. तिला खूप वाईट वाटत होतं.

"का रडतेस?" त्याने ह्या परिस्थितीतही हळुवारपणे विचारलं.

"तुम्हाला काही होणार नाही. तुम्हाला काही झालं तर मी कोणाकडे पाहायचं?" कस्तुरी हुंदके देत म्हणाली.

"माझं चुकलं पण एक नक्की सांगते, तुमच्याशी मी नेहमी एकनिष्ठ होते. माझ्या मनात दुसऱ्या पुरुषाला स्थान नाही." ती म्हणाली.

"कस्तुरी, मला हे माहिती आहे पण तरीही सांगतो माझ्या नंतर एखाद्या सुंदर तरुणाशी तू लग्न कर. तुझं सौंदर्य आणि प्रेम त्याला बहाल कर. तुमच्यासारख्या सुंदर दिसणाऱ्या गोड बाळाला जन्म दे. तुझ्यामधल्या मातृत्वाला मारू नकोस."

"नाही ओ. माझ्याच्यानं हे कधीचं व्हायचं नाही. माझी गाठ तुमच्याशी बांधली गेली आहे." कस्तुरीला अश्रू अनावर झाले होते.

"मला माहितीये गं तुझं कधीचं माझ्यावर प्रेम नव्हतं. ठरवून प्रेम करताही येत नसतं पण माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. माझ्या शुभेच्छा, माझं वैभव एवढंच काय तर माझे आईवडीलही तुला कायम साथ देतील. येतो मी." एवढं बोलून श्रेयसने कस्तुरीचा हात हातात घेऊन जीव सोडला.

कस्तुरी मात्र आता खरोखर मोडून पडली. चेहऱ्याने "कुरूप" असला तरी मनानं सगळ्यांत सुंदर असलेल्या श्रेयसला आपण ओळखू शकलो नाही त्याचं अपराधीपण बाळगून त्याच्या निर्जीव कलेवरला कवटाळून आक्रोश करू लागली.

©️®️सायली पराड कुलकर्णी.

🎭 Series Post

View all