कुरूप - भाग २ (अंतिम)

एका स्त्रीच्या विचारात बदल

कुरूप - भाग २ (अंतिम)

मागच्या भागात आपण समिधाचे विचार ऐकले. आता रजू तिला मूल दत्तक घेण्याचं महत्त्व कसं पटवून देते ते पाहूया.


"समू तू हे असे विचार मनात ठेवून जीवनातील किती मोठ्या आनंदाला पारखी होत आहेस हे तुला कळतंय का. अगं एखादं लहान मूल घरात बागडत असलं की घराला घरपण प्राप्त होतं. त्याच्या बोबड्या बोलांनी तुझे कान तृप्त होतील. त्याच्या बाललीला पाहताना तुझ्या डोळ्यांना गोड आणि पुन्हा पुन्हा पहावं असं निरागस बाल्य न्याहाळायला मिळेल. त्याच्या मागे धावताना, खेळताना तुझ्यात एक नवीन ऊर्जा निर्माण होईल. त्याने मांडलेला खेळण्यांचा आणि इतर वस्तूंचा पसारा आवरताना तुला कधी कंटाळा येणार नाही तर खूपच मजा येईल."

"रजू हे सारं आपल्या मुलाच्या बाबतीत करताना मला आवडेल. पण हो दुसऱ्या कोणाच्या तरी मुलाचं करणं म्हणजे माझ्यासाठी अशक्य आहे."

"समू मुळात तुझा विचार दुसऱ्या कोणाचं तरी मूल हाच चुकीचा आहे. सर्वच लहान मुलं तितकीच निरागस असतात. एक तर अनाथाश्रमातील सर्वच मुलं अनैतिक संबंधातून जन्माला आलेली नसतात. कधी कधी एखाद्या आईची दुसरी मजबुरी असू शकते आणि म्हणून ती त्याला तिथे ठेवते. अनैतिक संबंधांचं म्हणशील तर जन्माला येणारं प्रत्येक बाळ हे निर्मळच असतं. तू अगदी तान्हं बाळ दत्तक घे आणि त्याला आईचं प्रेम दे तुझ्यातलं मातृत्व नक्कीच जागं होईल. आपण कसं जन्माला आलो आहे यात त्या बाळाची काहीही चूक नसते. तुझ्या मनातील हा कोता विचार काढून टाक. एकदा तू एखाद्या बाळाला माया लावलीस, प्रेम दिलं की तुला त्याचा इतका लळा लागेल की तुला कधी जाणवणार पण नाही की त्याला तू अनाथाश्रमातून दत्तक घेतलं आहेस. तू एकदा अनाथाश्रमात जा, तिथे सर्व लहान बालकांना भेट आणि त्यांच्यातली निरागसता, त्यांचे प्रेमाला आसुसलेले डोळे बघ आणि नाही तुला पाझर फुटला तर मला सांग. आपल्यासारख्या सांपत्तिक स्थिती चांगली असलेल्या लोकांनी जर अनाथाश्रमातून एकेक मूल दत्तक घेतलं तर उद्या अनाथाश्रमांची गरजच राहणार नाही."

"रजू तुझे एवढे सुंदर विचार ऐकून मला माझ्या कुरूप विचारांची खूप लाज वाटते ग. इतकी वर्ष हे असे कुरुप विचार माझ्या डोक्यात होते याबद्दल मला खूप अपराधी वाटतंय. आज तू माझे डोळे उघडले आहेस. खरं तर मला आणि राजनला लहान मुलांची खूप हौस आहे. राजनने दोन-तीन वेळा त्याचे विचार माझ्याजवळ प्रकट केले होते. तो म्हणाला होता की आपण एखादं मूल दत्तक घेऊया. त्याला चांगलं शिकवूया, मोठं करूया. आपल्याला पण कोणीतरी आई बाबा म्हणेल. दोन-तीन वेळा त्याचं म्हणणं ऐकल्यावर मी त्याला निक्षून सांगितलं होतं की पुन्हा हा विषय माझ्याजवळ काढायचा नाही. तेव्हापासून राजन माझ्याजवळ कधी बोलला नाही परंतु तो एकटा असताना मला त्याच्या चेहऱ्यावर उदासी नेहमीच जाणवत असते. आज घरी गेल्यावर राजनच्या वाढदिवसाला मी मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे असे सांगेन. एखाद्या सुंदर भेटीपेक्षाही ही भेट त्याच्यासाठी खूपच अमूल्य असेल. आम्ही लवकरच अनाथाश्रमातून एखादं बाळ नक्कीच दत्तक घेऊ."

"खूप चांगला निर्णय घेतलास. तुला माझी मतं पटली याबद्दल मला आनंदच होतो आहे."

"माझ्या मनातील कुरूप विचार मी झटकून टाकले आहेतच आता यापुढे मी सुद्धा इतर कोणी असे विचार करत असतील तर त्यांच्या मनातील विचार काढून टाकायचा नक्कीच प्रयत्न करेन. मला खात्री आहे राजनला तुला भेटायला नक्कीच आवडेल. हा माझा पत्ता आहे. पुन्हा मुंबईला आलीस की नक्की आमच्या घरी ये."

'चल बाssय' म्हणत दोघींनी एकमेकींचा निरोप घेतला. गाडीतून उतरताना समिधा गुणगुणत होती, 'या सुखांनो या, अंगणी प्राजक्त व्हा'.

समाप्त


©️®️ सीमा गंगाधरे


🎭 Series Post

View all