Login

कुसुम

Kusum
कुसुम ©®विवेक चंद्रकांत

माझे नवीन लग्न थोडे जुनं होऊ लागलं आहे.. म्हणजे गुलाबी दिवस संपून आता वादविवाद आणि भांडणाचे दिवस सुरु झाले आहे.. मी अश्विन आणि माझी बायको अस्मिता. आमचा प्रेमाविवाह. अस्मिता तशी स्वभावाने चांगली आहे. गोड, निरागस, माझ्यावर प्रेम करणारी वगैरे वगैरे. फक्त एकच minus point आहे. राग लवकर डोक्यात जातो. त्यामुळे किरकोळ कारणावरूनही आमची भांडणे होतात. अर्थात राग लवकर निवळतोही तिचा. त्यामुळे तसें बरे चालले आहे. आता भांडणानंतर काय होते तेही सांगतो. म्हणजे त्याचे स्तर असतात. किरकोळ भांडण झाले तर अबोला असतो. तो काही मिनिटांपासून तर काही तासापर्यंत असतो. त्याहून जास्त भांडण झाले तर हा अबोला एक दीड दिवस राहतो. खूप जोरदार भांडण झाले तर बायका माहेरी जातात. अर्थात ते इतके सहज नसते. कारण माहेर दूर असते. St किंवा रेल्वेने जावे लागते. सोबत अर्थातच कोणी नसते. त्यामुळे अगदी नाईलाज झाला तरच बायका माहेरी जातात.आमच्याकडे प्रेमाविवाह असल्याने अस्मिताचे माहेर गावातच. ऍक्टिवाने दहा बारा मिनिटाच्या अंतरावर.त्यामुळे जोरदार भांडण झाले कि ती तरातरा बॅग काढते त्यात दोन कपडे टाकते आणि ऍक्टिवा घेऊन माहेरी निघून जाते. त्यावेळेस अडवले तरी ती ऐकत नाही हा अनुभव असल्याने मी तिला जाऊ देतो. मग दुसऱ्या दिवशी तिचा राग गेल्यावर तिला आठवते कि आपल्या नवऱ्याला आपल्या हाताचंच जेवण आवडत. त्याला चहाशिवाय काही येत नाही. त्याला भेंडीची भाजी आवडत नसतांना काल आपण तीच करून आलोय. मग ती पश्चातापदग्ध होऊन मला सकाळी फोन करते. मग मीही तिला रात्री मी जेवलोच नाही. तू शेजारी नसल्याने झोपही नीट लागली नाही. असे अगदी खोल आवाजात सांगतो आणि ती फोनवरच हुंदके देते आणि अर्ध्या तासात घरी पोहोचते.कधी जर दुसऱ्या दिवशी सकाळी फोन आलाच नाही तर मग मी दुपारी तिला फोन करतो आणि निरागस आवाजात विचारतो.

"आज रात्री तू तिथेच राहणार आहे ना?"

"का रे?"

"काहींनाही. ते B विंग मधले जाधवकाका भेटले होते. कस्टम मध्ये आहेत ते. त्यांना कळलं तू माहेरी गेलीस ते."

"त्यांना कोणी सांगितलं?"

" मीच सांगितलं. मी बाहेर निघालो नाश्त्याला तर त्यांनी विचारले आज बाहेर नास्ता कशाला म्हणून सांगितले. ते जाऊदे. त्यांनी एक महागडी स्कॉच आणली आहे. ते म्हणाले तुमच्याकडे कोणी नाही तर तुझ्याकडे बसू संध्याकाळी.तुला तर माहित आहे मी घेत नाही पण अगदीच त्यांनी आग्रह केला तर अगदी स्मॉल पेग घेईन म्हणतो.मोठया माणसांचा मान ठेवावा लागतो.बाकी सोडबीडा ते आणणार आहेत फक्त पापडाचा डबा कुठे ठेवला ते सांग. तेवढे भाजून घेईन गॅसवर. "
इथे माझा आवाज निरागसतेची परिसिमा गाठतो.

संध्याकाळी मी ऑफिसमधून घरी येतो तर अस्मिता घरी आलेली असते.

"अरे? तू आलीस? आता जाधवकाकांना नाही सांगावे लागेल." मी आश्चर्यचकित झाल्याचे दाखवतो.

एकदा मात्र कहर झाला. आमचे भांडण चांगले तास दीड तास चालले.तिने माझे खानदान एवढे सुसंस्कृत असतांना तूच एवढा नालायक कसा ते विचारले. मीही तुझे आईवडील भाऊ एवढे शांत असतांना तूच एवढी आक्रस्ताळी कशी हे विचारले.

त्यानंतर तिने भली मोठी बॅग काढली. मी तिला परोपरीने समजावून सांगितले कि एवढी मोठी बॅग ऍक्टिवावर जाणार नाही त्यापेक्षा दोन छोट्या बॅग कर आणि दोन फेऱ्या कर.. तर ती जास्तच भडकली. आजकाल भलाईचा जमानाचं राहिला नाही. चांगला सल्ला द्यावा तर त्याची किंमत नाही...

ती गेली. एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस, पाचवा दिवस उजाडल्यावर तिचा फोन आला.

" तू काय लाज लज्जा शरम सर्व विकून खाल्ली का? चार दिवस झाले बायको माहेरी आहे आणि तुला साधा फोन नाही करता येत? "

" लाज लज्जा बाजारात विकता येत नाही आणि बेशरम होण्यासारखे मी काही केलेलेच नाही. "

"कसा आहेस?"

"मजेत "

" जेवणाचे काय? डबा मागवतो. "

"नाही ग. तुला माहित आहे ना कि आपल्या कामवाल्या भागामावशी आजारी असल्याने चार दिवस येणार नव्हत्या?"

"हो. माझ्यासमोरच त्यांचा नवरा निरोप देऊन गेला.अगं बाई विसरलेच मी."

"त्यांच्या बाजूलाच कुसुम राहते. भागामावशीने तिला आपल्याकडे कामाला पाठवले. ती आल्या आल्या म्हणाली बाईसाहेब नाहीत का? मग जेवणाचे काय?
मग म्हटलं डबा मागवणार आहे. ती म्हणाली डबा कशाला मागवता? मी करून दिल ना. चार पोळ्या आणि चार चमचे भाजी करायला काय लागते? तुम्ही फक्त भाजी घेऊन या. निवडण्याची नको."

""मग?"

"मग काय? मी पटकन चौकातून भाजी आणतो. ती पटापट कणिक भिजवते. तोपर्यंत मी कुकर लावतो. स्वयंपाक झाला कि मी गरमागरम जेवण करतो. तोपर्यंत ती भांडे घासते, कपडे धुते.मी ऑफिसला निघेपर्यंत तिचे काम झालेले असते.मग तिला पुढच्या चौकात सोडतो आणि मी ऑफिसला जातो."

"सोडता म्हणजे?"

"मोटरसायकलवर."

"पण भागामावशी तर आपल्या मागच्या बाजूला राहते आणि ही पुढच्या चौकात कशाला येते तुमच्याबरोबर?"

"असेल तिचे काम काहीतरी. मला काय माहित? पण चांगली आहे बिचारी. हाताला चव आहे तिच्या"

"मुलगीच आहे ना ही कुसुम?"

" चोवीस पंचवीसची असेल. पण मुलीसारखीच अल्लड आहे. "

"बरीच माहिती आहे तिच्याबद्दल. दिसायला कशी आहे?"

"तशी काळी सावळीच आहे. नाक धरधरीत आहे. दात तर इतके छान आहेत ना कि हसली अगदी बघत राहवसे वाटते."

"तिला दात काढायला काय झाले.?" (संताप... संताप )

"ती कशाला दात काढेल? मीच तिला काही गमतीजमती सांगतो मग हसते बिचारी ती."

"आता आली का ती महामाया?"

"महामाया काय म्हणते. चांगल कुसुम नाव आहे तिचे. आज मला शनिवारची सुट्टी ना म्हणून उशिरा येणार आहे. आज थांबणार आहे दिवसभर. आज मस्तपैकी गवार आणली आहे ती निवडेल मग मसाला टाकून भाजी बनवेल. थोडा शिरा करणार आहे. तीही इथेच जेवेल आज. नंतर सगळ्या खिडक्या दरवाजे पंखेबिंखे साफ करणार आहे आम्ही दोघे मिळून. हॅल्लो... हॅल्लो..???

समोरून फोन बंद झाला वाटते.

मोजून वीस मिनिटांनी अस्मिता घरी हजर झाली. नाकाचा बोन्डा लालेलाल झालेला. डोळे रडून सुजलेले.

"अगं अस्मी? अचानक? बरे ये. माहेरी काम करून थकली असशील मी पटकन चहा ठेवतो."

पण अस्मिता थांबलीच नाही.. भराभर घरात एक चक्कर टाकला आणि " येते दहा मिनिटात "म्हणून पुन्हा गायब झाली.
अगदी मोजून दहाव्या मिनिटाला परत हजर झाली. पटापट ड्रेस बदलला. सिंकमध्ये बाथरूममध्ये जो भांड्यांचा ढीग लागला होता तो घासून पुसून ठेवला. घरभर पसरलेले कपडे.. बेडशीट गोळा करून. मशीनला लावले. घराचा केर काढला. मग मस्तपैकी मुगाची खिचडी टाकून अंघोळीला गेली.
तरी मी पुन्हा पुन्हा सांगत होतो अगं कुसुम येईल आता कशाला काम करतेस? पण तिने ऐकलंच नाही.
मग गरमागरम मुगाची खिचडी.. पापड लोणचे भरपेट जेवलो आणि बेडरूममध्ये आडवा झालो. अस्मीनेही आवरासावर केली आणि बेडरूममध्ये येऊन माझ्या शेजारी झोपली आणि माझ्या अंगावर हात ठेवत म्हणाली.
" अजून कशी आली नाही तुमची कुसुम? "

"कोण जाणे? कदाचित बाईसाहेब आल्याचे तिला समजले असेल."

" ती येणारच नाही"

"कशावरून म्हणते तू?"

"कारण कुसुम नावाचे पात्र काल्पनिक आहे. तू बनवलेले. मी आल्या आल्या भागामावशीकडे जाऊन आली. त्यांनी कोणाला पाठवले नाही. आणि अशी कोणती कुसुम त्यांच्या शेजारी राहतच नाही.शिवाय घरी आल्यावर पसारा बघितलंच होता तेव्हाच शंका आली होती."

"अगं पण...." पुढे मी काही बोलू शकलो नाही कारण तिने माझ्या ओठांवर ओठ टेकवले.

ह्यापुढे काय झाले ते सेनसॉर असल्याने लिहू शकत नाही. पण अशी एखादी कुसुम तोंडी लावायला असली तर संसाररूपी रेसिपीची लज्जत जास्तच वाढते.
©®विवेक चंद्रकांत वैद्य. नंदुरबार.