कुतूहल ( विंडो शाॅपिंग )

विंडो शाॅपिंग हे कुतूहल जाणून घेण्यासाठी उत्सुक असण्याऱ्या छोट्या मुलाची कथा
# लघुकथा लेखन

ईरा स्पर्धा

विषय:- विंडो शाॅपिंग


शीर्षक:- कुतूहल

" बाबा, चला ना लवकर, उशीर होईल आपल्याला परत घरी यायला. " अमन त्याचे बाबा शरद यांना म्हणाला.

शरद हातात घड्याळ घालत त्याच्याकडे हसत पाहत म्हणाला," अरे, हो ,हो ! किती ती घाई, तुझ्या आईचं पण होऊ दे ना मग जाऊ."

तेवढ्यात त्याची आई अनिता पदराला हात पुसत किचनमधून बाहेर आली. तिला तयार न होता आलेले पाहून वैतागत चिडत ओठ बाहेर काढत अमन म्हणाला," काय गं, आई तू? अजून तयार झाली नाहीस, आज आपल्याला शाॅपिंगला जायचे आहे ना. बाबांनी तुला सांगितले नाही का?"

अनिता डोळ्यानेच शरदला काय म्हणून खुनेने विचारले. तोही डोळ्यानेच शांत राहा मी आहे ना, असा इशारा केला. तो तिला म्हणाला,"अनु, जा लवकर तयार हो, आज आपण शाॅपिंगला जाणार आहोत. ते पण विंडो शाॅपिंग."

त्याचे बोलणे ऐकून अनिता हसत अमनच्या डोक्याला कुरवाळले आणि तयार व्हायला निघून गेली. पण अमन मात्र विंडो शाॅपिंग नाव ऐकून विचार करू लागला. याआधी हे नाव त्याने कधीच ऐकले नव्हते. त्याला विचारात बघून शरद त्याच्याजवळ येऊन बसत म्हणाला," काय रे, पिल्ल्या, कसला विचार करतोस एवढा? "

"काय नाही ओ बाबा? विंडो शाॅपिंगबद्दल विचार करत आहे. शाॅपिंग माहिती आहे पण विंडो शाॅपिंग हे पहिल्यांदाच ऐकतो आहे. काय आणि कसे असते ते? " अमन एक हात कमरेवर व दुसऱ्या हाताचे एक बोट हनवुटीवर ठेवून विचार करत म्हणाला.

त्याची ती अदा शरदला खूपच क्यूट वाटली. तो हसत त्याच्या गालावर हात ठेवत म्हणाला," अच्छा, तू त्याचा विचार करतोस होय, अरे ते एक मॅजिक आहे? तुला ना प्रत्यक्षात दाखवतो. आता जातोच आहोत ना आपण तर बघू ना, एवढा कशाला विचार करतोस? आई येऊ दे मग जाऊ, हम्म ."

"हो बाबा, चालेल. मी तर खूपच एक्साईटेड आहे विंडो शाॅपिंगसाठी. खूप मज्जा येईल." तो आनंदून उत्साहाने म्हणाला.

शरदने त्याच्या डोक्याला प्रेमाने थोपाटले. अमनने भिंतीवरील घड्याळाकडे पाहत पुन्हा वैतागत आईला आवाज दिला,"आई ऽऽ ये आई ये ना पटकन. " पुन्हा शरदकडे पाहत म्हणाला," बाबा, सांगा ना आईला लवकर बाहेर यायला. उशीर होतोय."

"अरे, पिल्ल्या, वेळ आहे अजून. मी आईला घेऊन येतो तोपर्यंत तू तुझं वाॅच घाल हातात. या ड्रेसवर छान दिसेल तुला. बघ बरं कुठे ठेवलेस ते? मी आईला घेऊन आलोच. " ते अमनला असे म्हणत अनिताला पाहायला निघून गेले.

"अरे, हो मी तर विसरलो होतो. वाॅच कपाटातील बाॅक्समध्ये आहे. घालतो आता काढून." तो स्वतःशीच बोलत कपाटाजवळ गेला. त्यातील बाॅक्समधील घड्याळ काढून हातात घालून तो आईबाबांची वाट पाहू लागला.

अनिता होती त्या रूममध्ये शरद आला तर त्याने पाहिले की ती तयार तर झाली होती ; पण ती कसल्या तरी विचारात असल्यासारखी त्याला भासली. तो जवळ येत तिच्या खांद्यावर हात ठेवल्यावर ती भानावर आली. "अनु , कसाला विचार करत आहेस? " तो तिच्याजवळ जाऊन बसला. ती त्याच्या दंडाला विळखा घालत त्याच्या खांद्यावर डोकं टेकवत म्हणाली, " अहो, तो शाॅपिंगला जायचं म्हणतोय आणि तुम्ही विंडो शाॅपिंग? तिथे वस्तू किती महाग असतात. त्याने काही घेण्याचा हट्ट केला तर , कसे घेऊन देणार त्याला ?"

"अरेच्च्या! वेडाबाई याचा विचार करतेस होय. अगं, आपला पिल्लू शहाण आहे खूप. समजूतदारपण आहे. एकदा समजून सांगितले की तो ऐकतो माहिती आहे ना तुला. नको विचार करूस. तरीही त्याने हट्ट केला तर करेन मी मॅनेज. डोन्ट वरी. " शरद तिची समजूत घालत म्हणाला.

"हो, तुम्ही असही त्याला न मागता खूप काही आणून देता. तुमच्या पगारातून सर्व मॅनेज करून बाकी आमची हौसमौसही पुरवता. आपण मध्यमवर्गीय आहोत, हो. हे त्याला आताच कळायला हवं. " ती विचार करत म्हणाली.

"अगं, त्याची चिंता नको करूस. वयानुसार समजेल गं त्याला. चल आता उठ बरं, नाही तर परत हाक मारेल तो. " तो स्वतः उठला व तिलाही उठवत म्हणाला. तो पर्यंत त्याची हाक ऐकू आलीच.

ते घराच्या दाराला कुलुप लावून स्कुटीवर बसून निघाले विंडो शाॅपिंग बघायला. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पोहोचताच त्यांना मोठ मोठी दुकाने दिसू लागली. रात्र झाल्याने विजेच्या दिव्यांचा लखलखटाट होता. ते एका भव्य विंडो शाॅपिंगजवळ आले. तेथील पार्किंग एरियात स्कुटी पार्क करून ते विंडो शाॅपिंगच्या दिशेने निघाले. त्या दुकानाला चारी बाजूंनी काचेचे आच्छादन होते. आता विजेच्या दिव्यांचा प्रकशाने सगळा शाॅप उजळून निघाला होता. खूप सुंदर दिसत होतं ते. बाहेरून तर भव्य दिव्य तर दिसत होते पण आतही कसे दिलेस याचे कुतुहल अमनच्या मनात निर्माण झालं. आत जाण्यास तो खूपच उत्सुक होता. तो दोघांच्या हाताला धरून आता आला. सगळीकडे वेगवेगळे वस्तू त्याचे विविधता पाहून तो अवाक झाला. कपडे, खेळणी असे बरीच दालने होती. तो शरद व अनिताचे लक्ष नसताना किमती पाहायचा. "बापरे! किती महाग आहेत हे सर्व" तो मनातच मनाला. बराच वेळ झाल्यानंतर तो बाहेर जाऊ म्हणू लागला.

शरद त्याला म्हणाला,"अमू, काही घ्यायचं नाही का तुला?"

"नको बाबा मला काही, आहे की माझ्याकडे सर्व. मला आता भूक लागली. चला ना काही तरी खाऊ या. " तो पोटाला एक हात लावत दुसऱ्या हाताने जेवणाची कृती करत इवलेशे तोंड करून म्हणाला.

" बरं, चल. आज तुझ्या आवडती पावभाजी खाऊ." शरद त्याला हाताला धरत म्हणाला.

"वा, मस्तच. चला लवकर मग." तो त्या विंडो शाॅपीमधून पटपट चालत बाहेर येत म्हणाला.

बाहेर समोर एक हाॅटेलमध्ये मस्तच पावभाजीवर यथेच्छ ताव मारला. अमनने तर मिटक्या मारत खाल्ला. खाऊन झाल्यावर तो घरी चला आता म्हणून लागला.

"अरे, पिल्ल्या तुला शाॅपिंग करायची होती ना. इतक्यात घरी जायचे तुला? " अनिता जरा गोंधळून म्हणाली.

"आईबाबा, आय एम साॅरी, मी तुम्हाला बोलवायला आलो होतो तेव्हा तुमचे बोलणे ऐकले. मी आधीच विंडो शाॅपिंगबद्दल बाबांच्या मोबाईलवर सर्च करून पाहिलं होतं. त्यात मला कळलं होतं त्याबद्दल तेच सांगणार होतो. एक्साईट होतो पाहायला. म्हणून जायचं म्हणालो. तुम्ही नेहमीच मला काही ना काही आणता, बाबा. तेही मी न मागता. आपली परिस्थिती माहिती मला. या पुढे असे नाही करणार. " तो अनिता व शरद यांच्या पायांना विळखा घालत म्हणाला.

"बघितलस अनु, म्हणालो होतो ना मी. आपल बाळं खूप शहाण आहे. खूपच समंजस आहे या वयात ही." शरद कौतुकाने त्याच्याकडे पाहत खाली बसून त्याच्या माथ्यावर ओठ टेकवत म्हणाला.

अनिताचे डोळे भरून आले. "हो रे, माझ्या गोड पिल्ल्या " म्हणत तिने ही त्याच्या गालाची पप्पी घेतली.

जेमतेम दहा बारा वर्षांचा अमन वयाच्या मानाने खूपच समजूतदार होता. त्याच्या समंजसपणाचा दोघांनाही कौतुक वाटले. ते दोघे म्हणाले," अस शाॅपिंग करू कधी कधी पण विंडो शाॅपिंगला महिन्यातून एकदा यायचच."

अमनही हो म्हणत त्यांना बिलगला.