मी कावराबावरा झालो. हे सगळं माझ्याच आयुष्यात घडावं ? हाताच्या मुठी आवळून मी श्रीधर व आप्पांकडे पाहत होतो. माझं आयुष्य इतकं टुकार आहे की आयुष्यात सुखाचे क्षण कधी येतच नाहीत.
आप्पा – तर प्रभाकरा , तू श्रीधरचा बाप म्हणून मी तुला विचारतोय .. ह्या परांजप्यांची मुलगी मान्य आहे का ?
प्रभाकर – तुझ्या शब्दाबाहेर कसा जाऊ दादा ! तू मुलगी शोधलीस म्हणजे छानच असणार.
आप्पा – ठिक आहे. आपण उद्या संध्याकाळी त्यांच्याकडे जाऊ. त्यांना मी निरोप देईन आपण येणार त्याचा.
काय होऊन बसलं होतं हे ? आता सहनही होत नाही आणि सांगूही शकत नाही अशातली गत झाली होती. आप्पांना सांगावं का ? नको. सत्य समोर आलं की सरळ घराबाहेर काढायला मागेपुढे पाहणार नाहीत. कुठल्या तोंडानं सत्य सांगावं ? आपण श्रीधरला तर सांगूच शकतो. तो नक्कीच समजून घेईल मला.
रात्रीची जेवणं झाल्यावर श्रीधरला शतपावली साठी बाहेर घेऊन आलो. श्रीधर प्रचंड खूश होता . त्याला माझ्या मनातलं सांगणं गरजेचं होतं.
श्रीधर – चला , सुखाचा क्षण माझ्या आयुष्यात आलाय... कशी दिसत असेल रे ती राधा . नाव मस्त आहे राधा. लग्नानंतर मी तिचा कृष्ण.
मी – ऐक ना...मला एक महत्त्वाचं बोलायचंय..
श्रीधर – प्लीज आज नको... दोन क्षण सुखाचे मला जगूदे. उगाच तुझे प्रॉब्लेम सांगून मूड नको खराब करू..
मी – राधा .. राधाविषयी बोलायचंय...
तो ऐकण्यासाठी आतूर झाला... इतक्यात आसावरीने हाक मारली..
आसावरी – श्रीधर , दादा .. तुला आप्पा बोलावताय्त .
श्रीधर – आलोच.. मन्या , आपण नंतर बोलू.
असं म्हणून श्रीधर आसावरीसह आत गेला. मी सुद्धा त्यांच्या पाठून आत गेलो..आप्पा लाकडी खुर्चीत पैसे मोजत बसले होते.
श्रीधर – काय झालं आप्पा ?
आप्पा – मुलीकडच्यांना निरोप पठवलाय. हे पैसे घे. उद्या बाजारातून चांगले महागडे कपडे घे स्वतः साठी. मुलीकडच्यांसमोर आपली श्रीमंती दिसली पाहीजे , बोलण्यात रूबाब जाणवला पाहीजे. मुलीची माहीती काढली मी , खूप लाघवी आहे ती . अरे मनोहर , तू ओळखत असशील ना तिला ?
मी – अं ?
आप्पा – तुझ्याच कॉलेजात शिकत्ये ती. तुझ्याच वयाची आहे रे ती.
मी – अं हो. ओळखतो तसा.
आप्पा – हं. तर मी काय म्हणत होतो , मन्या उद्या तू सुध्दा चल...
मी – मी ? नाही नको. तिथे माझं काय काम ?
आप्पा – मी सांगतोय म्हणून चल...
आता आप्पांचा आदेश म्हणजे जावच लागणार... दुसरा उपायच नाही. आधी श्रीधरला सांगितलेलं बरं.. श्रीधर ऐकून घेईल. नाही , ऐकून घ्यावच लागेल त्याला. कसं सांगावं त्याला ? मुळात म्हणजे राधा तयार झाली असेल ? का राधाच्या घरी सगळं कळलं असेल ?
आप्पा – काय रे कुठल्या विचारात हरवलास ?
मी – नाही .
आप्पा – मला सारखं राहून राहून वाटतंय की तू काहीतरी लपतोय्स.
मी – नाही. खरंच नाहीये असं काही.
आप्पा – तू तुझ्या लग्नाची स्वप्न बघायला लागलास की काय ?
मी – आप्पा , मी अभ्यासाला बसतोय.
असं म्हणून बाहेरच्या पडवीत झोपाळ्यावर येऊन बसलो. राधाची खूप आठवण येत होती. राधाला काही झालं नाही ना ? राधाने घरी सगळं सांगितलं का ? वेडी आहे अगदी. स्वतः च्या मनचं ऐकून मोकळी झाली. आता आप्पांना देखील कळून चुकलंय की मी काहीतरी लपवतोय.
रात्री सगळे झोपी गेले होते. मी मात्र जागा होतो. मनात वेगवेगळे विचार येत होते. बाजूला मान वळवली. श्रीधर आणि बंडू घोरत होते. आत्ता राधाच्या घरी जाऊन राधाला भेटावं का ? जाऊया.. नको, आप्पांना कळलं तर ? एक गोष्ट लपवता लपवता नाकीनऊ आलेत अजून काही नको. उद्या राधा देईलच की श्रीधरला नकार. विचार करता करता सकाळ झाली होती. झोप न आल्यामुळे शरीर थकल्यासारखं आणि डोकं जड झालं होतं. आजचा दिवस प्रचंड महत्वाचा होता. अंथरूण गुंडाळून ठेवून मी पडवीत आलो. कडूलिंबाच्या कांडीने दात घासत असताना सदू काकाला विहीरीतून आंघोळीसाठी पाणी काढायला सांगितलं..पत्र्याची बादली घेऊन सदूकाका विहीरीकडे गेला. मी तसा विहीरीपाशी जात नाही. उंचावरची आणि पाण्याची मला प्रचंड भीती !
आंघोळ वगैरे झाल्यावर मी श्रीधरला घरभर शोधू लागलो...
मी – काकू श्रीधर कुठाय ?
सुलभाकाकू – अरे आत्ताच कचेरीत गेलाय. दुपारपर्यंत येईलच. का रे ?
मी – नाही ! मी येतो जरा बाहेर जाऊन..
मी राधाला भेटण्यासाठी निघालो होतो. आत्ता काहीही झालं तरी राधाला भेटायचं. तोच काकूने अडवलं..
सुलभाकाकू – अरे मन्या , जरा मला माड्यावरून ती जुनी ट्रंक आणून देशील ?
मी – काकू मी जरा बाहेर जातोय. सदूकाका किंवा बंडूला सांग ना !
मी तिचं काहीच न ऐकता घराबाहेर आलो. फटफटीवर बसलो आणि राधाच्या घराच्या बाहेर थांबलो. रस्त्याला लागूनच तिचं घर होतं. घराच्या मागे समुद्र होता त्यामुळे समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येत होता. घराची एक पायरी चढलो. पायरीवर समुद्राची वाळू थोड्याफार प्रमाणात होती. दोन्ही बाजूला माड होते. दोनमजली ते कौलारू घर. मुख्य दरवाज्याला लागूनच गजांच्या खिडक्या. दरवाजा बंद होता. मी चालत चालत दरवाज्यापाशी आलो. दरवाजा वाजवला. दहा पंधरा मिनिटं झाली तरी कोणी दरवाजा उघडला नव्हता. मी त्या गजांच्या खिडकीतून आत डोकं खुपसलं.
मी – कोणी आहे का ? राधा ? ओ परांजपेsss.
घरात खरंच कुणी नव्हतं की मी इथे आलोय म्हणून कोणी दार उघडत नव्हतं ? मी तिथून निघायचं ठरवलं. तोच माझी नजर दारापाशी असलेल्या रांगोळी कडे गेली. रांगोळी अर्धवट काढलेली वाटत होती. नक्की काय प्रकरण होतं ते समजण्याचा काही मार्गच नव्हता. पुन्हा फटफटीवर बसलो. फटफटीवळवून घरी आलो. राधाच्या विचारात कधी माजघरात आलो ते देखील कळलं नाही. आज संध्याकाळी त्यांच्याकडे जाण्याची तयारी आत्ताच सुरू झाली होती. तोच आप्पा आले..
आप्पा – अरे मन्या , होतास कुठे तू ? जा जरा माडीवर. माडीवर आपल्या लागातले आंबे पसरवलेत. त्यांपैकी 2-3 डझन आंब्यांची पेटी तयार कर. वरती बंडू आहेच तुझ्या मदतीला. जा पटकन पळ..
मी माडीवर आलो. बंडू खराब आंबे बाजूला काढत होता. मी आंबे एका लाडकी पेटीत भरायला सुरुवात केली. आज संध्याकाळी राधा आणि मी समोरासमोर बोलू शकणार नव्हतो. राधाशी बोलणं होणं गरजेचं होतं. कसं बोलू शकेन ?
बंडू – काय झालं दादा ? कसल्या विचारात आहात ? एक सांगू का दादा , मलाही आता वाटायला लागलंय की तुम्ही काहीतरी लपवताय. हल्ली खूप शांत असता , तंद्रीत असता..
मी – तुझं इथलं काम झालं असेल तर खाली जा..
बंडूला सुध्दा आता जाणवू लागलं. खरंच ही लपवाछपवी सहन नाही होत आता.
संध्याकाळी मी , आप्पा , विद्याधर काका , प्रभाकर काका आणि श्रीधर राधाच्या घरी आलो. त्यांनी पडवीत बैठक ठेवली होती. आम्ही पडवीत सर्वजण बसलो. राधाचे वडील समोर प्रसन्न चेहऱ्याने आमच्याकडे पाहत होते. त्यामुळे मी अंदाज बांधला की घरात अजूनही काही कळलं नाहीये. मनावरचा एक भार हलका झाला. ओळखीपाळखी सुरू झाल्या. आमच्या समोर गुळपाणी ठेवण्यात आलं. मुलाची विचारपूस वगैरे झाली . मुलाला प्रश्न विचारून झाले आणि काहीवेळाने हातात पोह्यांचे ताट घेऊन राधा साडी नेसून बाहेर आली. मी पहिल्यांदाच तिला हे असं साडीत पाहत होतो. तिला ह्या रूपात पाहून मी घायाळच झालो. किती सुंदर दिसत होती ती ! तिची नजर खाली होती आणि डोक्यावर पदर होता..
क्रमशः
SWA membership no. -51440
®©– Poornanand Mehendale
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा