राधाला असं साडीत मी पहील्यांदा बघत होतो. राधा नजर खाली करून बाहेर आली होती. ती आप्पांच्या जवळ गेली. हातातलं पोह्यांचं ताट ती वाकून देत असताना जोरात ओरडली. तिच्या हातातील पोह्यांचं ताट खाली पडलं. सगळे पोहे जमिनीवर सांडले गेले. तिने पटकन पोटाला हात लावला. आम्ही सगळे तिच्या काळजीने उठलो.
आप्पा – बस.. बस..
आप्पांनी तिला एका लाडकी खुर्चीत बसवलं.
राधाची आई – काय गं ? बरी आहेस ना ?
राधा – पोटात जरासं दुखतंय..
राधाने हळूच माझ्याकडे नजर टाकली. तिच्या नजरेतली भीती माझ्यापासून लपली नाही. सकाळी घरात नसलेली लोकं आता सजून नटून घरात ? काहीतरी घडलंय एवढं नक्की !
श्रीधर – हे धर पाणी पी...
श्रीधरने राधा समोर पाण्याचं भांडं ठेवलं. मला पुन्हा श्रीधरचा राग आला होता पण तेव्हा मात्र राधाच्या प्रकृतीकडे पाहणं गरजेचं होतं.
राधा – बरी आहे मी. थोडसं दुखलं पोटात.
श्रीधर – आराम करा..
आप्पा – मला वाटतं.. आपण आत्ता बोलणी नको करायला. आम्ही दोनतीन दिवसांनी येतो. मुलीला बरं नसताना बोलणी करणं म्हणजे..
निळकंठ – नाही. आत्ता आलाय्त तर आत्ता बोलणी झाल्याशिवाय जायचं नाही.
आप्पा – अहो पण मुलीची ..
निळकंठ – बरी आहे ती. काही नाही झालं तिला...
राधा – हो आहे मी बरी..
राधाची आई – थांबा हा मी पोहे घेऊन येते.
निळकंठ – बसा ना.. राधा तू खुर्चीतच बस..
राधा माझ्यापासून नजर चोरत असल्याचं मी हेरलं. आम्ही सर्व खाली बसलो. आप्पांनी प्रश्न विचारला..
आप्पा – तर राधा , आम्ही चुकीच्या वेळी आलोय असं खरंतर आम्हाला वाटू लागलंय..
निळकंठ – नाही तसं नाही काही.. बरी आहे ती. हो ना गं ?
राधा – अं ? हो.
आप्पा – बरं ठिक आहे.. कितवी शिकलीस ?
राधा – आत्ता फायनल इयर ला आहे.
आप्पा – ह्याला ओळखतेस ?
असं म्हणत आप्पांनी माझ्याकडे हात दाखवला. ती थोडी बावरून गेली असावी यची खात्री पटली. तिने हो म्हणायला वेळ घेतला.
राधा - हो. कॉलेजात आहे माझ्या.
आप्पा – शिक्षणानंतर काय करायचं ठरवलंस ?
राधा – अं..
तिची नजर पुन्हा माझ्याकडे वळली.
आप्पा – घाबरू नको. तुझ्या मनात जे काही आहे ते बिंधास्त सांग.
राधा – शिक्षण संपल्यावर कुठेतरी चांगली नोकरी करणारे. म्हणजे लग्नहोईपर्यंत. सासरकडच्या लोकांना मान्य नसेल तर नाही करणार नोकरी.
श्रीधर माझ्या कानात पुटपुटला..
श्रीधर – अरे आवाज किती गोड आहे हिचा !
तो लाजला पण त्याच्या लाजण्याने मला श्रीधरला मारून टाकावसं वाटत होतं.
आप्पा – तुझी आवड काय आहे ? म्हणजे काय छंद जोपासतेस ?
राधा – गाऊ शकते.
आप्पा – अरे व्वा छान.. तुझं लग्नाबाबत काय मत आहे ?
राधा – लग्न हे एक पवित्र बंधन आहे दोन नात्यांना जोडणारं. लग्न म्हणजे तारेवरची कसरत. घरच्या सूनेने प्रत्येक माणसाची मनं जपत जपत संसाराचा गाडा आपल्या पतीसह ओढणं , लग्न म्हणजे देवाब्राम्हणाच्या साक्षीने दोन जीव साताजन्मासाठी एकत्र येणं.. लग्न म्हणजे घरच्या स्त्रीने घरातल्यांची काळजी घेत स्वतः चं आयुष्य संसाराच्या महासागरात विसर्जित करणं.
आप्पा – ह्या तर पुस्तकी व्याख्या झाल्या ! असो , स्वयंपाक येतो ?
राधा – हो.
आप्पा – मला सांग 10 जणांच्या माणसांसाठी किती वाटी भात ठेवशील ?
राधा – ते खाणाऱ्यांच्या पोटावर अवलंबून आहे पण एवढं नक्की सांगते की जेवणाच्या बाबतीत कुणाच्या ताटात काही कमी नाही पडून देणार.
आप्पा – तुला उद्या 1000 रूपये दिले आणि सांगितलं की तुला हवं ते घेऊन ये.. तर तू काय गोष्टी आणशील ?
राधा – त्या 1000 रूपयांतून संसाराला लागणाऱ्या गोष्टी विकत घेईन..
आप्पा – उदाहरणार्थ ?
राधा – उदाहरणार्थ किराणा.
आप्पा – देवावर कितपत विश्वास आहे ?
राधा – स्वतः वर जेवढा विश्वास नाही त्याहून जास्त विश्वास देवावर आहे.
आप्पा – आमच्या काळी मुली एवढ्या शिकत नसत. आज काळ बदलला असला तरी काही घरात अवस्था तशीच आहे.तू इतकं शिकत आहेस ह्याचं कौतुकच आहे. ह्यापुढे किती शिकणार ?
राधा – असं म्हणतात की माणूस आयुष्य संपेपर्यंत काही ना काही शिकत असतो त्यामुळे आयुष्यभर काही ना काही मी शिकेनच.
एकदा आप्पांकडे तर एकदा राधाकडे पाहता माझी मान मोडल्यात जमा होती.
आप्पा – फारच हुशारकीने उत्तर देत आहेस. प्रभाकर , तुला काही विचारायचंय ?
प्रभाकर – तुझे प्रश्न तेच माझे प्रश्न. मी काय अजून विचारू ?
आप्पा – राधा , तुला काही मुलाला प्रश्न विचारायचेत ?
तिने पुन्हा माझ्याकडे बघितलं.
राधा – नाही.
तिचं नाही ऐकून श्रीधर चा चेहरा थोडासा मावळला.
निळकंठ – मुलाला जर मुलीशी एकांतात बोलायचं असेल तर तुम्ही बागेत जाऊ शकता....
श्रीधर – ह..
तो काही बोलणार तोच राधा मध्येच म्हणाली
राधा – नाही . मला तरी काही नाही बोलायचंय..
श्रीधर – पण मला बोलायचं असेल तर ?
निळकंठ – राधा , जा जरा..
श्रीधर आणि राधा दोघे उठले.. कदाचित बागेत गेले असावेत. मला त्यांच्यातलं बोलणं ऐकायचं होतं. बैठकीतून उठूही शकत नव्हतो. म्हणजे उठण्याची हिंमतच होत नव्हती.
खूप वेळानंतर राधा आणि श्रीधर बैठकीत आले.. राधा थोडी थकलेली दिसत होती. थोडी दु:खी होती. श्रीधर मात्र आनंदात होता..राधाने यावेळी जवळपास माझ्याकडे दुर्लक्ष केलं होतं..पण काहीही झालं तरी माझ्यावरच्या प्रेमापोटी ती ह्या लग्नाला नकार देणार ह्याची खात्री होती. आप्पा विद्याधर काका आणि प्रभाकर काकाशी हळू आवाजात बोलू लागले .
आप्पा – आम्हाला तरी मुलगी पसंत आहे..
निळकंठ – माझं भाग्यच म्हणायचं हे कि तुमच्या सारख्या देवमाणसाची सून माझी राधा होईल..
आप्पा – राधा , तुझाही होकार समजू ना ?
राधा – हो मला पसंत आहेत... श्रीधर.
राधाच्या डोळ्यात पाणी दाटलं. माझ्या प्रेमाची किंमत राधाच्या मनात शून्य होती ? राधाने का होकार दिला ?
क्रमशः
SWA membership no. 51440
®©Poornanand Mehendale .
®©Poornanand Mehendale .
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा