चक्रव्यूह भाग 24
निळकंठ – मुलाला मुलगी पसंत आहे म्हटल्यावर एक भार हलका झाला.. आता आमची एक अट आहे ?
विद्याधर – अट ? कसली ?
निळकंठ – लवकरात लवकर लग्न व्हावं एवढीच काय ती अट..
आप्पा – काळजी नका करू.. तिचं हे शेवटचं वर्ष आहे ना ? एकदा परिक्षा झाली कि लगेच लग्न उरकून देऊ. बाकी आम्हाला हुंडा वगैरे काही नको. त्यामुळे त्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा.
निळकंठ – हो पण तरीही.. मला पुढील महिन्याभरात हिचं लग्न करायचंय ?
आप्पा – अहो , कशाला इतकी घाई ? थोडे महीने थांबू की..
निळकंठ – हे बघा , सावंतवाडीत माझी आई आहे.. तिची अवस्था बिकट आहे. तिच्या डोळ्यासमोर लग्न झालं तर समाधानी होईल ती.
हे खरं कारण नाही हे माझ्या लक्षात आलं होतं.
आप्पा – बरं ठिक आहे. एक चांगला मुहूर्त पाहून लगेच साखरपुडा उरकू.
राधाची आई – शक्यतो ह्या आठवड्यातलाच बघा मुहूर्त !
एक क्षण आप्पाही शांत बसले. कदाचित त्यांना शंका आली असावी.
प्रभाकर – ठिक आहे.. तुम्ही म्हणताय तसं होईल.
काका आप्पांच्या निर्णयापुढे बोलून मोकळा झाला.. पोहे वगैरे खाता खाता सर्व गोष्टींबाबत चर्चा केल्यानंतर आम्ही त्यांना भेटवस्तू देऊन निघू लागलो. मी फक्त राधाकडे पाहत होतो. ती रडकुंडीला आली होती. मी काही बोलूच शकत नव्हतो. हिंमतच होत नव्हती. सगळं काही संपणार ही भीती मनात होती. त्यांचा निरोप घेतला आणि आम्ही निघालो.
मी आता आराधना कडे एकटक पाहत होतो. डोळ्यातलं पाणी सुकून गेलं होतं.
आराधना – तुला तुझा भूतकाळ हळूहळू आठवतोय हे चांगलंच आहे आपल्या दोघांसाठी. हे काळानं आखलेलं चक्रव्यूह आहे.. जसा तुला भूतकाळ आठवत जाईल तसा तू त्या भूतकाळाच्या चक्रव्यूहात अडकत जाशील !
मी – तू असं का बोलतेस ? मला माझा भूतकाळ आठवू लागलाय हे चांगलंच आहे की.
आराधना – जेव्हा घडून गेलेल्या घटनांची उजळणी करशील तेव्हा तुला जाणवेल की भूतकाळ आठवत नव्हता तेच बरं होतं. मी एक ऑब्सर्व केलंय. त्या अँक्सिडेन्ट नंतर तुझ्यात थोडा बदल झालाय.
मी – तू मला कधीपासून ओळखतेस ?
आराधना – तू स्वतः ला ओळखत नसल्यापासून.
मी – म्हणजे ?
आराधना – अजून अनेक घडून गेलेल्या गोष्टींची उजळणी करणं बाकी आहे. त्यातच तुला समजेल. तुम्ही त्यावेळी आईच्या घरातून निघालात आणि तुला दोन दिवसांनी तुझ्याच घरी सर्व हकीकत समजली .
मी – हे सुध्दा..
आराधना – म्हणाले ना , मला सर्व काही माहीत आहे.
तिच्या आणि श्रीधरच्या लग्नाची बोलणी होऊन दोन दिवस उलटले . तिच्या आणि श्रीधरच्या लग्नाची बोलणी होऊन दोन दिवस उलटले . आमच्याकडे 5 दिवसांचा गणपती असायचा. आप्पांनी गणेश चतुर्थी निमित्त राधा व तिच्या आई वडीलांना घरी बोलवून घेतलं. गणपतीच्या आगमनाने घरातलं वातावरण कितीही प्रसन्न वाटत असलं तरीही मी मात्र निराश होतो. आता सगळं काही सुरळीत करणं हे गणरायाच्या हातात होतं. राधा पहिल्यांदाच घरी आली होती. घराला न्याहाळत होती. पडवी , ओटी , माजघर , सारवलेली जमिन हे काही तिच्यासाठी नवीन नव्हतं. आरतीची वेळ झाली होती. घरातील सर्व मंडळी आरतीसाठी माजघरात गणरायाच्या मूर्तीसमोर उभी राहीली. राधा ह्यावेळी माझ्याकडे पाहतच नव्हती. श्रीधर मात्र आरती म्हणत म्हणत राधाकडे पाहत होता. मला त्याचा राग येत होता. हा माझ्या प्रेमकहाणीतला खलनायक आहे असं वाटत होतं. त्यादिवशी काहीही करून राधाशी बोलणं गरजेचं आहे. कसं बोलावं एवढे सगळे समोर असताना ?
आरती झाली .. गणपतीला सर्वांनी नमस्कार केला. कसं बोलावं राधाशी ? मी सर्वांना प्रसाद देऊ लागलो .. आणि राधाने हात समोर केला. तिची नजर मात्र खाली झुकलेली होती.तिच्या हातावर प्रसाद देताना देखील माझे हात थरथरत होते..पंगत वाढण्यासाठी घरातल्या महीला मंडळासह राधाची आई स्वयंपाक घरात गेली..त्यांच्यामागून राधा सुध्दा आत गेली. आप्पा आणि राधाचे बाबा गप्पा मारत मारत बाहेरच्या पडवीत जाऊन बसले होते. त्यांच्यासोबत श्रीधर , विद्याधर काका , प्रभाकर काका सुध्दा बाहेर गेले. ह्या घरात राधाशी बोलता येणार नव्हतं .. अजून एक कल्पना माझ्या डोक्यात आली. मी माडीवर आलो. दप्तरातून वहीचं पान फाडलं.. आणि लिहू लागलो , “ राधा , मला.तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचंय. गोष्टी हातातून अजूनही निसटल्या नाहीत. मला राहून राहून वाटतंय की काहीतरी चुकतंय. तुझ्या नजरेतली भीती सगळं काही सांगत आहे. मला माहीत आहे की तुला हे लग्न मान्य नसणार. मला उद्या मंदीराच्या पाठी येऊन भेट सकाळी 10 वाजता. बरंच काही बोलायचंय. मला खात्री आहे की तू येशील. आपल्या बाळासाठी!”
वहीचा कागद फाडला.. त्या कागदाची घडी केली आणि माडीवरून खाली आलो. पाणी पिण्याच्या निमित्ताने स्वयंपाक घरात गेलो. राधासह घरातील सर्व महीलामंडळ पंगतीची तयार करण्यात गुंग असल्याने मी आधी शांतच तिथे उभा होतो. राधा व तिची आई गप्पा मारत होत्या. आमच्या घरातल्या महीला त्यांना काम करून देत नव्हता म्हणून त्या दोघी तिथे नुसत्याच उभ्या. आत्ता चिठ्ठी कशी देऊ राधाला ? एकच पर्याय.. आसावरी.
मी – आसावरी , जरा इथे ये ना..
आसावरी – काय रे ? इथे कशाला लुडबूड करतोस ?
मी – अगं इथे ये तरी..
आसावरी – सांग ना ..
आसावरी बायकांच्या घोळक्यातूनच बोंबलत होती. शेवटी तिचा हात पकडून मी तिला माजघरात घेऊन आलो.
आसावरी – काय आहे ? कशाला खेचत आणलंस बाहेर ?
मी – हळू बोल हळू बोल..
आसावरी – काय झालं एवढं ?
मी – माझं महत्वाचं काम आहे तुझ्याकडे .
आसावरी – काय ?
मी – ही चिठ्ठी राधाला दे..
आसावरी – काय ? राधाला ? तू का देतोय्स ही चिठ्ठी तिला ? आणि काय आहे ह्या चिठ्ठीत ?
मी – अगं , श्रीधरने दिल्ये. उगाच त्याचं काही खाजगी आपण कशाला वाचायचं , बघायचं ना ! मलाही नाही माहिती ह्या चिठ्ठीत काय आहे ते.. म्हणाला की गुपचूप राधाला दे कुणाच्याही नकळत.
आसावरी – पण चिठ्ठी लिहायची काय गरज त्याला ? ती आणि तो एकाच छताखाली आहेत ना.. मग चिठ्ठी वगैरे म्हणजे .
मी – अगं घरात इतकी माणसं असताना ती दोघं एकमेकांशी बोलायला कचरत असशील ?
आसावरी – त्यात काय ? होणारे नवरा बायकोच आहेत ते.
मी – अजून झाले नाहीयेत ना ? आता जास्त प्रश्न न विचारता तिला चिठ्ठी दे गुपचूप.
आसावरी – एकच मिनिट. त्याने ही चिठ्ठी तुला कधी दिली रे ? आणि त्याच्या वतीने तू का देत नाहीस तिला ?
मी – अगं , संध्याकाळी दिली होती त्याने चिठ्ठी . म्हणाला की तू दे ही चिठ्ठी काहितरी कारण देऊन.. तो आधीच अवघडला होता म्हणून मी हो देतो म्हणालो. आता ह्या बायकांच्या गोंधळात तिला चिठ्ठी देण्यासाठी मी अवघडलोय.
आसावरी –बरं . दे चिठ्ठी . मी देते.
मी – आणखी एक.. तू राधाला चिठ्ठी दिलीस हे श्रीधरला सुध्दा कळता कामा नये कारण त्याने ही जबाबदारी फक्त माझ्यावर सोपवलेली पण आता हे करणं मला नाही शक्य होणार असं त्याला कळलं तर तो चिडेल माझ्यावर.
आसावरी – तू श्रीधर दादाला कधीपासून घाबरायला लागलास रे ?
मी – तू चिठ्ठी देणार की नाही ते सांग..
आसावरी – देते.
मी आसावरीला चिठ्ठी दिली पण मी फसणार नाही ना याची एक नवी भीती वाटू लागली. आम्ही थोड्या वेळानं पंगतीवर बसलो. आसावरी माझ्या पानावर तूप वाढायला आली आणि तिने माझ्या कानात सांगितलं..
आसावरी – दिली चिठ्ठी.
राधा माझ्यासमोरच जेवत होती. माझ्या घरात पहिल्यांदाच. ती मुद्दाम माझ्याकडे दुर्लक्ष करत होती पण चला , एक टप्पा पूर्ण झाला. आता उद्या खरं काय ते नक्की कळणार ह्या आशेवर मी होतो..
क्रमशः
SWA membership no. 51440
®® Poornanand Mehendale
कथा कशी वाटत आहे ते नक्की कळवा.
SWA membership no. 51440
®® Poornanand Mehendale
कथा कशी वाटत आहे ते नक्की कळवा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा