Login

चक्रव्यूह भाग 25

रहस्यमय कथा
चक्रव्यूह भाग 25


   सकाळी सकाळी लवकर तयार होऊन मी आमच्या गावातल्या देवळाच्या मागे येऊन थांबलो. मंदीर हे एका टेकडीवर होतं. एका बाजूला समुद्र होता. समुद्राच्या लाटांचा आवाज कानावर घुमत होता. मी बरोबर दहा वाजता येऊन तिची वाट पाहत तेथील आंब्याच्या झाडाखाली बसलो. मळभ दाटलं होतं. मुसळधार पाऊस पडणार होता. राधा नक्कीच येणार हा आत्मविश्वास होता आणि ती आलीच. पटापट पावलं टाकत पण नजर खाली घालून ती माझ्यापर्यंत आली. तिचा चेहरा अजूनही रडका दिसत होता.

मी – मला माहीत होतं की तू येशील ! कशी आहेस ? आपलं बाळ कसं आहे ?

राधा नजर वर करून रागाने माझ्याकडे पाहत होती.

राधा – तुला काहीच माहीत नाहिये कि माहीत नसल्याचं नाटक करतोय्स ?

मी – म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला ?

राधा – आता काही सांगून उपयोग नाहीये. मी फक्त तुला जाब विचारायला आलीये इथे.

मी – आता हे काय नवीन ? काय झालंय ते मला स्पष्ट सांग .

राधा – मला विसरून जा , मी कधीच तुझा होऊ शकत नाही.. आता हातून सगळं निसटून गेलंय वगैरे वगैरे असं तूच म्हटलास ना ? एका बाजूला सोबत असण्याची स्वप्न दाखवलीस आणि अचानक माझ्या बाबतीत का वागलास असं ? का फसवलंस मला ? तू माझ्या सोबत होतास म्हणून वाईट  प्रसंगांना हसतमुखाने सामोरी जाऊ शकत होते.. नालायक , जराही काळजी नाही का वाटली मला फसवताना ?

रागाच्या भरात तिने माझ्या शर्टची कॉलर पकडली होती.

मी – हे काय बोलत्येस तू ? तुझं तुला तरी समजतंय का ?  मी कधी फसवलंय तुला ? भानावर आहे ना तुझं डोकं ? तुला फसवण्याचा विचार माझ्या स्वप्नातही येणार नाही कधी ! उलट तू श्रीधर ला होकार देऊन मला धक्काच दिलास. तू असं का वागलीस हे विचारण्यासाठी मी तुला इथे बोलावलंय !

राधा – एका बाजूला म्हणतोस की श्रीधरला होकार दे आणि आता विचारतोय्स की मी असं का वागले..

मी – एकच मिनिट. मी कधी म्हणलो गं तुला श्रीधरला होकार दे म्हणून ?

राधा – सदा काकांकडे तूच निरोप दिलास ना ?

मी – मी कुणाहीकडे कसलाही निरोप दिला नाही.

राधा – खोटं बोलणं थांबव आता. तुझ्या ह्या खोटेपणाचा त्रास होतोय मला.

मी – मी तुझी शप्पथ घेऊन सांगतो की मी कुणालाही कसलाही निरोप नाही दिला.

राधा – म्हणजे सदाकाका बोलले ते खोटं होतं ?

मी – तू कसं ओळखतेस सदाकाकाला ?

राधा – एकाच गावात , एकाच वाडीत राहतो रे आपण.. सदाकाका तुमचा विश्वासू नोकर आहे ते माहिती आहे अख्या गावालाच.

मी – बरं , सदाकाका काय म्हणाला ? आणि सगळं सविस्तर सांग !

राधा – त्या दिवशी आपण डॉक्टरांना भेटलो ना , त्यादिवशी मी घरात सगळं काही सांगितलं. आपल्या नात्याबद्दल , आपल्या बाळाबद्दल.

मी – बावळट आहेस का तू जरा ? काय म्हणाले घरचे.

राधा – काय म्हणणार ? नाक कापलं मी त्याचं. आई बाबा शिव्या शाप देऊन मोकळे झाले. अबोर्शन कर म्हणून मागे लागले पण मी नकार दिला. बाबा मारायलाच निघाले मी शेण खाल्लं म्हणून . आई मध्ये पडली म्हणून मी वाचले. घराबाहेर हाकल्लं नाही ते नशीब ! उलट घराबाहेर जाणं त्यांनी बंद करून टाकलं माझं. त्यादिवशी बाबांना पहिल्यांदा मी रडताना पाहिलं. तुझ्याविषयी चौकशी करत असताना तुझ्या वडीलांचं नाव ऐकूनच ते शांत झाले.

मी – मग ? पुढे ?

राधा – नाही ! पुढे माझ्याशी ते बोलायचे बंद झाले. दुसऱ्या दिवशी मी माड्यावर असताना घराच्या समोरून तुमचा सदाकाका जाताना दिसला. मी पटकन एक चिठ्ठी लिहीली तुझ्यासाठी. बाबा देवपूजा करत होते आणि आई स्वयंपाक. दोघांची नजर चुकवून मी घरा बाहेर पडले. सदाकाकांना गाठलं. सदाकाकांना ती चिठ्ठी दिली. त्यांना सांगितलं की ही चिठ्ठी मनोहर शिवाय दुसऱ्या कुणालाही देऊ नका. त्यांनी मला अनेक प्रश्न विचारले पण मी मात्र उत्तरं द्यायला टाळाटाळ केली. चिठ्ठी देतो म्हणाले आणि तिथून निघून गेले.

मी – असं काय लिहीलं होतंस चिठ्ठीत ?

राधा – हेच की आईबाबांना आपल्या प्रेमाबद्दल , आपल्या नात्याबद्दल मी सांगितलंय. ते खूप दुखावले गेलेत. अबोर्शन कर म्हणत आहेत. तू एकदा येऊन भेट स्वतः.... ते आपल्या एकमेकांना भेटून देणार नाहीत . तरीही ये. असं होतं चिठ्ठीत.

मी – पहिली गोष्ट.. माझ्याकडे अशी चिठ्ठी अजिबात आलेली नव्हती. सदा काका बहुतेक चिठ्ठी द्यायला विसरला आणि हा घोळ झाला असणार..

राधा – पण तू सदा काका कडून आलेल्या निरोपाचं काय ?

मी – सदा काकाने काय निरोप दिला तुला ?

राधा – मी चिठ्ठी दिल्यानंतर 2 तासांनी सदाकाका माझ्या घराच्या कवाडीवर मला हाका मारत होते... त्यांच्या हाकेने माझ्याआधी माझे बाबा त्याच्या पर्यंत जाऊन पोहचले. त्यांनी सदाकाकाला ओळखलं. बाबांना तेव्हाच संशय आला होता. मी लगेच धावत आले आणि परिस्थिती सावरली. खूणेनेच सदाकाकाला जायला सांगितलं. तो गेला पण तुमचा नोकर आमच्या दारात आल्याने बाबांना दाट संशय आला. काही माझ्याशी बोलले नाहीत.. त्यांची नजर सारं काही सांगून जात होती. नंतर पुन्हा एकदा घरच्यांची नजर चुकवून मी सदाकाकाला संध्याकाळी भेटले. तो तुमच्या लागात होता. तेव्हा त्याने तू दिलेला निरोप सांगितला की , तुला माझ्याशी काही बोलायचं नाहीये , भेटायचं नाहीये , तू माझ्या भावाशी लग्न कर , मला विसरून जा. वगैरे वगैरे .. असं बरंच काही.

मी – मुळात मी असं काही बोललो नाही. मला ह्यात वेगळीच भानगड दिसत्ये. हे सगळं सदाकाकाने तुला सांगितलं ना ते सगळं खोटं आहे. सदा काका का असा वागला ? आमचा खूप विश्वासू नोकर आहे तो.. नोकर नव्हे तर आमच्या घरातलाच आहे तो.

राधा – म्हणून तर मी त्याला चिठ्ठी दिली.

मी – उलट तू घोळ घालून ठेवलेस खरं बोलायच्या नादात . जर तू घरी सांगितलं नसतंस तर हे सगळं पुढचं रामायण घडलं नसतं. आणि एक .. मी त्यादिवशी सकाळी तुझ्या घरी तुला भेटायला आलेलो.. तेव्हा कुठे होतात तुम्ही सगळे ? दाराला कुलूप नव्हतं पण दार लोटलं गेलं होतं. दाराबाहेरची रांगोळी सुध्दा अर्धवट होती.

राधा – त्या दिवशी बाबांनी मला पहिल्यांदा मारलं.

मी – काय ?

राधा – मी सकाळी रांगोळी काढत होते.. मला पुन्हा सदाकाका जाताना दिसला.. तुला नक्की काय झालंय हे विचारण्यासाठी रांगोळी अर्धवट ठेवून मी त्याला गाठलं. तोच मागून बाबा आले आणि भर रस्त्यातून ओढत घरात घेऊन आले. दरवाजा बंद केला आणि वेताच्या छडीने हातावर मारू लागले.. आई मला वाचवू लागली तर तिलाही मारहाण झाली. तोच तुझा आवाज आमच्या कानावर पडला. तू हाक मारता क्षणी मी तुला भेटायला येणार तोच बाबांनी अडवलं. तोंडावर हात ठेवला. आईलाही गप्प बसायला लावलं. तू गेल्यावर बजावून सांगितलं की त्याला भेटायचं नाही म्हणून..

मी – काय होऊन बसलं हे राधा.. मला वाटत होतंच काहीतरी नक्की घडलं असणार.. तुझ्या बाबाचं एक वेळ मी समजू शकतो पण आमचा सदाकाका ? सदाकाकाचा काय संबंध ? असं का वागला तो ? आणि तुला अक्कल नव्हती का ? त्याच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवलास ! मी असं फसवेन असं वाटूच कसं शकतं तुला ? तू माझं पहिलं प्रेम आहेस राधा.. तुझ्या पासून लांब जाण्याचा विचार सुध्दा माझ्या मनात येत नाही गं कधी. तू सरळ लग्नालाही तयार झालीस ? जराही तेव्हा मला प्रत्यक्ष भेटून बोलावसं वाटलं नाही ? अगं नजर चुकवून त्या सदाकाकाला भेटायला जाण्यापेक्षा नजर चुकवून मला भेटायला आली असतीस तर परिस्थिती सहज बदलता आली असती आणि आत्ता कशी आलीस मला भेटायला ? तुझ्या बाबांनी पण मस्त गेम केला .. माझ्याच भावासोबत तुझं लग्न लावून देण्याचा.. हे म्हणजे माणूस जिवंत असूनही त्याला चितेवर ठेवण्यासारखंच आहे .

राधा – हे बघ , तेव्हा मी खूप गोंधळून गेले होते.  आत्ताही मी घरातून पळ काढून आल्ये तुला भेटायला . तुला जाब विचारायला आले होते पण इथे गोष्टी सगळ्या उलट्या आहेत हे लक्षात आलंय.

मी – अवघड. सगळं अवघड करून ठेवलंस तू. तुझ्या लक्षात येतंय का ? सदा काकाला आपल्या नात्याविषयी माहिती आहे. तो आपल्यात काडी लावतोय. त्याच्या आणि तुझ्या घरातल्यां व्यतिरिक्त अजून किती लोकांना माहीत असेल याबद्दल ? खूप मोठं रहस्य दडलंय यामागे.

राधा – ह्या सगळ्यावर आता उपाय शोधावा लागणारच..

मी – हे बघ , तू नको उगाच चिंता करू. मी करतो विचार.. मला वाटतं आप्पा आणि श्रीधरला सुध्दा आपल्या नात्याबद्दल माहीत असणार..हे सगळं डावपेचांचं चक्रव्यूह आखलंय कुणीतरी आपल्याला अडकवण्यासाठी . पहिलं ह्या सदाकाकाला भेटलं पाहीजे..

क्रमशः
SWA Membership no 51440
Written by Poornanand Mehendale
Poornanandmehendale123@gmail.com

🎭 Series Post

View all