Login

चक्रव्यूह भाग 29

काळाचं रहस्यमय चक्रव्यूह



        सकाळी सकाळी गावचे पोलिस पाटील -  तुकाराम तावडे आणि ग्रामस्थ हरी लिमये , विष्णू कांबळे यांच्या साक्षीने आबांनी केलेल्या मृत्यूपत्राचं वाचन माजघरात सुरू झालं.

तावडे – तर , आबांनी मृत्यूपत्र केलंय ते मी ह्या गावचे ग्रामस्थ हरी लिमये आणि विष्णू कांबळे व तुम्हा सर्व जोशी परिवाराच्या साक्षीने वाचून दाखवतो.

ते अतिशय गंभीर आवाजात मृत्यूपत्र वाचू लागले.

तावडे – मी खाली सही करणार श्री . त्र्यंबक काशिराम जोशी . रा. ब्राह्मणवाडी ,जालगाव , दापोली. जि. रत्नागिरी .

      माझे संपूर्ण बालपण ब्राह्मणवाडीतच गेलेले असून ही संपूर्ण मालमत्ता वडीलोपार्जित आहे. माझ्या वडीलांनी स्वखुशीने मालमत्ता आम्हा भावडांच्यात म्हणजे मी – त्र्यंबक काशिराम जोशी , माझा दुसरा सख्खा भाऊ – चंद्रकांत काशिराम जोशी , तिसरा – प्रभाकर काशिराम जोशी व चौथा विद्याधर काशिराम जोशी तसेच माझ्या चुलत सख्या बहीणी इंद्रायणी मोरेश्वर जोशी , कुसूम मोरेश्वर जोशी , निलांबरी मोरेश्वर जोशी यांच्यात समान हक्काने नावावर केली होती.

    पैकी माझ्या वाट्याला आलेला समान भाग म्हणजे मी राहत असलेलं संपूर्ण घर , घराच्या मागे असलेली माड – पोफळींची बाग , विहीर , पाट हे माझ्यानावे माझ्या वडीलांनी केलं होतं.

       आज दिनांक 26 जानेवारी 1990 रोजी मी माझ्या वाट्याला असलेल्या मालमत्तेतील अर्धा भाग म्हणजे हे राहतं घर माझा पुतण्या श्रीधर प्रभाकर जोशी याच्या नावे माझ्या पश्चात असेल हे मत मी स्वखुशीने व स्वमर्जीने घेत आहे.

   तसेच माझ्या पश्चात माझ्या नावे असलेली संपूर्ण बाग , विहीर व पाटाचे पाणी हे माझा विश्वासू नोकर बंडू च्या नावे करत आहे..

     माझ्या वरील मालमत्तांवर माझ्या भावंडांचा काडीमात्र हक्क राहणार नाही कारण माझ्या वडीलांनी त्यांचे नावे आधीच आमची इतर मालमत्ता केलेली आहे जसे लाग , शेतजमीन , सावंतवाडीचे घर , सावंतवाडीतील शेतजमीन .. अशा अनेक गोष्टी वडीलांनी आधीच माझ्या भावंडांच्या नावे केलेल्या आहेत. राहता राहीला प्रश्न तो म्हणजे माझा मुलगा व पत्नीचा . माझी पत्नी हयात नसल्याने तिच्या नावे मालमत्ता करूच शकत नाही. माझा मुलगा मनोहर जोशी हयात आहे , सज्ञान आहे परंतु त्याच्या नावे माझ्या पश्चात मालमत्ता करण्याची माझी वैयक्तिक इच्छा नाही त्यामुळे  माझ्या पश्चात माझी मालमत्ता त्याच्या मालकीची होणार नसली तरी तो त्या मालमत्तेत श्रीधर जोशी व माझा नोकर बंडू ह्यांच्या मर्जीने  नक्कीच राहू शकतो.

     वरील मृत्यूपत्र मला मान्य असून मी हे मृत्यूपत्र लिहीताना माझ्यावर कुणी कसलाही मानसिक शारीरिक दबाव टाकला नसून कायदेशीररित्या मी माझ्या स्वमर्जीनेच मृत्यूपत्र लिहीले आहे. सही करणार – त्रं. का. जोशी.

 

         मला समजेना हे नक्की काय झालं ? माझ्याच बाबतीत असं का घडतं ? आप्पांनी जाणूनबुजून माझ्यानावावर का काहीच नाही ठेवलं ? हा माझा बापच नाही. स्वतः च्या पोटच्या मुलाच्या ओंजळीत दु:खं ठेवून गेले आप्पा. अख्खं आयुष्य सगळं बरबाद केलं . मृत्यूपत्र वाचल्यावर सर्वजणं माझ्याचकडे पाहत होते. सर्वांनाच आप्पांच्या अशा वागण्याचा धक्काच बसला असावा . पुन्हा एक रहस्य.. आप्पा असं का वागले ? मी काय बिघडवलं त्यांचं ?  आत्ता अजून एक कोडं सोडवायचं होतं..

       वाचन झालं. सगळे आपापल्या कामाला लागले. कुणी ह्या मृत्यूपत्राबाबत हरकत देखील घेतली नाही. मी देखील नाही. मी बोलूच शकलो नाही. आप्पा असं का वागले हाच विचार मनात घुटमळत राहीला.. श्रीधर मात्र माझ्यापाशी येऊन बसला.

श्रीधर – आप्पांनी असं का केलं याचा विचार करतोय्स ना ? ऐक नको उगाच डोक्याला ताण देऊ..

मी – ताण देऊ नको म्हणजे ? अरे पोटचा मुलगा आहे मी त्यांचा . माझाही हक्क आहेच की थोडाफार त्यांच्या संपत्तीवर ! हा मान्य आहे की आपल्या मुलानं स्वतः च्या पायावर उभं राहीलं पाहीजे हे प्रत्येक बापाचं स्वप्न असतं. माझंही तेच स्वप्नं आहे रे पण तरीही आप्पांनी केलेली ही गोष्ट खुपते मनात. श्रीधर , खरंच नालायक आहे का रे मी ?

श्रीधर – अरे , आप्पांनी हे घर माझ्या नावे केलंय.. जे माझं तेच तुझं रे . कशाला उगाच ताण देतोस ?

मी – अरे तुला नाही कळणार किती यातना होताय्त मला ते ! ह्या मृत्यूपत्रातच दिसतंय आप्पाचं माझ्यावर किती प्रेम आहे ते .

श्रीधर – समजू शकतो. तू एक काम कर.. तू मस्तपैकी तयार हो. आपण तुझ्या राधाकडे जातोय.

मी – ती तरी कुठाय माझ्या आयुष्यात ?

श्रीधर – अरे वेड्या , मी आहे ना .. तू ठेव जरा माझ्यावर विश्वास . माझ्यावर आहे ना विश्वास ?

मी – हं. निदान तू तरी आप्पांसारखं वागणार नाहीस.

श्रीधर – हो ना ? मग चल .. हो पटकन तयार . आपण जाऊ लगेच राधाकडे..

        श्रीधर मला लहान बाळाला समजवतात तसं समजावत होता. मी तयार झालो आणि फटफटीवर बसून राधाच्या घराच्या दिशेने वळालो. श्रीधर माझ्या मागे बसला होता.  

श्रीधर – हे बघ , राधाचे बाबा थोडे चिडतील पण तू उगाच लगेच डोक्यात राग घालून घेऊ नकोस..

मी – नाही . मी माझ्या रागावर ठेवेन नियंत्रण .

श्रीधर – मला तुझ्या रागाची भीती आहे बाकी काही नाही.

तोच समोरून एक मुलगी धावत येताना दिसली. पोटावर हात ठेवून जोरजोरात धावत गाडीच्या दिशेने आली. जवळ आली तेव्हा कळलं की ती राधा आहे. तिच्या हातावर वळ होते. मी गाडी थांबवली.

राधा – श्रीधर.. मनोहर..

मनोहर – काय झालं राधा ? अशी धावत का येत्येस ?

ती श्रीधरकडे पाहत धापा टाकत होती.

मनोहर – अगं , त्याला आपल्या नात्याबद्दल सांगितलंय सगळं.. काय झालं तुला ते सांग मला..

तिची नजर माझ्याकडे वळाली. तिने भर रस्त्यावर मला एक घट्ट मिठी मारली . मी देखील तिला मिठीत घेत म्हणालो. 

मी – शांत हो. काय झालंय मला सांग !

राधा – बाबांनी आज पुन्हा मला अबोर्शन करण्यासाठी बळजबरी केली. मारलं मला. आई मध्ये पडली तर तिलाही मारहाण केली.

मी – तुझे वडील तुझ्याशी वाईट वागले आणि माझे वडील माझ्याशी वाईट वागले.

राधा – मी आत्ता तुझ्याचकडे येत होते. मन्या , मी घरातून पळून आल्ये. मला नाही सहन होत हे सगळं. मला फक्त आता तू हवाय्स.. तू मला घेऊन चल.. बाबा मला मारून टाकतील.. ते सारखे अबोर्शन कर म्हणताय्त रे.. मला हवाय माझ्या पोटात वाढणारा जीव.

मी – नको रडू.. मी आहे ना आता.. काही नाही होणार..

श्रीधर – ऐका , एक आयडिया आहे..

मी – काय ?  

क्रमश :

SWA membership no. – 51440
®© पूर्णानंद मेहेंदळे

🎭 Series Post

View all