Login

चक्रव्यूह भाग 32

काळाचं एक विलक्षण चक्रव्यूह



चक्रव्यूह भाग 32
 मी – राधा आणि मी तेव्हा तुझ्या भावी आयुष्याची स्वप्नं पाहत होतो आणि तिचे बाबा थेट माजघरात आले ओरडत. दारूच्या नशेत काहीतरी बरळत होते. राधाला घेऊन जाण्यासाठी आलेले. मला वाटलं की त्यांनी सगळं स्वीकारलंय पण तसं काही नव्हतंच.. राधाच्या पळून जाण्यापासून बहुतेक त्यांची मानसिक परिस्थिती बिघडली होती. त्यावेळी त्यांच्या अशा अचानक येण्याने तू रडायला लागलीस. घरातील आम्ही सर्वच जणं त्यांना असं नशेत बघून हादरलो होतो. एक सभ्य माणूस आज दारूच्या नशेत ऐन सांजेला तमाशा करत होता. ते तुला उचलून घ्यायला निघाले पण मी त्या़ंना अडवलं.. आमच्या बाचाबाची झाली पण शेवटी ते राधाचे वडील म्हणून मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवलं. त्यांना खूप समजवू लागलो आम्ही सगळेच. त्यांनी राधाचा हात पकडला ते राधाला खेचू लागले.. सगळ्यांनी त्यांना अडवलं.. त्यांची अवस्था बघता त्यांना त्यांच्या घरात सोडणं अवघड वाटत होतं. म्हणून रात्री त्यांना इथे घरीच बाळंतीणीच्या खोलीत डांबून ठेवलं. रात्री खूप वेळ ते ओरडत होते पण शेवटी शांत झोपी गेले. सकाळ झाली . त्यांची दारूची नशा उतरली तरीही ते वेड्यासारखं बोलत होते.. म्हणाले की तू अडकलास पूर्णपणे .. आम्ही सर्वजण बेसावध असताना त्यांनी तुला उचललं पाळण्यातून आणि ओटीवर आले. आम्ही त्यांना अडवलं.. शेवटी मीच काहीतरी करून तुला माझ्या ताब्यात घेतलं आणि राधाकडे दिलं. तिचे बाबा तुला मारून टाकायलाच निघाले होते. तुझ्याविषयी घाणेरडं बोलू लागले. आपल्या मुलीविषयी वाईट कुठला बाप ऐकून घेईल ? नाही सहन झालं मला. त्यांचा गळा सगळ्यांसमोर आवळला आणि त्यांचं डोकं त्या खांबावर 5 – 6 वेळा आपटलं. सगळ्यांनी अडवायचा प्रयत्न केला पण काही उपयोग नाही झाला त्याचा. माझ्यात गुन्हेगारी वृत्ती जागृत झाल्याने सगळेच हादरले होते. आता पोलिस केस होणार हे माहीत होतं. तरीही त्या गोष्टीची मला भीती वाटलीच नाही. माझा रागावरचा ताबा सुटला आणि अजून एक खून माझ्या हातून घडला तेही सगळ्यांसमोर... ओटीवर त्यांचं रक्त असं पसरलेलं होतं.. सगळे कसे शांत. डोळ्यातच त्यांच्या भीती दिसत होती. हा सगळा प्रकार पाहून राधाला धक्काच बसला. विद्याधर काका , प्रभाकर काका , बंडू सगळ्यांना माझा राग आलेला अगदी राधालाही.. पण भीतीने सगळेच थरथरत होते. ह्या भव्य घरात भीतीने थरकाप उडाला होता तरी नशीब आप्पा माझ्यामुळे दरीत पडले हे नव्हतं माहिती कुणाला पण एक गोष्ट मला कळली नाही मला कुणीच पोलिसांच्या हवाली नाही केलं. तिच्या वडीलांवर अंत्यसंस्कार करताना ते अपघाताने वारले असंच सर्व गावाला सांगण्यात आलं. आसावरी तेव्हा तिच्या सासरी होती. तिला ह्या प्रकाराबद्दल कळालं तेव्हा ती ताबडतोब इकडे निघून आली. तिच्या वडीलांवर अंत्यसंस्कार झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी मी विहीरीवर पाणी काढायला गेलो.. रहाटाने पाणी काढत असताना माझी नजर त्या पाण्यात गेली. पाहतो तर राधाचा देह पाण्यावर तरंगत होता. तेव्हाच सगळं काही संपलं असं वाटू लागलं. जाता जाता तिने एक चिठ्ठी लिहीली होती.. “ गुन्हेगार असलेल्या नवऱ्यासोबत मी संसार करू शकत नाही. माझ्या मुलीची काळजी घ्या. मला मनोहर सोबत राहणं अशक्य होतंय ! ” माझ्यामुळे तिने आत्महत्या केली. जिच्यावर जीव ओवाळून टाकत होतो तिने मला कंटाळून जीव दिला हे सहन नव्हतं झालं.. हळूहळू माझी तब्येत खालावत गेली. मला जिथेतिथे राधाच दिसायची. मला माझा भूतकाळ आता नकोसा वाटू लागला. सगळ्यांपासून दूर जायचं होतं. मी खूनी आहे म्हणून मला तुझ्या जवळही येऊ देत नव्हा प्रभाकर काका..

आराधना – त्यांनी तुला पोलिसांच्या हवाली केलं नाही आणि तू सुध्दा स्वतः चे गुन्हे मान्य केले नाहीस !

मी – त्यांनी मला का पोलिसांच्या हवाली केलं नाही हे मला नाही माहीती पण माझ्या घडून ते चूकन खून घडले .. मला त्या कायद्याच्या कचाट्यात अडकायचं नव्हतं आणि भूतकाळाच्या चक्रव्यूहात सुध्दा ! काही दिवसांनी ह्या सगळ्या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी मला आसावरीने मदत केली. कुणाच्याही नकळत अगदी श्रीधरच्या सुध्दा नकळत आम्ही रात्रीच्या गाडीनं पुण्यात आलो कारण ह्या घरात राहून मला सगळ्या जुन्या गोष्टी आठवत होत्या आणि त्याचा परिणाम माझ्या तब्येतीवर होत होता.

आराधना – आसावरी आत्या घेऊन गेली तुला पुण्यात ?

मी – हो ! कारण मी आसावरीला म्हटलं होतं की मला काही दिवसांसाठी दूर निघून जायचंय सगळ्यांपासून. मला सारखे राधाचे भास होत होते.मला ह्या घरात असह्य होत होतं.

आराधना – पण पुण्यातच का ?

मी – तुच म्हटलीस ना सगळं तुला माहीती आहे म्हणून ? मग माझी उलट तपासणी का घेतेय्स ?

आराधना – तुला किती आठवतंय हे मला बघायचंय !

मी – त्याने काय होणार ?

आराधना – खूप फरक पडतो त्याने !

मी – मला आत्ता तरी आराम  करायचाय.. डोकं प्रचंड दुखतंय माझं !

आराधना – ओके ! ठिक आहे. आपल्याला उद्या डॉक्टरांकडे जायचंय चेकअप साठी. एक्सरे वगैरे परत काढावे लागतील !

मी – हं. ठिक आहे.

आराधना – तू आराम कर.. मी जरा फिरून येते. कंटाळा आलाय घरी बसून.. आणि आज रात्री मी दशावतार बघायला जाणारे !

मी – ठिक आहे . ह्याला पण घेऊन जा..

तिच्या मित्राकडे बोट दाखवून मी म्हणालो .

मित्र – नाही ! मी थांबतो .

मी – अरे नको.. बंडू आहे ना माझ्यासोबत !

मित्र – अं.. तो जत्रेला जाणारेत !

मी – थांबेल तो माझ्यासाठी . तुम्ही दोघं जा..फिरून या अख्खं गाव. कड्यावरचा गणपती  , हर्णे बंदर , तिथलं लाईट हाऊस , केशवराज सगळी पर्यटन स्थळं फिरा आणि माझी काळजी नको करू. मला जरा एकांत हवाय ! आणि हो काहीही झालं तरी दशावतार चुकवू नका..

आराधना – फॉर युअर काईंड इनफॉर्मेशन मी या गावात लहानाची मोठी झाल्ये अरे ! मला माहीतीये गाव , गावातली माणसं . आता ह्याला सगळं मी फिरवून आणते..

मी – बरं जा..

मी खोलीत आता फक्त एकटाच होतो. प्रंचड थकवा जाणवत होता.. सगळ्या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळणार होती. काहीवेळ घडलेल्या घटनांची उजळणी करत बसलो. त्या फोटोत असणारी बाई , माझे नातेवाईक , राधा , इथे येण्याचं कारण.. म्हणजे मी तब्बल 28 वर्षांनी आलो त्याचं कारण फक्त डॉक्टर होते. माझ्या भावासारखे वाटणारे डॉक्टर आज माझ्या सोबत नव्हते. का आणि कशासाठी हे सगळं करत होते डॉक्टर ? आणि शरीर काळंनिळं पडणं वगैरे ते काय नक्की ? कधीकधी एकांतच भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची उजळणी करतो..

      आपण कितीही आपल्या भूतकाळाला विसरण्याचा प्रयत्न केला तरी विसरता येत नाही तेच खरं. आता लवकरात लवकर मला उत्तरं मिळतील याची खात्री वाटू लागली. मी भूतकाळात केलेल्या पापांची शिक्षा गेली 28 वर्ष कोमात राहून भोगल्ये ! आता नवीन सुरुवात करणार आहे मी . ह्या चक्रव्यूहातून लवकरच बाहेर पडेन. कधी कधी वाटतं की माणसं माझ्या चक्रव्यूहात अडकल्येत ! मीच अडकवलंय त्यांना ! कधी कधी असंही वाटतं की मला ह्या माणसांनी अडवलंय. आता माझा शोध लवकरच संपणार !