आम्ही सकाळीच डॉक्टरा़ंकडे जाऊन आलो. दोन्ही पाय आता नीट बरे झाले होते. एका हातात अजूनही प्लँस्टर होता. डोक्याला झालेली जखम आता सुखली होती. पाय खूप दुखत होता. घरात येऊन मी ओटीवर बसलो.
मित्र – आता लवकरच सगळं मार्गी लागेल !
आराधना – म्हणजे तू लवकरच बरा होशील ! डॉक्टर म्हणाले ना की अजून महिनाभर आराम करायचाय म्हणून !
मी – कसा करू आराम ? डोक्यात इतकी कोडी आहेत की आराम करताच येत नाही गं ! आता काल तुम्हाला मी म्हटलं की मला जरा आराम करायचाय आणि तुम्ही फिरायला गेलात पण इथे मात्र त्या भूतकाळाच्या जखमा मला नकोशा होत होत्या. मला वाटतं हे एक प्रकारचं वर्तुळ आहे . ज्या ठिकाणी यायचं नाही असं ठरवलं त्याच ठिकाणी म्हणजे इथे मला 28 वर्षांनी यावं लागलं . का कारण भूतकाळ जाणून घेण्यासाठी ! एवढं काय करणार मी भूतकाळ जाणून घेऊन ? तिथे पुण्यात डॉक्टरांनी नकोसं केलं…आणि आता इथे नकोसं होतंय. कधी होणार सगळं ठिक ? ,आता प्लीज पुन्हा लवकरच लवकरच म्हणू नका..
आराधना – पुन्हा एकदा तुझं शरीर काळंनिळं झालंय..
मी माझ्या शरीराकडे पाहू लागलो.. खरंच शरीरावर एक वेगळाच रंग नकळत आला होता आणि डोकं देखील जड झालं होतं.. मी ओटीवर बाजूच्या खांबाला टेकून बसलो.. डोकं इतकं जड झालं की समोर असलेल्या माणसांचं काहीच ऐकू येत नव्हतं हलणारी दोन तोंडं मात्र दिसत होती. ती माझ्या पासून एक पाऊल मागे सरकली. मी तसाच खांबाला टेकलो आणि डोळे मिटले. काही सेकंदांनी डोळे उघडले. हातापायांकडे बघितलं.. आता तो रंग नाहीसा झाला पण डोकेदुखी सुरूच होती.
आराधना – काय होतंय ? बरं वाटतंय ना ?
मी – डोकं दुखतंय गं प्रचंड !
आराधना – एक काम कर.. खोलीत जा.. झोप जरा वेळ.
मी – नाही गं नाही येणार मला झोप
आराधना – आडवा तर पडशील ?
तिच्या मित्राने माझा हात पकडला आणि खोलीत नेण्यासाठी आग्रह करू लागला.
मित्र – अहो चला .. आता सगळं सुरळीत होणारे !
मी – तेच तेच बोलून कंटाळा येत नाही का तुम्हाला ?
आराधना – बरं ऐक.. थोड्याच वेळात तुला भेटायला एक व्यक्ती येणारे !
मी – ती.. तिसरी व्यक्ती ?
आराधना – हो बोलवलंय मी त्या व्यक्तीला..
मी – हे एक चांगलं काम केलंस तू !
आराधना – आता तरी थोडावेळ आराम करशील ना आत ? ती व्यक्ती येईपर्यंत !
मी – हो जातो.
ती व्यक्ती येणार हे ऐकूनच माझ्यात शक्ती निर्माण झाली होती. म्हणजे आता वेगळंच रहस्य समोर येणार हे निश्चित ! विचार करत मी वॉकरच्या सहाय्याने खोलीत आलो. मला आता भूतकाळातील काही आठवत नव्हतं. भूतकाळात काहीतरी भयानक घडामोडी झाल्यात हे कळत होतं पण नक्की काय झालं असावं ? मी खोलीत पलंगावर बसलो. बऱ्याच दिवसांनी माझ्या चेहऱ्यावर आनंद रूळला होता कारण अखेर प्रतिक्षा संपणार होती. ती तिसरी व्यक्ती पुरूष की स्त्री ? माझ्याच नात्यातली असेल की परकं कोणीतरी ? तेवढ्यात गण्या हातात पाण्याचा तांब्या घेऊन आत आला..
गण्या – काका , पाणी..
त्याचे हात थरथरत होते. नजर खाली होती.. मला कळतच नव्हतं तो असा का वागतोय ते !
मी – काय रे काय झालं ?
गण्या – पाणी ठेवतो इथे !
मी – इकडे ये.. बस इथे.
गण्या – पाणी प्या ना तुम्ही !
मी – ते तहान लागली की पियेन मी . तू असा गोंधळलेला का ते सांग ? बाबा ओरडले का तुला ? असे का हात थरथरताय्त तुझे ? हे बघ , घाबरू नको काय ते सांग मला नीट .
मी त्याचा थरथरणारा हात पकडला आणि त्याला माझ्यापाशी बसवणार तोच बंडू आला..
बंडू – ए गण्या.. चल , पाटाचं पाणी अडलंय तिकडे..
मी – एक मिनिट.. पाटाचं पाणी कधीच बंद झालं ना ? आता पंपाचं पाणी असतं . जर पाटाचं पाणी कधीच बंद झालंय तर पाणी आत्ता अडेल कसं ? मला वाटतं तुम्ही लपवताय माझ्यापासून काहीतरी.
बंडू – आम्ही आणि तुमच्यापासून काही लपवू ?
मी – तुझे डोळे इतके रडके का रे बंडू ? काही प्रॉब्लेम आहे का ? पैशांचा प्रॉब्लेम आहे का ? पैसे हवेत ? आण ती बँग इकडे आणि जेवढे हवेत तेवढे सांग.
बंडू – न.. नाही.. पैसा नकोय.
मी – मग काय हवंय ? तू फसवतोय्स मला.. गण्याचे थरथरणारे हात सांगून जाताय्त की तुम्ही लपवताय काहीतरी.
बंडू – दादा , का सांगून पटत नाहीये तुम्हाला ?
मी – ठिक आहे जा.. आणि ऐक , थोड्या वेळात एक व्यक्ती येणार आहे. ती व्यक्ती आली की लगेच तुम्ही मला उठवा. मी थोडावेळ खोलीत बसतो. बाहेर गेलो तर ती दोघं आराम करा आराम करा म्हणून बोंबलत बसतील.
गण्या त्याच्या डोळ्यात साठलेलं पाणी माझ्यापासून लपवू शकला नाही . आता ह्याला नक्की काय सांगायचंय तेच मला समजत नव्हतं. विचारलं तर सांगत नव्हता.आता हे काय नवीन ? कुठंतरी पाणी मुरतंय हे नक्की . गण्याला माझ्याशी काहीतरी बोलायचंय हे नक्की पण बंडू बोलू देईना. म्हणजे माझ्या अपरोक्ष अनेक घडामोडी ह्या घरात घडत आहेत. मला माझा अर्धवट माहीत असलेला भूतकाळ आणि ह्याचा काही संबंध असेल? मी उठलो आणि डॉक्टरांनी मला दिलेली एक गोळी घेतली . पाणी पिण्यासाठी तो तांब्या हातात घेतला आणि त्या तांब्यात एक चिठ्ठी होती पाणी नव्हतंच.. गण्याने अगदी हुशारीने माझ्याजवळ ही चिठ्ठी दिली म्हणजे नक्कीच ह्या चिठ्ठीत महत्वाचं काहीतरी असणार ! मी खोलीचं दार बंद केलं. ती चिठ्ठी बाहेर काढली आणि वाचू लागलो.
“ काका , इथे तुम्हाला जसं दिसतंय तसं काही घडत नाहीये. मला त्रास दिला जातोय. मला तुमच्यासोबत घेऊन चला.. इथे तुम्हाला… ”
हे एवढंच काय ते त्याने चिठ्ठीत लिहून ठेवलं होतं. मला त्रास दिला जातोय मध्ये खूप काही दडलं होतं. त्रास कोण देतं गण्याला ? बंडू ? आता हा का त्रास देतोय ? खूप काही दडलंय.. आणि हे नक्कीच जीवघेणं असणार ! बंडूला मी लहानपणापासून ओळखतो. तो असा वागेल? नाही आता हे सगळं सहन होत मला.. आणि तोच मला पुन्हा चक्कर आली आणि मी जमिनीवर पडलो.. आता डोळ्यांसमोर फक्त अंधार होता. मला शुध्दीवर आणणारं माझ्या भोवताली असं कोणीच नव्हतं…
हळूहळू डोळे उघडले. आजूबाजूला पुन्हा माणसंच माणसं. आराधना , तिचा मित्र , बंडू.. हे तिघेही मला त्या दहा बाय दहाच्या बाळंतीणीच्या खोलीत जास्तच वाटत होते.
बंडू – केशव दादा .. पाणी घ्या.
बंडूने माझ्यासमोर ग्लास पुढे केला पण हा मला केशव का म्हणाला ? एक मिनिट.. मला त्या दिवशी गेटटूगेदर ला माझ्या परममित्रानं म्हणजे नरेंद्रने सुध्दा मला वेगळ्याच नावाने हाक मारली होती. हा. आठवलं.. विलास नावाने हाक मारली होती आणि आता हा बंडू मला केशव नावाने हाक मारतोय ! माझी नजर आराधनाच्या हाताकडे गेली तिने बंडूचा एक हात घट्ट पकडला होता. मी तिच्या हाताकडे बघितल्याने तिने लगेच तो हात बाजूला केला. बंडूच्या हातातला ग्लास मी घेतला.
मी – बंडू , गण्या कुठाय रे ?
आराधना – अरे तो मित्रांबरोबर खेळायला गेलाय.
मी – एकच मिनिट.. मी खोलीचं दार बंद केलं होतं तुम्ही आत कसे ?
मित्र – तोडला दरवाजा. तुम्हाला खूप हाका मारल्या पण तुम्ही हाकच देत नव्हता.. आम्हाला काळजी वाटली म्हणून तोडला. बघतो तर तुम्ही जमिनीवर पडला होतात.
नशीब ती चिठ्ठी मी खिशात ठेवली . ह्यांनी नक्कीच वाचली नसणार.. तोच तिचा फोन वाजला..
आराधना – हँलो ! हो. नाही. नको. हो तसं काही नाही. हं ठिक आहे . अच्छा ?
ती बोलत बोलत खोलीच्या बाहेर निघून गेली .
मी – ही अशी बोलत बोलत बाहेर का निघून गेली ? आणि ए बंडू , गण्याला आण इथे ताबडतोब मला बोलायचंय त्याच्याशी !
आराधना अगदी हसऱ्या व प्रसन्न चेहऱ्याने आत आली.
आराधना – सुनिए .. सुनिए .. सुनिए.. अब एक एक करके सारे राज खुलेंगे क्योंकी ..
मी – ती तिसरी व्यक्ती आली का ?
आराधना – जी हा . सही पकडे है आप ! जा .. माजघरात आणि भेट त्या व्यक्तीला !
माझ्या अंगात एवढं बळ आलं की मला वॉकरची गरज वाटली नाही.. मी पटापट पावलं टाकत हसऱ्या चेहऱ्याने माजघरात आलो खरा पण माझ्या कल्पनेतही येणार नाही अशीच ती तिसरी व्यक्ती होती.. त्या दिवशी डॉक्टरांना त्यांची कपड्यांची बँग देणारी , माझ्याकडे बघणारी ती मादक स्त्री माझ्या घरात माझ्या डोळ्यांसमोर तिसरी व्यक्ती बनून उभी होती पण ही का इथे ? ही डॉक्टरांची बायको ना ? हिचा आणि माझ्या आयुष्याशी काय संबंध ? आणि माजघरात अजून एक चेहरा माझ्या समोर आला.. तो चेहरा देखील माझ्या कल्पनेबाहेरचा होता..
क्रमशः
SWA membership no. 51440
®© Poornanand Mehendale
क्रमशः
SWA membership no. 51440
®© Poornanand Mehendale