Login

लाचार      भाग १

लग्नाची २८ वर्षे घरात लाचारासारखी काढल्यानंतर तिने दाखवलेलं साहस.


लाचार      भाग १


@लघुकथा
©® आरती पाटील - घाडीगावकर


" नम्रता ss ये नम्रता ss, इकडे ये. " मंदारने आवाज देऊन नम्रताला खोलीत बोलावलं. जिथे तिचे सासू - सासरे, नणंद आणि तिचे यजमान आधीपासून बसले होते. खरंतर तिला नवल वाटलं, कारण यापूर्वी तिला कधीही अश्या चर्चेत सहभागी करून घ्यायचं सोडा पण ती आसपास असलेली सुद्धा चालायचं नाही.

नम्रता थोडी बिचकतच आत आली. सासूबाईनी तिला बसायला सांगितलं आणि बोलायला सुरुवात केली.

पार्वतीबाई, " नम्रता, आम्ही देवेनच लग्न ठरवलं आहे. तो पुढच्या आठवड्यात बेंगलोरहुन आला की साखरपुड्याची तारीख काढू. ही यादी. यात तुझ्या माहेरहून या सर्व गोष्टी आल्याचं पाहिजेत. आतापासून यादी देतेय म्हणजे उद्या बोलायला नको. एवढ्या कमी वेळेत पैसे जमवायला जमलं नाही. कळलं ? आता तू जाऊ शकतेस. " असं म्हणत पार्वतीबाईंनी तिला परत बाहेरचा रस्ता दाखवला.

नम्रता उदास मनाने स्वयंपाक घरात उभी होती. तिच्या मनात विचार येत होते. माझ्या स्वतःच्या मुलाचं लग्न ठरवताना मला सांगावस नाही वाटलं ? २८ वर्षे झाली लग्नाला. अजूनही या घरात मला काहीही किंमत नाही. देवेनला माहित आहे हे सर्व ? त्याची संमती आहे लग्नाला ? त्याला माहित आहे तर त्याला सुद्धा मला सांगावस वाटलं नाही ? या घरात माझ्या एवढं लाचार कोणीच नसेल.

तिने सासूबाईनी दिलेली यादी उघडली. देवेनसाठी आणि त्याच्या होणाऱ्या बायकोसाठी अंगठी, मंदारसाठी घड्याळ, तिच्यासाठी सोन्याचे कानातले. सर्वांसाठी पोशाख. एवढं वाचून नम्रताला राग आला. तिने या घरात खूप सोसलं होत.

लग्न झाल्यापासून तिला या घरात त्रास दिला गेला. नवरा सुद्धा कधी तिच्या बाजूने उभा राहिला नाही म्हणून घरातल्या इतर लोकांचं फावलं. घरात ती फक्त राबायला होती. महत्वाचे निर्णय घेताना लेक आणि जावयाला बोलावलं जायचं.

सुरुवातीला तिने काही बोलायचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या नवऱ्याने माहेरून आई - बाबांना बोलावलं आणि खूप ऐकवलं. आई वडिलांना असं लाचारासारखं ऐकताना पाहून ती आतल्या आत मेली. त्यानंतर ती फक्त मुकाट्याने घरात वावरात राहिली. कधीच कोणाकडून अपेक्षा केली नाही. कालांतराने आई वडील वारल्यावर तिच्यावर दबाव आणून हिस्सा घ्यायला भाग पाडलं. नाहीतर घरातून चालती हो असं सांगितलं. मुले अजून शिकत होती. त्याच्यावर परिणाम नकोत म्हणून तेही ऐकलं. कारण ती लाचार होती.

बहिणीच्या सासरचे कसे आहेत ? हे माहित असल्यामुळे ४ एकर मधली २ एकर त्याने बहिणीला दिलीच. त्यानंतर त्यावरच्या उत्पन्नात घट झाली. भावाला २ मुलीचं होत्या. त्यांची शिक्षण , मग लग्न. कसं जमवणार होता तो, ते त्यालाच माहित.

आज मात्र यादी पाहून तिला खूप राग आला. पण ती अजूनही शांत होती. चार दिवस होऊन गेले तरी नम्रता काही या विषयावर बोलली नव्हती.

संध्याकाळी सर्व हॉलमध्ये बसले होते. नणंदबाई आणि तिचे यजमान सुद्धा आले होते. तेव्हा सासूबाईने मंदारला ' नम्रता माहेरी बोलली की नाही ?' असं विचारलं. त्यावर तो ' मला काही अजून बोलली नाही ती. ' असं म्हणाला. ते ऐकून पार्वतीबाईंनी नम्रताला आवाज दिला. नम्रता बाहेर आली.

नम्रता, " काही हवंय का ? "

पार्वतीबाई, " तुझ्या माहेरी यादी दिलीस की नाही अजून ? "

नम्रता शांतपणे म्हणाली, " नाही. नाही दिली यादी आणि देणारही नाही. त्या घरातून हिस्सा घेतला आहे मी. त्यामुळे बाकी आता हक्काने काहीही मागू शकत नाही मी तिथे. त्याचंच त्याला भागवताना नाकी नऊ येतात. त्याला सुद्धा २ मुली आहेत. त्यामुळे असली यादी देऊन त्याचं टेन्शन अजून वाढवणार नाही मी. "

मंदार चिडून, " नम्रता, आईशी बोलताना नीट बोलायचं. आणि हो द्यावं तर त्यांना लागेल. नाहीतर इथून बॅग भरून लगेच निघायचं. कळलं ना ? "

" कोणाला निघायला सांगताय बाबा ? " देवेन आत येत म्हणाला. त्याला अचानक पाहून सर्वजण चकित झाले.