Login

लगाम- भाग 1

नवऱ्याच्या हेकेखोर स्वभावामुळे मीनाला कायम मन मारून राहावं लागे
"एकदा नाही म्हटलेलं कळत नाही का, नाही म्हणजे नाही"

सुभानरावांनी आदेश दिला आणि सगळं घर शांत झालं. सुभानरावांच्या हेकेखोर स्वभावाला घरात सर्वचजण कंटाळले होते.

"मी कमवून आणतो, पैसा पुरवतो ना? मग मी सांगेन तेच व्हायला हवं, मी म्हणेन तेच सर्वांनी ऐकायला हवं.." असा सुभानरावांचा हेका. मग ती गोष्ट चुकीची आहे की बरोबर हे पडताळून बघायची गरज नाही..फक्त मी म्हणतो म्हणून ऐकायचं!

याची सर्वात जास्त झळ लागायची ती त्यांची बायको, मिनाताईंना. आजवर संसार करताना पदोपदी त्यांना सुभानरावांच्या या स्वभावामुळे मन मारून राहावं लागे. स्वतःच्या मनाप्रमाणे त्यांना आयुष्य कधी जगताच आलं नव्हतं. अगदी दिवाळीला साडी खरेदीपासून ते घरात पणती आणण्यापर्यंत सुभानरावांचा निर्णय अंतिम असे.

एकदा दिवाळीत मिनाताईंनी दुकानात आकाशकंदील बघितला, त्यांना तो खूप आवडला होता, पण सुभानरावांनी ते घेण्यास मनाई केली.

"तो कंदील नको, तो तिकडच्या दुकानात बघ..तो घेऊ"

बायकोने निवडलाय म्हटल्यावर त्याला नकारघंटाच वाजवायची असा सुभानरावांचा स्वभाव बनला होता.

"अहो तुम्ही म्हणताय तो टिकणार नाही, तकलादू आहे तो"

"तुला काय कळतंय त्यातलं? हाच कंदील घ्यायचा"

मिनाताईंना नेहमीप्रमाणे माघार घ्यावी लागली. कंदील घरी आणला, सुभानराव दिवसभर तो चालू करून लावण्यात व्यस्त होते, या भानगडीत तो एका बाजूने तुटला, एकीकडून त्याची दोरी सुटली आणि उरलासुरलेला लावला तर त्यातला बल्ब गळून पडे. सुभानराव दिवसभर सेलोटेप घेऊन त्याची डागडुजी करत होते. मीनाताई निमूटपणे सगळं बघत होत्या, पण "माझं ऐकलं असतं तर.." असं बोलायची हिम्मत त्यांना नव्हती. आपल्या चुकीच्या निर्णयामुळे सुभानरावांचा पूर्ण दिवस वाया गेला होता, पण मान्य कसं करणार? उलट चिडचिड करून त्यांनी घरच्यांवरच राग काढला.

एके दिवशी सोसायटीत सगळ्या बायका जमल्या आणि एका शेतकऱ्याशी बोलताना दिसल्या, मिनाताईंनी चौकशी केली आणि घरी येऊन सुभानरावांना सांगितलं,

"अहो ऐका ना, सोसायटीमध्ये एक भाजीवाला येतो त्याने एक स्कीम काढली आहे..त्याच्या शेतातला ताजा भाजीपाला तो इथे आणणार, योग्य भावात विकणार.. अट फक्त एकच की रोज किमान एक भाजी विकत घ्यायची"

बायकोने काहीतरी सुचवलं आणि मान्य केलं ते सुभानराव कसले,

"काय गरज आहे? मी तुला बाजारात जाऊन आणून देत जाईन.."

"अहो रोज दारात भाजीपाला येणार, आणि तोही ताजा, कमी भावात..सोसायटीच्या सर्व बायकांनी त्याच्याकडे नोंदणी केली आहे.. अजून काय हवं?"

"डोकं लावू नकोस माझ्याशी, एकदा नाही सांगितलं ना? आणि तुला रोज मी भाजीपाला आणून देत जाईन.."

स्वतः भाजीपाला आणायचा, बायकोच्या हातात अभिमानाने टेकवत भाजीपाला आणायला किती खर्च झाला, मी किती पैसे खर्च केले आणि सोबतच बचतीचे धडे द्यायचे..हे सगळं त्या भाजीवल्यामुळे थांबलं असतं.. मग सुभानरावांना आपला हेका कसा दाखवता आला असता?

पण नंतर अशी एक घटना घडली की सुभानरावांचा अहंकार आणि हेकेखोरपणा एका क्षणात भस्मसात झाला. त्यांचा मुलगा खूप तापला...

क्रमशः
0

🎭 Series Post

View all