Login

लग्न अतूट बेडी भाग २

लग्न म्हणजे मोठा निर्णय
गेल्या भागात आपण पाहिले की, विक्रम चार दिवसांवर लग्न आलं असताना लग्न मोडतो. त्याची आई प्रतिमा टेन्शनमध्ये येते. बाबा घरी आल्यावर लग्न मोडल्याचे कारण मी सांगणार असं तो आईला म्हणतो. आता पाहू पुढे.

प्रथमेश घरी आल्यावर बघतो तर प्रतिमा चेहरा पाडून बसली होती आणि विक्रम तिच्या बाजूला बसला होता.

प्रथमेशने ऑफिसची बॅग खाली ठेवली आणि प्रतिमाकडे गेला. "प्रतिमा, काय झालं ? तुझा चेहरा असा का दिसतो आहे? काय झालं सांग बरं?"

प्रथमेशला पाहून तिला अजूनच गहिवरून आले. डोळ्यातून घळाघळा अश्रू येऊ लागले.

"विक्रम तू तरी सांग काय झालं आहे? आई का रडते आहे?"

"बाबा मी लग्न मोडलं आहे, त्यामुळे आई चिंता करते आहे."

"काय?"

"हो बाबा, मला हे लग्न करायचे नाही."

"पण का? मनाली किती चांगली मुलगी आहे. तुला आवडली होती ती,म्हणूनच लग्न करायचं ठरलं."

प्रतिमा देखील बोलू लागली, "मी तेच म्हणते आहे. ती मुलगी किती चांगली आहे. सुंदर आहे सुशिक्षित आहे. वाद झाले असतील तर बोलून एकमेकांशी बोलून मार्ग काढायला काय हरकत आहे? डोक्यात राग घेऊन लग्न मोडणार म्हणतो आहे. हे सोल्युशन आहे का? आता तुम्हीच बोला."

"प्रतिमा, मला विक्रम काय बोलतो आहे ते ऐकायचं आहे. आपला विक्रम कसा आहे हे मला माहित आहे. त्याने निर्णय घेतला असेल त्या पाठी नक्कीच काहीतरी कारण असणार. विक्रम सांग तू लग्न का मोडत आहेस?"

बाबांनी सरळ मुद्द्याला हात घातला.

विक्रम बोलू लागला "आई- बाबा मला मनाली खरंच आवडली होती. तिचा आत्मविश्वास,तिचं सौंदर्य माझ्या मनात भरलं होतं. मी खूप इम्प्रेस झालो होतो. माझ्या स्वप्नातली राजकुमारी अशीच होती मनाली. आमचं रोज बोलणं व्हायचं. अगदी तासनतास बोलत बसायचो. मला तिची सवय लागली. एकही दिवस असा जात नव्हता की, आम्ही बोलायचो नाही. एकमेकांच्या आवडी,अनेक गोष्टी शेअर देखील केल्या. कामामुळे मला जेव्हा तिला फोन करायला जमायचा नाही, तेव्हा ती माझ्यावर रुसून बसायची, रागवायची. मला असं वाटायचं, ती हक्काने माझ्यावर रुसते, रागावते. मला आधी खूप चांगलं वाटायचं. आपल्यावर हक्क गाजवणारी, आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती कोणालाही आवडणारच. ते सारं मला आवडू लागलं होतं. पंधरा दिवसांपूर्वी जेव्हा मी ऑफिसच्या मित्रांसोबत पिकनिकला गेलो होतो, तेव्हा माझं तिच्याशी बोलणं झालं नाही. नंतर घरी आल्यावर मी तिला फोन केला तेव्हा फोनच लागला नाही. नंतर माझ्या लक्षात आलं तिने मला ब्लॉक केलं आहे. मी तिच्या घरी गेलो. तिने मला बघून न बघितल्यासारखं केलं. तिला माझा खूप राग आला होता, म्हणून तिने मला ब्लॉक केलं होतं.

इतकी शिकलेली मुलगी अशा पद्धतीने वागू शकते याचा मला विश्वासच बसत नव्हता.
यापुढे मित्रांसोबत पिकनिकला जायचं नाही हे मला सांगितले.

हे माझं स्वातंत्र्य हिरावण्यासारखंच होतं. तेव्हा तिचा रुसवा काढण्यासाठी हो म्हणालो. माझ्या डोळ्यावर प्रेमाची पट्टी होती, त्यामुळे मी योग्य आणि अयोग्य ह्यामधील अंतर विसरून गेलो होतो. मला माझ्या आयुष्यात मनाली पाहिजे होती. त्यामुळे त्या क्षणाला जे मला पटत होतं ते केलं."

प्रतिमा आणि प्रथमेश दोघेही लक्ष देऊन ऐकत होते. हे सगळं ऐकून दोघांना धक्काच बसला.

"हळूहळू तिच्या बोलण्याचा सूर बदलत गेला. तिचं ऐकलं तर ती खुश राहायची आणि काही ऐकलं नाही तर खूप नाराज व्हायची. चिडचिड करायची. तिला फक्त स्वतःच्या मनासारखं पाहिजे होतं. माझ्या मनाचा विचार करायचा तिने सोडून दिला होता. खरं तर तिने माझ्या मनाचा विचार कधीच केला नव्हता. ज्या मनालीच्या प्रेमात मी पडलो होतो, ती मनाली वेगळीच होती. लग्नाची तारीख जवळ येत गेली तशी ती स्वतःचं खरं रूप दाखवायला लागली.
एक दिवस मी तिच्याशी बोलत होतो, तेव्हा माझ्या मैत्रिणीचा फोन आला. तिला खूप राग आला. मी मैत्रिणींशी बोलून झाल्यावर तिच्याशी बोलायला गेलो, तर ती जोर जोरात माझ्या अंगावर ओरडायला लागली. मला काही कळलच नाही की, नक्की तिचा प्रॉब्लेम काय आहे. ती रागातच मला म्हणाली यापुढे मैत्रिणींशी बोलायचं नाही. मला आवडणार नाही. तिला माझ्यावर अविश्वास होता. तिची प्रत्येक कृती, तिचा प्रत्येक शब्द मला ओझं वाटू लागला होता. सतत माझ्यावर संशय घेणं, मी कुठे आहे? मी कोणाशी बोलतो? मी कुठे जातो? या सगळ्या गोष्टीची खबर ठेवायची.
हे सगळं जर ती प्रेमापोटी करत असती, तर मला काहीच वाटलं नसतं, पण हळुहळु तीचा स्वभाव संशयी आणि विक्षिप्त आहे हे कळून चुकलं होतं आणि मला त्याचा खूप त्रास होऊ लागला. ज्या मुलीशी माझं लग्न ठरलं आहे ती माझ्याशी आताच अशी वागते आहे, तर पुढे कशी वागेल?

मला मानसिक त्रास होत राहिला. रात्रभर मला झोप लागत नव्हती. माझं भविष्य कसं असेल हा विचार करून त्रास होत होता. तिचा फोन जरी आला तरी, तिचा फोन उचलू वाटत नव्हता. ह्या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होत गेला. मन आणि बुद्धी हेच म्हणत होती की, तिला नकार दे. माझी हिम्मतच होत नव्हती. माझ्या मनात पहिला विचार आला जर मी असं लग्न मोडलं तर नातेवाईक, समाज काय म्हणेल? सतत डोक्यात विचार येत होते. खूप त्रास होत होता आणि तुम्हालाही मी काही सांगितलं नाही ,कारण तुम्हाला त्रास होईल. त्या दिवशी पाणी डोक्यावरून गेलं आणि त्यादिवशी तर तिने कहरच केला.

क्रमशः
तिसरा आणि शेवटचा भाग जरूर वाचा.
अश्विनी ओगले.
स्पर्धा