लग्न कुटुंबाची प्रगती की वैयक्तिक अधोगती भाग २ अंतिम

लग्न झाल्यावरही आपलं स्वप्न पूर्ण करण्याचा हक्क तिला देखील आहे.
सुषमाने आपले म्हणणे ऐकल्याने अनय आणि त्याची आई दोघेजण खूप खूश झाले होते. सुषमा बाळाच्या जबाबदारी बरोबरच घरातली जबाबदारी देखील उत्तम पणे पार पाडत होती. घरी राहून स्वयंपाक शांतपणे करता येत होता. त्यामुळे सुषमाला देखील आराम करता येत होता. सगळ सुरळीत चालू असताना कंपनीतून सुषमाला फोन आला होता. तिचे प्रमोशन करुन तिची बदली दुस-या शहरात करणार होते. शिवाय कंपनी तर्फ फ्लॅट देखील सुषमाच्या कामाचे स्वरुप पाहता देण्यात आले होते. सुषमाने डिलिवरी करता जाण्याआधी जे प्रोजेक्ट सादर केले होते. ते माॅडेल सिलेक्ट होवून त्यावर काम देखील पूर्ण करण्यात आल्यावर कंपनीला त्याचा फायदाच झाला होता.

सुषमाचे एक मन तिला एवढी मोठी चालून आलेली संधी साद घालत होती तर एकीकडे आपल्या तान्ह बाळ. यादोघां मधे कोणाला निवडावे याची खंत सुषमाला वाटत होती. अखेर तिने कुटूंबाला प्राधान्य देत कंपनीची ती संधी सोडली होती. आपण कोणती चूक तर केली नाही ना? याचा सतत विचार करत सुषमा स्वत:च्याच मनाला खात होती.

शिवांश आता हळूहळू मोठा‌ होत चालला होता. त्याला जवळच्या गार्डन मधून फिरुन आणने,गाणी-गोष्टी सांगणे सुषमाचे चालू होते. आता शिवांश ३ वर्षाचा झाला होता. शाळेत घालून आपल्यालाही नविन काम बघता येईल असे सुषमाला वाटत होते.

" आई, आता शिवांशला शाळेत घालूया. बाहेरच्या वातावरणात तो देखील रुळेल. मला देखील इतकी वर्ष डोक्याला चढलेला गंज काढून नव्याने नोकरी करता येईल. मी देखील नोकरी करुन फ्रेश राहत जाईल. काय वाटत तुम्हांला?" सुषमा आपल्या सासूशी बोलत होती.

" हो. तुला जे योग्य वाटेल तसेच कर. " सासूबाई सुषमाशी बोलत होत्या.

" ती बघ पुन्हा नोकरी करायचे बोलते. आता शिवांशला पण शाळेत घालणार. त्याला शाळेतून कोण घेवून येणार आणि सोडणार. आम्ही करु दोघे नवरा-बायको थोडे दिवस. पण आमच देखील आता वय झालं आहे. कधी तब्येतीने साथ नाही दिली तर, कोण पाहणार या गोष्टी तूच सांग. तसही या अलिकडच्या काळात सुषमा सुंदर जेवण बनवायला देखील शिकली आहे. आले गेलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार करायला तिने नको का थांबायला घरी. " अनयची आई अनयला रुम मधे बोलवून सांगत होती.

यावेळी अनय आपल्या बायकोला समजवायला जातो तेव्हा सुषमा देखील आपल्या मनातल्या भावना अनय जवळ व्यक्त करत होती.

" लग्न झालं म्हणून मी मला आवडणारं पॅशन सोडून द्यायचं का? मी देखील पैसा खर्च करुन शिक्षण घेतले आहे. मला आवडणा-या क्षेत्रात प्रॅक्टिकली मी माझे कौशल्य वापरुन उंच भरारी घेत आहे. केवळ पाहुणे येणार घरी, समाज काय बोलेलं याचा विचार करुन मी माझ्या भावनांना नेहमीच आवर घालायला हवा का? माझं आयुष्य मी माझ्या मर्जीने नाही का जगू शकत. तुम्हीच सांगा ना. मी घरातली जबाबदारी झटकून काम करायचं बोलत नाही. पण ते सांभाळून मला माझे स्वप्न देखील साकार करायचे आहे. ते नाही करु शकत का मी." मनातल्या भावना अनय समोर व्यक्त करत सुषमा आज स्वत:चं देखील मन मोकळे करत होती.

" तुझं बरोबर आहे. पण मी तरी यात काय सांगू. आई तिच्या जागी योग्य आणि तू देखील तूझ्या जागी योग्य आहे. पण मला वाटत आपल्या कुटूंबाचा विचार तू आधी करायला हवास. नोकरी तर काय मी एकटा देखील करेल. आपल्या सगळ्यांना पुरेल इतके मी कमावतो आहे. बाकी तूझा निर्णय अंतिम राहिल." अनय सुषमाशी बोलत होता.

कुटूंबाचा विचार करता सुषमाने येणाऱ्या संधीकडे डोळेझाक करत आपलं स्वप्न आपल्या मुलाच्या रुपात पूर्ण करुन घेण्याचा चंगच बांधला होता.

समाज खुल्या मनाने स्त्रीने केलेली नोकरी स्विकारत आहे. पण वास्तवात खरचं तिला पाठींबा देत आहे का? तिच्यासमोर एक बोलणे आणि आपल्या मुलाचे कान भरत तिला कायमची नोकरी सोडायला देखील लावणारा समाज आज पाहायला मिळत आहे.

मुलगी देखील मुलांइतकीच शिकून नोकरी करत असते. तिचे देखील स्वप्न असते. ते आपली सून नाहीतर मुलगी म्हणून तिच्या स्वप्नांना पंख देण्याचे काम प्रत्येकाने करायला हवे.

वरील कथेतून कोणाला दुखावण्याचा हेतू नक्कीच नाही. परंतु वास्तव देखील असे असू शकते याचा अंदाज बांधत काल्पनिक कथा लिहली आहे. शब्दरचना चूकीची वाटत असल्यास क्षमस्व.

🎭 Series Post

View all