लग्नातील आठवे वचन भाग अंतिम

जोडीदाराच्या सुखा दुःखात त्याच्या नेहमी सोबत असणे महत्त्वाचे असते आणि असा जोडीदार मिळायला नशीब लागते.
लग्नातील आठवे वचन भाग ३ अंतिम 

" वाह बाबा वाह! म्हणजे तुम्ही आता मुलींना फसवून घरी बोलवू लागलात. माझं लग्न झालेलं असताना देखील तुम्ही त्यांना ही गोष्ट सांगितली नाही. आणि तुम्हाला काय वाटलं, तुम्ही हे असं बघायचा कार्यक्रम घ्याल आणि तुमच्या आग्रहाखातर मी लग्नाला तयार होईल? बाबा चुकताय तुम्ही. मी आता काही लहान नाही राहिलो तुम्हाला घाबरायला. आणि जरी घाबरत असतो तरी अश्या चुकीच्या गोष्टीत कधीच तुमच्या समोर हतबल झालो नसतो. शीsss बाबा मला लाज वाटते आता तुम्हाला माझे वडील म्हणायची पण." अमोघच्या डोळ्यात पाणी होते. परंतु मुखातून त्याच्या आग निघत होती. 

रागिणी सुन्न झाली होती. इतक्या दिवस तीच त्याच्या मागे लागली होती दुसरं लग्न कर म्हणून परंतु आज जेव्हा सोयरीक जुळू लागली तसं तिच्या पायाखालची जमीनच सरकली. काही क्षण तिचे श्वास अडकले होते. खरंच जर अमोघ तयार झाला असता लग्नासाठी तर? तर आपलं काय झालं असते? ही भीती आता कुठे तिच्या मनाला वाटू लागली होती. हाच विचार करून तिच्या अंगावर काटा उभा राहिला.

" अमोघ, इतकं काय केलंय आम्ही? फक्त तुझ्यासाठी मुलगीच पाहिली ना! तू नाही विचार करत म्हणून नाईलाजाने आम्हालाच बघावं लागतेय. आणि काय आहे रे असं ह्या मुलीमध्ये जे तिच्यासाठी तू आमचं ऐकत नाहीस? तिच्या प्रेमात इतका वेडा कसा रे झालास तू की तिच्यापुढे तुला आमची काळजीच नाही. आम्ही काय आमच्यासाठी मागतोय का वारस? तुझंच नाव काढेल ना तो. तुझाच आधार होणार आहे ना तो. बायका काय रे खूप मिळतील पण आपल्या रक्ताचा लेकच सगळं असतो. ही तुला कधीच बाप बनण्याचं सुख देऊ शकत नाही. ही कधीच आई होऊ शकत नाही. हिचा काय उपयोग सांग ना. अरे अमोघ, आम्ही तुझे शत्रू नाही आहोत. तुझ्या भल्यासाठीच सांगतोय आम्ही. दुसरं लग्न कर. पोर जन्माला घाल आणि सुखी हो. घराचं जोपर्यंत गोकुळ होत नाही तोपर्यंत ते घर घर होत नाही फक्त दगड विटांच्या भिंती असतात." बाबा आणि अमोघ दोघे रागावल्यामुळे आई शांततेत अमोघला समजावू लागली.

" आई, तुला खरं माहित नाही म्हणून तू हे बोलतेस. जर खरं कळालं तर मग काय बोलशील? जे मला समजावून सांगतेस तेच तू रागिणीला सांगशील का? इतक्या हक्काने?" अमोघ गालात तुच्छेतेने हसू लागला.

" अमोघ.." रागिणीने मानेनेच त्याला नाही म्हणून सांगितले.

" काय खरं? कशाबद्दल बोलत आहेस तू अमोघ? जे काही बोलायचं आहे ते स्पष्ट सांग." आई कधी अमोघकडे तर कधी रागिणीकडे पाहत होती.

" तर ऐक!" 

" अमोघ, प्लिज नको." अमोघ बोलणार तितक्यात रागिणीने त्याच्या पुढे येऊन हात जोडले.

" नाही रागिणी, आता नाही, आता पाणी डोक्यावरून जावू लागले आहे. मला आता सहन नाही होत तुझा या घरात चाललेला अपमान. मला खरं काय ते सांगू दे. आणि प्लिज तू मध्ये काहीच बोलू नकोस. माझी शपथ आहे तुला." 

रागिणी त्याला अडवणार तेवढ्यात त्यानेच तिला शपथ देऊन गप्प बसवले.

" हा तर आई बाबा, तुम्हाला खरं काय ते ऐकायचं आहे ना? मी का एवढा जीव लावतो रागिणीला? मी का इतका वेडा आहे तिच्या प्रेमात? हेच ऐकायचं आहे ना तुम्हाला. सांगतो, आज सगळं काही सांगतो तुम्हाला. लग्नामध्ये एकूण सात वचने असतात बाबा, पण रागिणीने आठवे वचन घेतले होते. आयुष्यभर माझी साथ देईन. काही झालं तरी मला सोडून कुठेच जाणार नाही. माझ्या चुका माफ करेल, स्वतः कधी मुद्दाम चुका करणार नाही आणि माझ्यावर आयुष्यभर निस्सीम प्रेम करत राहील. माझं सुख सगळ्यात आधी असेल तिच्या यादीत. आणि तिने घेतलेले हे वचन तिने आज पर्यत निभावले आहे. लग्न ठरल्यानंतर आम्ही दोघे कोणाला न सांगता फिरायला गेलो होतो. ती नाहीच म्हणत होती परंतु मीच तिला जबरदस्ती बोलावून घेतले. नुकताच पडून गेलेला पाऊस, ओलेचिंब झालेले रस्ते, सगळीकडे पसरलेली निसर्गाची हिरवी चादर, मनमोहणारी सुंगधित हवा, हे सगळं पाहून मला इच्छा झाली हिच्या सोबत बाईकवर फिरण्याची. आमच्या प्रेमाची शपथ देऊन मी तिला टेकडीवर फिरायला नेले. असंच रस्त्याने स्पीडमध्ये जाताना आमच्या बाईकचा तोल गेला आणि रागिणी खाली पडली. अपघातात मला साधं खरचटले होते परंतु रागिणी घरंगळत टेकडीवरून खाली आली. वडाच्या झाडावर जाऊन ती आपटली. पोटावरती पडल्यामुळे तिच्या पोटाला दुखापत झाली होती. हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी सांगितले तिच्या पोटात आतमध्ये रक्तस्त्राव झाला आहे. तिच्या गर्भाच्या पिशवीला देखील दुखापत झाली आहे. ऑपेरेशन करून पिशवी काढावी लागेल नाहीतर तिच्या जीवाला धोका होऊ शकतो. मी परमिशन देताच त्यांनी ऑपेरेशन केले. त्या ऑपेरेशनमुळेच ती कधी आई होऊ शकत नाही. आणि याला कारणीभूत फक्त मीच आहे. जेव्हा ही गोष्ट माझ्या लक्षात आली तेव्हा मला स्वतःचाच जास्त राग आला. आणि मी.. मी माझं देखील ऑपेरेशन करून घेतले. रागिणीचं फक्त आई होऊ शकणार नाही आई, तर मी देखील कधीच बाप बनू शकणार नाही."

अमोघने केलेल्या खुलासा वर आई बाबांना जबरदस्त धक्का बसला.  

" काय बोलतोयस तू हे अमोघ? अरे! तू ऑपेरेशन केलंस? का पण? का केलंस तू असं? तू तुझ्या भविष्याचा विचार देखील केला नाहीस? अरे बोल, का केलंस तू असं?" बाबा अमोघला मारायला धावले होते. त्यांनी त्याची कॉलर पकडली, पण अमोघ जरा देखील जागेवरून हलला नाही की त्याच्या डोळ्यांत आपण केलेल्या कृत्याचा कुठलाच पश्चात्ताप दिसला नाही.

" कारण बाबा, मी देखील रागिणीला लग्नात आठवे वचन दिले होते. आयुष्यभर तुझी साथ देईन, तुझ्या प्रत्येक सुखदुःखात समान भागीदार राहीन. मग तिला अपरिपूर्णतेच्या वाटेवर एकटीला कसं सोडणार?"

समाप्त.


🎭 Series Post

View all