लग्नातील आठवे वचन भाग १

आयुष्यातील जोडीदाराला दिलेले लग्नातील वचने आयुष्यभर जे निभावतात त्यांनाच लग्नाचा खरा अर्थ कळलेला असतो.
लग्नातील आठवे वचन भाग १ 


" अमोघ, एकदा बघ तरी ना रे. अरे! अशी मुलगी खूप नशिबाने मिळते. दिसायला चांगली, नोकरी करणारी, एकुलती एक आणि महत्वाचे म्हणजे ती परिपूर्ण आहे. फक्त तू एकदा बघा ना रे तिला. एकदा भेटायला काय जातंय तुझं? हे बघ अमोघ, आता पर्यंत आम्ही तुझं ऐकलं होतं पण आता नाही, आता आम्ही जे सांगतोय तेच तुला करावं लागेल समजलं ना." 

सकाळी सकाळी पुन्हा घरात नेहमीचाच वाद सुरु झाला होता. अमोघ ऑफिसची तयारी करून आई बाबांसोबत नाश्ता करायला बसला होताच की आईने पुन्हा तोच विषय उकरून काढला. 

" आई, सारखासारखा एकच विषय नको ना काढत जाऊस. एकदा सांगितले ना तुम्हाला मला नाही करायचं आहे लग्न." अमोघ रागाने भरल्या ताटावरून उठून निघून गेला.

" काय बाई, या पोराला कसं समजवायचं आता? अहो, तुम्ही तरी काही सांगा ना त्याला." आईने बाबांना सांगितले.

" मी काय सांगू? घरातले बाहेर जात नाही तो पर्यंत नवीन कसे काय घरात येतील?" 

" बाबाssss" राहिलेला टिफिन घेण्यासाठी परत आलेला अमोघ बाबांचे बोलणे ऐकून दारातूनच ओरडला.

" काय बाबा? बरोबर बोलत आहेत हे." आईने बाबांची बाजू लगेच घेतली.

अमोघचे लक्ष किचनच्या दारात उभ्या असलेल्या तिच्यावर गेले. डोळ्यांतून वाहणारे अश्रू शिफातीने लपवण्याचा प्रयन्त करत ती किचनच्या दारातच उभी होती. अमोघच्या नजरेतून ते सुटले नाही. त्याने ऑफिसची बॅग तशीच सोफ्यावर टाकली आणि तिच्या हाताला धरून तिला खोलीत घेऊन गेला.

खोलीत नेल्यावर त्याने तिला बेडवर बसवलं स्वतःदेखील तिच्या शेजारी बसला. तिचा हात हातात घेऊन त्याने एकवार तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. जरी शांत असला तरी मनातले काहूर भरल्या डोळ्यांत दिसत होते. भविष्याची भीती अबोल थरथरत्या ओठांना पाहताच जाणवत होती.

" कशाला एवढं वाईट वाटून घेतेस? त्यांचा स्वभावच आहे तो, नाही बदलणार तो कधीच. एकतर आपल्याला ऍडजस्ट करून राहावे लागेल किंवा त्यांच्यापासून वेगळं होऊन राहावे लागेल. त्या शिवाय पर्याय नाही आपल्याकडे. जानू, मला माहित आहे तुला खूप त्रास होतो. त्यांची बोलणी, बोलणी कुठली नुसती आग ओकत असतात ते. त्यांचे ते जीव घेणारे शब्द का ऐकून घेतेस तू? तुला असं हतबल नाही पाहवत मला. प्लिज जानू, आपण खरं काय आहे ते सांगूया त्यांना. किमान ही लग्नाची कटकट तरी संपेल एकदाची." अमोघला खूप राग आला होता. आणि त्याहून जास्त वाईट वाटत होते तिच्यासाठी.

ती म्हणजे रागिणी.. दिसायला सोज्वळ, नक्षत्रासारखी देखणी, गोरा रंग, चाफेकळी नाक, धनुष्यबाण प्रमाणे नाजूक ओठ, अंधाऱ्या रात्रीसारखे काळेभोर डोळे, नदीच्या प्रवाहासारखा वलयदार बांधा, ना जाड ना बारीक, अगदी तिच्या उंचीला शोभेल अशी अप्सरा होती रागिणी. आवाज देखील इतका मधुर की सतत ऐकत राहावे असंच वाटते. जितकी दिसायला सुंदर तितकीच स्वभावाने मृदू होती ती. कोणासमोर मोठ्या आवाजात बोलणे नाही की विनाकारण तक्रार नाही. आपण भले आपले काम भले या तत्त्वांनुसार चालणारी ती, परंतु तिच्याच नशिबात अडचणी कायमस्वरूपी स्थायी झाल्या होत्या.

" जाऊ द्या. नका इतका त्रागा करून घेऊ. मी, मला नाही त्रास होत काही. मी ठीक आहे. एक बोलू, तुम्ही करा लग्न. किमान ते तरी खुश राहतील." 

रागिणीच्या बोलण्यावर तो तडक उठून उभा राहिला.

" काही काय बोलतेस तू रागिणी? मी तुला सोडून कुठे जाणार नाही. माझं लग्न झालं आहे तुझ्या सोबत, माझ्यासाठी आपलं लग्नचं लग्न आहे. मी दुसरं लग्न करणार नाही. आणि माझं दुसरं लग्न लावून देखील ते खुश नाही होणार. त्यामुळे हा विषय पुन्हा नको काढूस. चल तयारी कर आपण बाहेर जाऊन येऊ." अमोघने तिच्या खांद्याला धरून उठवले आणि तिच्या हातात कपाटातली छानशी साडी ठेवली.

" आता? आता नको अमोघ. पुन्हा ओरडतील ते." तिने साडी पुन्हा कपाटात ठेवली.

" ओरडू दे नाही तर आकावतांडव करू दे. सध्या मला तुझ्या सोबत वेळ घालवायचा आहे, आणि तो माझा हक्क आहे. त्यामुळे गप्प चल. आपण दोघे जातोय. चल लवकर." अमोघने तिच्या हातात परत साडी आणून दिली. 

दोघे तयारी करून बाहेर आले. आई बाबा बाहेरच हॉलमध्ये बसले होते. 

" काय रे अमोघ, कुठे निघालास आता यावेळी?" आईने दोघांना तयार झालेले पाहून विचारले.

" आम्ही दोघे जरा बाहेर जाऊन येतोय." अमोघने बूट घालता घालता उत्तर दिले.

" मग दुपारचे जेवण कोण करणार? मला काही काम जमत नाहीत आता. फिरायचं म्हटलं की लगेच निघायचं, आमचा विचार नाही करता येत तुम्हाला? तसं पण आम्ही कोण लागतो तुमचे जे आमच्याबद्दल विचार करायला?" आई रागिणीकडे बघत टोमणे मारत होती.

" बरोबर आहे आई तुझं. ही कोण ना तुझी जे तुझी काळजी करेल, तुझा विचार करेल. आता पर्यंत या दोन वर्षात काहीच केलं नाही ना तिने तुझं? आणि आताच तुला बरं हे सगळं सुचत आहे, आधी तर किती खुश होतीस जेव्हा रागिणी तुझी सेवा करायची, तुला हवं नको ते बघायची. आता काय झाले? आता देखील करतेच ना ती तुझी सेवा?" अमोघ चिडला होता.

" अमोघ, आधीची गोष्ट वेगळी होती. तुमच्या प्रेम विवाहाला आम्ही मान्यता दिली म्हणूनच तुमचं लग्न झाले होते. दुसऱ्या जातीची का होईना पण मुलगीच आहे ना म्हणून तर होकार दिला. पण त्या बाईपणाचा काय फायदा जिथे आईपणच नाही. ते काही नाही अमोघ, आम्ही हिला सांभाळतो ते तुझ्यावरच्या प्रेमापोटी. परंतु, आता नाही. तुला दुसरं लग्न करावेच लागेल. या घराला त्याचा वंशाचा दिवा मिळालाच पाहिजे."

" तुमच्या वंशाच्या दिव्यासाठी मी कोणाचं आयुष्य खराब नाही करणार. नसला तर नसला वारस मला काही फरक पडत नाही. आणि तुम्हाला इतकाच हवा असेल तर आम्ही दत्तक मुलं घेतो. तसे ही या जगात खूप मुले बेवारस फिरत असतात, त्यातले एखादे आपण घेतले तर त्याचे तरी आयुष्य चांगल्या मार्गी लागेल." बाबांचे बोलणे मध्येच तोडत अमोघ दारातूनच बोलला.

" काही नकोय दत्तक मुलं आपल्याला. नको अशी मुले ज्याचं ना कुळ माहित ना जात ना धर्म, जे कोणाच्या रक्ताची आहेत ते देखील माहित नसते कोणाला असं मुलं माझ्या घरण्याचे नाव लावून समाजात वावरणार? मान्य नाही ते मला. या घरात पाटलाचंच रक्त असलेलेच मुलं असेल." बाबा देखील आता चिडले होते.

ऐकेल का अमोघ बाबांचं? काय करतील बाबा आता? 

क्रमश:


🎭 Series Post

View all