लग्नातील आठवे वचन भाग २

वचन फक्त देण्यासाठी नसावे. जोडीदार आपल्याला साजेसा असेल तर परिस्थिती कितीही अवघड असो सुख मिळतेच.
लग्नातील आठवे वचन भाग २ 

" हे पण बेस्ट आहे. आपल्याच नातेवाईकांच्या मुलांपैकी एखादं मुलं दत्तक घेतो. घरातल्या घरात देखील राहील मुलं आणि आपल्याच कुळातील, आपल्याच रक्ताचे असेल. चालतंय" अमोघ आनंदाने बोलला.

" अमोघss उगाच शहाणपणा करू नकोस. आपल्या रक्ताचं म्हणजे तुझ्या रक्ताचं. तुझ्या पासूनच या घराला वारस हवाय, आणि त्यासाठी तुला दुसरं लग्नच करावेच लागेल." बाबा रागात बोलले तसा अमोघ शांत झाला.

" ते शक्य नाही बाबा. मी रागिणी सोडून इतर कुठल्याच मुलीचा बायको म्हणून स्विकार करणार नाही. तुम्ही सांगितलेल्या अटीवर मला या घराला वारस देता येणार नाही. मला माफ करा बाबा परंतु माझं दुसरं लग्न कधीच होणार नाही." अमोघने रागिणीच्या हाताला धरले आणि तिला घेऊन तो घराबाहेर पडला.

" तुम्ही का करत नाही दुसरं लग्न. मला माहितेय तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि हे प्रेम असंच राहील यावर विश्वास आहे माझा. तुमच्या दुसऱ्या लग्नामुळे आईबाबा तरी खुश होतील." रागिणी त्याला पुन्हा समजावू लागली.

" ठीक आहे. करतो मी दुसरं लग्न. पण एका अटीवर." अमोघ तिच्याकडे पाहू लागला.

" तुम्ही दुसरं लग्न करणार असाल तर मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहेत. बोला तुम्ही, काय करू मी? तुम्ही जे सांगाल ते करेल मी." रागिणी उत्साहात बोलून गेली.

" हो का. ठीक आहे मग. घरच्यांना सगळं खरं सांग." अमोघ म्हणाला तसं तिच्या चेहऱ्यावरचा आनंद नाहीसा झाला.

" तुम्हाला माहितेय मी असं काही नाही करणार." तिने त्याच्या पासून तोंड लपवले.

" मला माहितेय तू कधीच असं करणार नाही. पण मी केलीय ना, खूप मोठी चूक. त्याची शिक्षा तर मला मिळायलाच पाहिजे ना. म्हणून सांगतोय, घरच्यांना सांग सगळं, नाहीतर तुझी शपथ मागे घे माझं मीच खरं सांगतो त्यांना." तो असं म्हणताच तिने त्याचा हात घट्ट पकडला.

" नाही हं! तुम्ही असं काहीच करणार नाही. माझी शपथ तुम्ही कधीच मोडायची नाही." तिने त्याला मिठी मारली. त्याच्या मिठीत ती ढसाढसा रडू लागली. त्याने मायेने तिच्या पाठीवरून हात फिरवला. थोडा वेळ बाहेरच खाऊन, फिरून संध्याकाळी ते घरी परतले.

घरी आल्यावर आईने तिच्याकडे पाहिले देखील नाही. बाबा देखील रागावले होते. अमोघ सरळ त्याच्या खोलीत निघून गेला. रागिणी किचनमध्ये आली. दुपारची खरकटी भांडी घासून तिने सर्वांसाठी चहा करायला ठेवला. आई बाबांना चहा देऊन तिने स्वतःचा आणि अमोघचा चहा खोलीतच नेला.

घरच्या वादामुळे आज देखील अमोघची ऑफिसला दांडी झाली होती. या महिन्यातील त्याची ही पाचवी दांडी होती. ऑफिसमधून आतापर्यंत फोन वर फोन येऊ लागले होते. तो त्याच्या बॉसला झालेली परिस्थिती समजावून सांगत होता. 

" रागिणी, मी काय म्हणतोय तू अशीच घरी बसण्यापेक्षा पुन्हा ऑफिस का नाही जॉईन करत. बॉस पण तुला विचारत होते. लग्नाच्या आधी जसं आपण दोघे एकत्र काम करायचो, एकाच ऑफिसमध्ये तसं आताही करू शकतो. इथे घरात बसून त्यांचे बोलणे ऐकून तुला त्रास होईल त्यापेक्षा ऑफिसमध्ये स्वतःच अस्तित्व तरी जपशील. तर मग येतेस का उद्याच माझ्यासोबत ऑफिसला? मी सांगतो बॉसला." अमोघ चहाचा एक घोट पीत म्हणाला.

" उद्या? ऑफिसला? नको रे. आईंच्या अंगावर सगळी कामे पडतील घरातली. आणि तसं ही मला आता काहीच रस राहिला नाही काम करण्यात. त्यापेक्षा राहू दे. मी घरीच ठीक आहे." रागिणीने एकाच घोटात सगळा चहा संपवला.

" माझ्यासोबत नाही तर दुसरीकडे प्रयन्त कर जॉबसाठी. पण अशी घरात बसून राहू नकोस. मी उद्याच तुझ्यासाठी दुसरीकडे जॉब बघतो. चल, जरा ऑफिसचं काम करतो आता. तू थोडा आराम कर नंतर जेवणाला लाग." 

अमोघचं ऐकून रागिणी तिथेच त्याच्या बाजूला आडवी झाली.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 

" या ना नाडकर्णी, अहो किती वाट बघायची तुमची. मला वाटलं विसरलात की काय?" घरात आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करत बाबांनी त्यांना सोफ्यावर बसवले.

" नाही हो, विसरेन कसा मी? तुम्ही इतक्या आवर्जून बोलावले आहे म्हंटल्यावर मी येणार नाही असं होईल का? ते तर हिच्यामुळे उशीर झाला. ओळख करून देतो. ही माझी पुतणी प्राची. प्राची बाळा, हे माझे जुने मित्र प्रताप पाटील. आम्ही एकत्रच काम देखील केले बरं का. आणि पाटील ही प्राची, ही मागच्याच वर्षी पदवीची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. सध्या ती एका कंपनीमध्ये लेखापाल म्हणून कार्यरत आहे." 

नाडकर्णींनी ओळख करून दिली तसं प्राचीने पुढे येऊन नमस्कार केला. रागिणी सर्वांना चहापाणी घेऊन आली.

" ह्या कोण?" प्राचीने रागिणीकडे पाहत विचारले.

" हा घ्या आमचा मुलगा आला." बाबा अचानक दरवाज्याकडे बघत बोलले. उंबरठ्याजवळ नुकताच अमोघ आला होता.

" नमस्कार." अमोघने आल्या आल्या नाडकर्णी आणि प्राचीला नमस्कार केला.

" अमोघ, ही प्राची, नाडकर्णीची पुतणी. तुला बघायला आली आहे." बाबाचे शब्द ऐकताच रागिणीच्या हातून पाण्याचा ग्लास पडला. अमोघचा हसरा चेहरा एकाएकी रागीट झाला.

" बाबाsss! मी सांगितले होते ना तुम्हाला मला दुसरं लग्न नाही करायचं आहे म्हणून, मग कशाला हा घाट घातला?" अमोघ रागाने पेटला होता.

" कायsss! दुसरं लग्न? काका, ह्यांचं दुसरं लग्न आहे हे. आणि तुम्ही ह्यांच्यासाठी मला विचारले?" प्राची चिडून जागेवरून उठली.

" प्राची बाळा, अगं मुलगा चांगला आहे म्हणून मी.." नाडकर्णी बोलतच होते की प्राचीने त्यांना हात दाखवून गप्प केले. रागाने ती तिथून निघून गेली.

" काय गरज होती तुला मध्ये बोलण्याची? आम्ही नंतर पाहून घेतले असते. सध्या लग्न होणं गरजेचं होत. तू स्वतःहून तयार होत नाहीस आणि आम्ही करतोय तर त्यात देखील आडकाठी आणत आहेस. मुलगा आहेस की वैरी आहेस तू?" प्राची गेली तसं बाबा अमोघवर चिडले.

" मी मुलगाच आहे अजून तरी, म्हणूनच तुम्हाला चुकीचं करण्यापासून अडवत आहे. तुमच्या एका हट्ट पायी तीन तीन आयुष्य पणाला लागत आहे कसं कळत नाही तुम्हाला हे?" अमोघ देखील माघार घेत नव्हता. शब्दाला शब्द वाढतच होते.

" त्यात काय चुकीचं आहे? मी करतोय ते बरोबरच आहे. नाडकर्णीला मी सगळं काही सांगितले होते. त्याच्या पुतणीला आम्ही लग्न झाल्यावर सांगणार होतो. ती इथे येणं जास्त महत्वाचे होते आधी. म्हणून, तिला नाही सांगितले." बाबा स्वतःची बाजू सावरत होते.

काय होईल आता पुढे? अमोघ करेल का दुसरं लग्न? कोणतं आहे ते सत्य जे रागिणी जीवापाड लपवत आहे?

क्रमश:


🎭 Series Post

View all