Login

लग्नगाठ भाग 2

About Love And Marriage

"अगं रेखा, एक आनंदाची बातमी आहे. आशाताईचा फोन आला होता. ताईने सांगितलं की, 'आपल्या स्मितासाठी एक चांगले स्थळ आले आहे. त्यांनी स्वतःहून स्मिताला लग्नासाठी मागणी घातली आहे. अनिताच्या सासरच्या नात्यातील आहे हे स्थळ. अनिताच्या लग्नात त्यांनी स्मिताला पाहिले होते. त्यांना ती आवडली आणि लग्नात मुलगाही आलेला होता. स्मिताला त्यानेही पाहिले होते. त्याच्याकडूनही पसंती आहे.'
ताईने खात्रीच्या लोकांकडून मुलाविषयी व त्याच्या कुटुंबाविषयी सर्व माहिती मिळवली आहे. त्या लोकांनी त्यांच्याबद्दल सर्व चांगले सांगितले आहे. मुलगा दिसायला चांगला व हुशार आहे. घरची परिस्थिती श्रीमंतीची आहे. स्मिता खूप सुखात राहील. नशीबवान आहे मुलगी. असे सर्वजण सांगत होते. ताईचे वहिनींशी याबाबतीत बोलणेही झाले आहे. आणि आता ताईने मला फोन करून हे सर्व सांगितले आहे."

विद्याचे बाबा अरुणराव आपल्या पत्नीस आनंदाने हे सर्व सांगत होते.

"अरे वा! खूपच छान! सर्व काही चांगले असेल आणि योग जुळत असेल तर लग्न करायला काही अडचण नाही. तसेही वहिनी स्मिताच्या लग्नासाठी स्थळे शोधतच होत्या. घरबसल्या चांगले स्थळ आले आणि तेही इतके चांगले. त्यामुळे वहिनींनी यात काही आडकाठी आणू नये. सरळ लग्नाची तयारी करावी."

अरुणरावांनी आनंदाची बातमी रेखाताईंना सांगताच, त्यांनाही खूप आनंद झाला व त्यांनी आपले विचार व्यक्त केले.

स्मिताला आलेल्या चांगल्या स्थळामुळे अरुणराव व रेखाताई यांना खूप आनंद झाला होता व त्यांनी ही आनंदाची बातमी विद्याला सांगितली; पण विद्याला त्यांच्यासारखा आनंद झालाच नाही. एरव्ही स्मिताच्या प्रत्येक आनंदात तिला आनंद वाटायचा; पण आजच्या या आनंदी बातमीने विद्याला आनंद झाला नाही उलट मन उदास झाल्यासारखे तिला वाटत होते. विद्यालाही आपल्या अशा वेगळ्या वागण्याचे कारण समजत नव्हते.

आई बाबांसमोर जरी ती आपल्याला आनंद झाला आहे. असे आनंदी चेहरा करत दाखवत होती; पण तिच्या मनाला खरा आनंद झाला नव्हता. हे तिला कळत होते.


रीतसर मुलगी पाहण्याचा कार्यक्रम व पुढचे सर्व काही ठरवण्यासाठी वहिनींशी बोलावे व तसे ठरले की मग गावी जाऊ. असे आई बाबांचे बोलणे सुरू होते व ते त्या तयारीला लागलेही. दोघांच्याही अंगात एक वेगळाच उत्साह संचारला होता.

'स्मिता खरंच खूप सुंदर आहे. तिचे रूप पाहून कोणीही तिच्या प्रेमात पडेल अशीच आहे ती!
अनिताच्या लग्नात स्मिताला पसंत करणारा मुलगाही आलेला होता. असे बाबा सांगत होते. कोण होता तो?'

विद्या आपल्या विचारात गुंतून गेली.


क्रमश:
नलिनी बहाळकर


सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन fevorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
0

🎭 Series Post

View all