Login

लग्नगाठ भाग 3

About Love And Marriage
"आई व बाबा, स्मिताच्या साखरपुड्याला मी नाही येणार. मला खूप अभ्यास आहे. गावी गेलो की दोन-तीन दिवस जातातच."

विद्याने शांतपणे आई-बाबांना सांगितले.

"काय! हे काय तुझे आता!"

आईने आश्चर्याने आणि थोड्या मोठ्या आवाजाने विद्याला विचारले.

विद्याचे बाबा त्यांच्या मूळ स्वभावाप्रमाणे शांत होते. विद्याचे म्हणणे त्यांनी शांतपणे ऐकून घेतले. तिच्या म्हणण्याला त्यांनी लगेच काही प्रतिक्रिया दिली नाही.

"तू आणि तुझे बाबा काय करायचे ते ठरवा. मला यातले काही सांगू नका. बाबांनीच तुला डोक्यावर बसवले आहे. त्यांनाच सांग तू "

आईने विद्याला असे सांगितले आणि बाबांनी मुलीला कसे लाडवून ठेवले आहे.. याचा पाढा वाचत ती तिच्या कामाला लागली.

"विद्या बेटा, तुला खरंच खूप अभ्यास आहे का? की अजून दुसरे काही कारण आहे; ज्यामुळे तू स्मिताच्या साखरपुड्याला येत नाही आहे. तसे काही असेल तर सांग बरं बेटा. तू जर साखरपुड्याला आली नाही तर वहिनींना व स्मितालाही वाईट वाटेल. तू आली नाही तर स्मिता नाराज होईल. ती अशी नाराज झालेली तुला आवडेल का?
तू साखरपुड्याला यावे. अशी माझी इच्छा आहे. वाटलं तर तू आणि अनिकेत साखरपुड्याच्या दिवशीच या आणि त्याच दिवशी घरी निघून या. मी आणि रेखा अगोदर जातो."

अरुणरावांनी विद्याला शांतपणे सांगितले व ते आपल्या कामासाठी निघून गेले.

आशा आत्याच्या मुलीच्या लग्नात स्मिता त्या लोकांना आवडली आणि त्यांनी स्वतःहून तिला मागणी घातली. मुलगा व घरातील परिस्थिती हे सर्व पाहून आणि योग ही चांगले जुळत असल्याने स्मितासाठी हे स्थळ नक्की झाले. स्मिताच्या आईलाही हे स्थळ खूप आवडले त्यामुळे त्यांचा या स्थळाला होकार मिळाला. सर्वजण पुढच्या तयारीला लागले आणि लवकरच साखरपुडा करण्याचे ठरले.

अरुणराव स्मिताचे काका असले तरी स्मिताला वडील नसल्याने आता त्यांना तिच्या लग्नाची सर्व जबाबदारी पार पाडायची होती.
आणि ते आनंदाने सर्व जबाबदारी पार पाडत होते.

स्मिता आपली काकांची मुलगी आहे आणि आपली एक चांगली मैत्रीणही आहे. तिला चांगले स्थळ मिळाले याचा विद्याला एकीकडे आनंद होत होता ; पण दुसरीकडे तिचे मन उदास होते.
इतर गोष्टींपेक्षा फक्त अभ्यासात लक्ष देणारी, जीवनात काही चांगले करण्याचे स्वप्न पाहणारी विद्या..पहिल्याच भेटीत एका मुलाच्या प्रेमात पडली. त्या मुलाच्या विचाराने तिचे मन विचलित राहू लागले. आपल्या मनातली ही परिस्थिती ती कोणाला सांगू शकत नव्हती आणि या अस्वस्थ मनाने स्मिताच्या साखरपुड्याला जाऊ नये. या विचाराने ती अभ्यासाचे कारण सांगत जाण्यासाठी टाळाटाळ करत होती.


क्रमश:
नलिनी बहाळकर


सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन fevorite ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
0

🎭 Series Post

View all