"आई, हे बघ ना..ही स्मिता माझा खाऊ खाते आहे."
आपल्या मुलीचा रडवेला आवाज ऐकून रेखाताई मुली जवळ आल्या आणि तिला म्हणाल्या.
"काय झालं बेटा, का रडते आहेस?"
आईने मायेने जवळ घेऊन असे विचारल्यावर विद्याला जास्तच रडू आले आणि रडतच ती म्हणाली,
"आई, ही स्मिता माझा खाऊ खाते आहे. तिने तिचा खाऊ पटकन संपवला आणि तिचा संपला म्हणून आता माझा घेते आहे."
रडणाऱ्या विद्याला शांत करत रेखाताई स्मिताला समजावत म्हणाल्या,
"स्मिता बेटा, तू तुझा खाऊ खाल्लास ना? आता विद्याला तिचा खाऊ खाऊ दे ना."
"काकी, मला खाऊ खूप आवडला म्हणून मी माझा पटकन संपवला आणि अजून पाहिजे होता म्हणून मी विद्याचा खाऊ घेतला थोडासा."
स्मिता धीटपणे म्हणाली.
तिच्या या बोलण्यावर तिला काही न बोलता रेखाताई विद्याला म्हणाल्या.
"बेटा, तू पण तुझा खाऊ लवकर संपवायचा ना. इतका वेळ लावते खायला आणि मग दुसऱ्यांनी घेतला की रडत बसते."
रेखाताईंनी विद्याला समजावले व नंतर आपल्या कामाला निघून गेल्या.
लहान मुले एकमेकांशी भांडतातही आणि पुन्हा एकत्र खेळतातही. पण या लहान मुलांच्या भांडणात मोठे पडले की मोठ्यांमध्ये वाद होतात,भांडणे होतात व घरातील चांगले वातावरण दूषित होते.
प्रत्येक आईला आपलं बाळ प्रिय असतं. आपलं बाळ गुणाचं आणि दुसऱ्याच बाळ चुकीचं! या समजूतीने लहान मुलांच्या भांडणात मोठे लोक दुसऱ्यांच्या मुलांना चुकीचे ठरवतात आणि मग मोठ्यांमध्ये भांडणे, वाद-विवाद सुरू होतात आणि ही गोष्ट जर एकत्र कुटुंबात होत असेल तर अशा वेळी लहान मुले बाजूलाच राहतात आणि मोठ्यांमध्ये दुरावा निर्माण होतो आणि शेवटी एकत्र कुटुंब हे विभक्त होऊन जाते.
रेखाताईंना माहित होते की, आपली विद्या शांत स्वभावाची आहे आणि ती दुसऱ्याची वस्तू कधीही घेत नाही. त्याउलट स्मिता ही चंचल, खोडकर व हट्टी आहे. आपल्याला जी वस्तू हवी आहे; ती मिळवण्यासाठी ती प्रयत्न करते.
विद्या व स्मिता दोघीही लहानच. त्यामुळे रेखाताईंनी दोघांना त्यांना आपल्या परीने समजविण्याचा प्रयत्न केला.
पण असे पुन्हा पुन्हा होऊ लागले की त्यांना स्मिताचा राग यायचा.
स्मिताला वडील नव्हते म्हणून तिच्याबद्दल त्यांना वाईटही वाटायचे.
स्मिताला वडील नव्हते म्हणून तिच्याबद्दल त्यांना वाईटही वाटायचे.
त्यांनी स्मिताच्या आईला सांगून तिला समजवण्यास सांगितले. स्मिताच्या आईने तिला प्रेमाने समजावून सांगितले ; पण तिच्या वागण्यात पाहिजे तसा बदल होत नव्हता. तिचा हा धीट आणि पाहिजे ते मिळविण्याचा हट्टी स्वभाव, तिच्या पुढील आयुष्यात काय करणार होता? याची कोणालाच कल्पना नव्हती.
क्रमश:
नलिनी बहाळकर
नलिनी बहाळकर
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा