Login

लग्नगाठ भाग 5

About Love And Marriage
लहानपणी आपल्या वाट्याचा खाऊ खाणारी,आपली खेळणी घेणारी आणि स्वतःच्या आनंदासाठी आपल्याला रडवणारी स्मिता.. विद्याला आज पुन्हा आठवली, जेव्हा विद्याने स्मिताच्या साखरपुड्यात त्याला पाहिले.

'आज पुन्हा तिने माझ्या वाटेचे सुख स्वतःकडे घेतले.
लहानपणी तर ती स्वतःहून त्या वस्तू माझ्याकडून घेऊन घ्यायची; पण नियतीने म्हणा की तिच्या नशिबाने तिला ते सुख, तो आनंद आज आपसूकच मिळाला. लहानपणी ती जेव्हा माझ्या वस्तू घ्यायची तेव्हा मला तिचा राग यायचा, मी रडायची आणि आई मला पुन्हा दुसरा खाऊ आणून द्यायची, दुसरे खेळणे देऊन आई मला शांत करायची. मी तेवढ्यावर खुश होऊन जायची आणि पुन्हा स्मिताबरोबर आनंदाने खेळायची. तिच्याबद्दल आलेला राग विसरूनही जायची.
पण आज लहानपणासारखे रडू शकत नाही आणि आईला सांगूही शकत नाही की, स्मिताने माझ्या हक्काचे काय घेतले आहे आणि सांगणार तरी काय?

जिचा प्रेम, लग्न वगैरे या गोष्टींवर विश्वास नव्हता. जीवनात अभ्यास व करियर या गोष्टींना महत्त्व देणारी तिची ही मुलगी पहिल्याच भेटीत एका मुलाच्या प्रेमात पडली. ज्याचे तिला नाव गाव वगैरे काही माहिती नाही. तो पुन्हा कधी भेटेल हे ही माहीत नाही. पण तरी त्याच्यासोबत लग्नाचे स्वप्न पाहत होती.आणि तो आज तिला पुन्हा भेटला.

एकीकडे तो पुन्हा भेटण्याचा अविश्वसनीय आनंद होत होता; पण दुसरीकडे जेव्हा त्याची ओळख झाली तेव्हा मनापासून खूप दुःख झाले.

अनिताच्या लग्नात स्मिता ज्यांना आवडली होती आणि लग्नाची ज्यांनी मागणी घातली होती ते हेच स्थळ होतं आणि ज्या मुलाला स्मिता आवडली होती तो हाच मुलगा!

नियतीने माझी कशी थट्टा केली होती. माझ्या नशिबात प्रेम नव्हते तर मग का माझ्या मनात त्याच्याविषयी प्रेमाचे बीज निर्माण केले?
माझे आयुष्य अगोदर किती छान होते! माझा अभ्यास आणि मी एवढेच तर होते.

प्रेमाच्या बाबतीत शुष्क असलेल्या माझ्या मनात त्याच्याविषयी प्रेमाचा ओलावा आणला आणि त्यामुळे मी प्रेमाच्या दुनियेचा आनंद घेऊ लागली. रोमँटिक गाणी ऐकू लागली. प्रेमकथा आवडीने वाचू लागली आणि त्या कथेतील नायिकेच्या जागी मी स्वतःला समजू लागली. एका वेगळ्याच दुनियेचा अनुभव मी घेऊ लागली आणि ज्याच्यामुळे माझे जीवन बदलले होते..तो माझ्या स्वप्नांचा राजकुमार आज स्मिताचा होणारा नवरा म्हणून माझ्यासमोर उभा होता.

मला या साखरपुड्याला यायचीच इच्छा नव्हती. का कुणास ठाऊक? माझे मन यायला तयारच नव्हते; पण स्मिताने मला येण्यासाठी खूप आग्रह केला, त्यामुळे यावे लागले. नाही आले असते तर बरे झाले असते.. असे आता वाटते आहे.

क्रमश:
नलिनी बहाळकर

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all