Login

लग्नगाठ भाग 6

About Love And Marriage

"अगं बेटा, आपण केलेल्या छोट्याशा गोष्टीमुळे जर कोणाला आनंद होत असेल तर आपल्याला ती गोष्ट करायला काय हरकत आहे. तुझ्यातला थोडा खाऊ स्मिताला दिल्यावर तिला आनंद होत असेल तर दे ना."

बाबा त्यांच्या स्वभावाप्रमाणे मला असे छान समजून सांगायचे, जेव्हा त्यांच्याकडेच मी स्मिताच्या वागण्याची तक्रार करायची.

बाबांनी सांगितल्याप्रमाणे मी तसे करतही होते. माझ्या वागण्याने स्मिताला आनंदही होत होता. तिचा आनंदी चेहरा पाहून मलाही आनंद होत होता; पण 'आपली हक्काची वस्तू इतरांना का द्यायची?' हा प्रश्न माझ्या मनात कायम असायचा.


बाबा मला हे सर्व समजावत असताना, बाबांचा आवाज काहीसा बदललेला असायचा आणि डोळ्यात पाणी आलेले असायचे. तेव्हा लहानपणी मला एवढे काही कळायचे नाही; पण नंतर मी जशी मोठी होत गेले तसे बाबांच्या वागण्या बोलण्यातून, स्वभावातून त्यांनी इतरांच्या आनंदासाठी, सुखासाठी..आपल्या आनंदाचा, आपल्या सुखाचा त्याग केला. असे जाणवू लागले होते.

इतरांच्या आनंदासाठी आपल्या सुखाचा त्याग करणे सोपे नसते. असे करताना मनाला खूप त्रास होतो. यासाठी आपले मन खूप मोठे असावे लागते. माझ्या बाबांचे मन खूप मोठे आहे; म्हणून ते इतरांच्या सुखाचा जास्त विचार करतात.

बाबांसारखे मोठे मन माझे तर होऊ शकत नाही ; पण माझ्यासमोर आता परिस्थिती अशी आहे की, इतरांच्या सुखात म्हणजे स्मिताच्या व तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या सुखात, आनंदात मी फक्त आनंदच मानू शकते.
हे करताना माझ्या मनाला नक्कीच त्रास होणार आहे.


मी माझ्या मनातील त्याच्याविषयीच्या भावना आता व्यक्तही करू शकत नाही आणि केल्या तरी आता मला सर्वजण स्वार्थी समजतील. स्मिताचे सुख तुला सहन झाले नाही. असा माझ्यावर आरोप करतील. मला चुकीचे ठरवतील. आणि माझ्यामुळे माझ्या आईबाबांना त्रास झालेला मला आवडणार नाही.

लग्नगाठ देवच बांधत असतो. असे म्हणतात.
कदाचीत स्मिताची व त्याची लग्नगाठ बांधलेली असेल.
माझी नसेल त्याच्याबरोबर बांधलेली लग्नगाठ.


मला तो पहिल्या भेटीत आवडला आणि त्याच्यावर मी प्रेम करू लागले होते.
आपल्याला आवडणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळतेच असे नाही. आणि आपण ठरवतो तसे होतही नाही. नशीब, प्रारब्ध, दैव यानुसार आयुष्यात आपल्याला मिळत असते आणि आपल्या आयुष्यात तसेच घडतही असते.

तो माझ्या आयुष्यात आला. त्याच्याबद्दल माझ्या मनात प्रेम निर्माण करून गेला. हे सर्व मी एक छान स्वप्न समजून विसरून जाते.असे करण्यातच माझे व इतरांचेही सुख आहे.'

असे मनाशी ठरवून विद्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात सहभागी झाली.


क्रमश:
नलिनी बहाळकर


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all