Login

लग्नगाठ भाग 7

About Love And Marriage
गोऱ्या रंगाला शोभून दिसणारी मरून रंगाची साडी नेसलेली, आपल्या मूळच्या सौंदर्याला साजेसा मेकअप करून नटलेली स्मिता खरंच खूप छान दिसत होती.

आपल्या स्मिताकडे पाहून छायाताईंचे मन भरून आले. आनंद व दुःख असे संमिश्र भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते. आणि मनातल्या भावनांनी डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या.

'आपली मुलगी आता दुसऱ्याची होणार.'

या विचाराने प्रत्येक आई-वडिलांसाठी हा भावनिक क्षण असतो.

छायाताईंसाठी तर हा क्षण खूपच भावनिक होता. कारण त्यांनी स्मिताची आई व वडील अशा दोन्ही भूमिका छान पार पाडल्या होत्या. वडिलांची उणीव कधी भासू दिली नाही. पतीच्या निधनानंतर दुसरे लग्न करण्यासाठी त्यांना अनेकांनी सांगितले होते. पण मुलींच्या काळजीने त्यांनी स्वतःच्या सुखाचा विचार कधी केला नाही.

आज स्मिताला साखरपुड्याच्या दिवशी छायाताईंना आपल्या पतीची खूप आठवण येत होती. त्यांची उणीव भासत होती.

'आज हे असते तर... त्यांनाही किती आनंद झाला असता! आजचा कार्यक्रम अजून खूप छान केला असता. किती हौस होती त्यांना सर्व गोष्टींची.'

या विचारांनी त्यांना शहारून आले.

"काय गं आई, का रडतेस?"

स्मिताने आपल्याकडे मायेने पाहत असलेल्या आपल्या आईला विचारले.

"अगं, हे सुखाचे अश्रू आहेत. तुला नाही कळणार अजून."

छायाताई स्मिताला मायेने जवळ घेत म्हणाल्या.

"स्मिता, तू खरंच खुश आहेस ना बेटा? तू आनंदी राहावी. हीच माझी इच्छा."

छायाताई स्मिताच्या पाठीवरून मायेने हात फिरवत म्हणाल्या.

"हो गं आई, मी खरंच खुश आहे. तू फक्त आता तुझी काळजी घे. माझी काळजी नको करू."

स्मिता आपल्या डोळ्यातील अश्रू लपवित आईला म्हणाली.

छायाताईंप्रमाणेच स्मिताही भावूक झाली होती.

प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील हा सुखद क्षण असतोच पण त्याबरोबर खूप भावनिकही असतो. नवीन नाते, नवीन आयुष्य सुरू करताना जन्मापासून ते आतापर्यंतच्या प्रवासातील क्षण, खूप साऱ्या आठवणी आणि प्रेमाची नाती; यामुळे मनात अनेक भावना दाटून येतात. या भावनांमुळेच स्मिताही खूप भावुक झाली होती आणि तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते.

"काय सुरू आहे मायलेकीचं? अरे आज घरात आनंदाचे वातावरण आहे आणि तुम्ही दोघी इतक्या इमोशनल का झाल्या आहेत?"

आपल्या आईला व ताईला रडताना पाहून पूर्वा म्हणाली.

"ताई, आज तू खरंच खूप छान दिसते आहेस. कोणाची नजर न लागो माझ्या ताईला."

पूर्वा आपल्या ताईची स्तुती करत व वातावरण थोडेसे हसरे करत म्हणाली.

स्मितानेही मायेने पूर्वाला मिठी मारली.

" स्मिता, तुझ्या आयुष्यातील नवीन प्रवासाला आज सुरुवात होणार आहे. तू बाबांच्या फोटोला नमस्कार कर आणि त्यांचा आशीर्वाद घे."

छायाताई हळव्या स्वरात स्मिताला म्हणाल्या.

"हो आई, मी नमस्कार करणारच होते. बाबांचे व तुझे आशीर्वाद माझ्या व पूर्वाच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे आहेत."

स्मिता असे म्हणत बाबांच्या फोटो समोर हात जोडून उभी राहिली.

तिच्यासोबत छायाताई व पूर्वाही फोटोसमोर हात जोडून उभ्या राहिल्या.
तिघांच्याही मनात खूप सार्‍या भावना होत्या व डोळ्यात पाणी होते.

क्रमश:
नलिनी बहाळकर


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all