'स्मिताचे नशीब खरंच चांगले आहे. खूप चांगले सासर मिळाले तिला. ते श्रीमंतही आहेत व खूप समजूतदारही आहेत. स्मिताला वडील नाही आणि आर्थिक परिस्थिती त्यांच्याइतकी तोलामोलाची नाही. हे सर्व माहीत असूनही आणि बाकी काही न बघता, त्यांनी तिला लग्नाची मागणी घेतली. चांगलेच झाले ना! छायाताईंनाही स्थळ शोधण्याचा जास्त त्रास झाला नाही. खूप शोधूनही इतके चांगले स्थळ भेटले नसते. देवाची कृपाचं म्हणावी.'
साखरपुड्याला आलेल्या स्त्रियांमध्ये असे सर्व बोलणे सुरू होते. यातील काहींना खरंच खूप आनंद झाला होता व त्या मनापासून स्मिताला आशीर्वाद देत होत्या. तिच्याबद्दल चांगला विचार करत होत्या. तर काही अशाही होत्या; ज्यांना छायाताईचे व स्मिताचे सुख बघितले जात नव्हते. चेहऱ्यावरून जरी त्यांना आनंद झाला असे वाटत असले तरी मनातून त्यांना वाईट वाटत होते.
नात्यात असो की शेजारीपाजारी, प्रत्येकाच्या आयुष्यात असे लोक असतातच, ज्यांना दुसऱ्यांचे सुख सहन होत नाही. इतरांचे वाईट होण्यात ते आपले सुख शोधत असतात.
स्मिताच्या सासरची मंडळी श्रीमंत तर होतीच आणि हौशीही होती. त्यांच्याइतके नाही पण आपल्या परीने होईल तसा छायाताई साखरपुड्याचा कार्यक्रम छान करण्याचा प्रयत्न करत होत्या. पतीची उणीव त्यांना जाणवत होती.पण सासूबाई, दोन्ही दीर, दोन्ही जाऊ व दोन्ही नणंद यांच्या मदतीने त्यांना धीर आला होता.
पतीच्या निधनानंतर मनाने खचलेल्या छायाताईंना या सर्वांनी छान सावरले होते. त्यांच्या आधाराने दोन छोट्या मुलींसोबत त्या जीवनाचा पुढचा प्रवास करत होत्या. माहेरच्या लोकांचीही त्यांना छान साथ भेटली होती.
आनंदाच्या प्रसंगी,दुःखाच्या प्रसंगी साथ देणारे व मदतीला येणारे नातेवाईक असतील तर खूप चांगले वाटते. काम सोपे होऊन जाते. जीवनात उत्साह येतो.
छायाताईंना असाच अनुभव आज स्मिताच्या साखरपुड्यात येत होता. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह दिसून येत होता.
स्मिताच्या सौंदर्यावर लट्टू झालेला विनय तर खूपच खुश होता. तो ही छान, गोरापान, दिसायला देखणा होता आणि स्मितावरील प्रेमामुळे आज त्याचा चेहरा जास्तच खुललेला दिसत होता. सर्वांची नजर चुकवत तो स्मिताकडे पाहत होता. त्याच्याबरोबर आलेले त्याचे मित्र त्याची गंमत पाहत होते. त्याला अजून चिडवत होते. त्रास देत होते. वरवर जरी तो त्यांना रागवत होता. शांत करत होता. पण मनातून त्याला ते सर्व आवडत होते.
"स्मिता, आमचे होणारे जिजाजी खूपच हँडसम आहेत. खूप लकी आहे गं तू. त्यांना एखादा भाऊ वगैरे आहे का गं? असेल तर आमची थोडी सेटिंग करून दे ना..."
स्मिताच्या मैत्रिणी तिला गंमतीने म्हणत होत्या.
"त्यांचा भाऊ कशाला हवा? त्यांच्याबरोबरच लावते ना तुमची सेटिंग.. मी नाही करत एंगेजमेंट त्यांच्यासोबत. तुमच्यासाठी काहीही करेल. चालेल ना तुम्हांला?"
स्मिता ही त्यांची गंमत करत म्हणाली.
हे सर्व बोलणे विद्या ऐकत होती.
'तू जर असे करत असशील तर माझा नंबर पहिला असेल.'
विद्या मनातच म्हणाली.
'पण असे कधी होणार नाही आणि आता जे होते आहे तेही चांगलेच आहे. स्मिता तिच्या आयुष्यात सुखाची राहो. हीच देवाला प्रार्थना.'
या विचाराने विद्याने आपल्या डोळ्यातील अश्रू सर्वांपासून लपवले आणि ती आईला कामात मदत करायला गेली.
क्रमश:
नलिनी बहाळकर
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा