Login

लग्नगाठ भाग 9

About Love And Marriage
अपेक्षेपेक्षा खूप चांगला साखरपुड्याचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला; म्हणून छायाताई आणि घरातील सर्वजण खूप आनंदी होते.

'कार्यक्रम छान झाला. मुलगाही खूप चांगला आहे.'

कार्यक्रमाला आलेल्या सर्व पाहुणेमंडळींकडून अशा प्रतिक्रिया येत होत्या.

या प्रतिक्रिया ऐकून छायाताईंच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.

' देवाची कृपा व आपल्या सर्वांच्या शुभेच्छा यामुळे सर्व छान झाले.'

असे म्हणत त्या सर्वांचे आभार मानत होत्या.

लग्नाची तारीख तीन महिन्यानंतरची काढली होती.

स्मिता B. Sc. च्या शेवटच्या वर्षाला होती. तिच्या परीक्षा संपल्या नंतरची लग्नाची तारीख काढण्यात आली होती. त्यामुळे लग्नाच्या तयारीला पुरेसा वेळ मिळणार होता.

साखरपुड्याच्या कार्यक्रमाप्रमाणे लग्नही छान निर्विघ्नपणे पार पडावे. असे छायाताईंना वाटत होते आणि त्यासाठी त्या देवाला प्रार्थना करत होत्या.


कार्यक्रम छोटा असो की मोठा. तो चांगला व्हावा यासाठी प्रत्येकजण छान नियोजन करत असतो; पण असे काही प्रसंग निर्माण होतात की तो कार्यक्रम मनासारखा छान होत नाही.

काही गोष्टी आपण ठरवतो त्यापेक्षा वेगळ्याच घडतात. त्या वेळी आपल्याला नशीब, कर्म वगैरे गोष्टी आठवतात.


"बरं झालं ना! लग्नाची तारीख थोडी उशिरा काढली. तेवढेच ताईला आपल्यासोबत जास्त दिवस राहता येईल."

पूर्वा आपल्या आईला म्हणाली.

"हो ना, एकदाचे लग्न होऊन मुलगी सासरी गेली की, ती पाहुणी होऊन जाते. पाहुण्यासारखे माहेरी येते व जाते. सासरच्या जबाबदाऱ्या पार पाडणे. सासरच्या लोकांच्या मर्जीप्रमाणे वागणे. यात स्वतःच्या मनाला काय हवे? याचा विचारही तिच्या मनात कधी येत नाही."

छायाताई असे बोलत असताना जणू आपलेच अनुभव सांगत आहेत.
इतक्या भावनिक होऊन त्या बोलत होत्या.

लग्न, माहेर, सासर म्हटले की प्रत्येक स्त्रीचे मन भरून येते. तिच्या मनातील अनेक आठवणींचा कप्पा उलगडत जातो.

तीन महिन्यानंतर लग्नाची तारीख ठरली म्हणून विनय मनातून थोडा नाराज झाला.

'लग्न करून स्मिता आपल्या घरी कधी येईल? आपली कधी होईल?'

असे त्याला वाटत होते.

'उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग'

अशी त्याची अवस्था झाली होती.

'काही वेळेस मनाला काय हवे? त्यापेक्षा सत्य परिस्थिती काय आहे? त्यानुसार वागावे लागते.
लग्न लवकर व्हावे, स्मिता लवकर घरी यावी. असे मनाला कितीही वाटत असले तरी लग्नाचा मुहूर्त, स्मिताची परीक्षा वगैरे गोष्टींचाही विचार केला पाहिजे.'

या विचाराने विनय मनाला शांत व आनंदी करण्याचा प्रयत्न करत होता.

स्मिताची अवस्थाही काहीशी अशीच होती.

विनयचे आपल्यावर खूप प्रेम आहे. हे स्मिताला समजत होते आणि लग्न तीन महिन्यांनी आहे. म्हणून तो थोडा नाराज झाला आहे. हे ही तिला जाणवत होते.

स्मिता स्वतःचा विचार करत होती पण त्याबरोबर तिला आईची काळजी वाटत होती. पूर्वाचाही विचार करत होती. तिच्या मनात खूप सारे विचार, खूप सारे प्रश्न होते.
अशा मनस्थितीत तिला परिक्षेचा अभ्यासही करावा लागत होता.
आणि
'पुढे काय होणार?'
हा प्रश्न तिच्या मनाला सारखा त्रास देत होता.

क्रमश:
नलिनी बहाळकर

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all