Login

लग्नगाठ भाग 11

About Love And Marriage
प्रेम, अफेअर वगैरे या गोष्टींवर विश्वास न ठेवणारी, अभ्यास व करिअर या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून सरळमार्गी जीवन जगणारी विद्या होती. पण आत्याच्या मुलीच्या लग्नात विनय भेटला आणि तिच्या मनात त्याच्याविषयी प्रेमाचा अंकुर फुटला. तिच्या सरळमार्गी आयुष्यात त्याच्या येण्याने ती एक वेगळाच अनुभव घेत होती. त्याच्याबरोबर भविष्यातील स्वप्ने पाहत होती.

विनयला व त्याच्या घरातील लोकांना स्मिता आवडली आणि तिच्याबरोबर विनयचे लग्न ठरले हे जेव्हा विद्याला कळाले, तेव्हा तिला खूप वाईट वाटले. तिच्या मनावर कुठेतरी जखम झालीच;पण नंतर तिने सत्यपरिस्थितीचा स्विकार केला.

विनयचा खरा आनंद स्मिताबरोबर लग्न करण्यात आहे. स्मिताचे सुखाचे आयुष्य आणि आपल्या परिवारातील सर्वांच्या सुखासाठी असलेली आपली जबाबदारी. याचा विचार करून तिने आपले मन पुन्हा अभ्यासात केंद्रीत करण्याचा प्रयत्न केला होता.

कॉलेज, होस्टेल असे पुन्हा सुरळीत सुरू झाले होते. होस्टेलला वेगवेगळ्या ठिकाणच्या मुली शिक्षणासाठी आलेल्या होत्या. होस्टेलला येण्यापूर्वी एकमेकींना त्या ओळखतही नव्हत्या. पण होस्टेलमध्ये आल्यानंतर सहवासातून एकमेकींचे विचार व स्वभाव जुळत गेले, एकमेकांच्या सुखदुःखाची विचारपूस होत गेली,
गप्पागोष्टी, मौजमजा या सर्वांतून मैत्रीचे छान नाते तयार होत गेले.


विद्याची व मीनलचीही अशी छान मैत्री झाली होती.


आपल्या क्लामधील राहुलबद्दल मीनल विद्याला लवकरच सांगणार होती; पण त्याअगोदरच सोनल व राहुलच्या चुकीच्या वागण्याने मीनल दु:खी व उदास झाली व तिने आपले दुःखी मन विद्याजवळ रडत मोकळे केले.


आपले मन जेव्हा खूप दुःखी होते तेव्हा मनातील दुःख आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगितले की मनाला बरे वाटते. सांत्वनाचे शब्द, मायेचा स्पर्श यामुळे दुःखी मनाचे ओझे थोडे हलके होते.


मीनलने जे सांगितले ते ऐकून विद्याला खूप वाईट वाटले.

मीनलचे रडणे थांबवत विद्या तिला समजावू लागली,

"सोनल व राहुलने असे करायला नको होते. तू दुःखी राहिली आणि तू अशी कितीही रडली तरी त्यांना आता काही फरक पडणार आहे का? राहुलचे जर तुझ्यावर खरंच प्रेम असते, तुझ्याशी त्याची खरी मैत्री असती तर... त्याने सोनलने तुझ्याबद्दल त्याला जे काही चुकीचे सांगितले तर त्याने अगोदर तुला त्याबद्दल विचारायला हवे होते ना? तिच्या बोलण्यावर कसा विश्वास ठेवला? सोनल जर तुझी खरी मैत्रीण असती तर तिने असे काही चुकीचे केले असते का? तिचे जर राहुलवर प्रेम होते तर तुझ्याबाबतीत तिला असे वागायची काय गरज होती?
तुला चुकीचे दाखवून ती स्वतः किती
चांगली हे दाखवण्याचा ती खोटा प्रयत्न करत आहे.

राहुलचे व तुझे प्रेम जर खरे असेल तर एक दिवस तुमचे प्रेम नक्कीच यशस्वी होईल. तुझे राहुलवर खरे प्रेम आहे म्हणून तुला इतका त्रास होतो आहे. पण आताची परिस्थिती पाहता, राहुल तुझ्याशी व्यवस्थित बोलत नाही, तुला टाळण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याच्या अशा वागण्याचा तुला त्रास होतो आहे.
तुझी मैत्रीण म्हणून मी हे सर्व समजू शकते.


मला वाटते थोडे दिवस जाऊ दे, तू थोडी शांत रहा किंवा एकदा त्याच्याशी शांतपणे बोलून घे. काही गैरसमज असतील तर दूर कर. आणि एवढे करूनही काही होणार नसेल तर त्याला विसरून जा. तुझ्या नशिबात तो नसेल असे समज आणि आपण इथे आपले करिअर घडविण्यासाठी आलो आहोत; त्यामुळे अभ्यासात लक्ष दे. इतर गोष्टीत पडून करिअर उध्वस्त करू नकोस."

क्रमश:

नलिनी बहाळकर



"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all