Login

लग्नगाठ भाग 13

About Love And Marriage
विद्याचा आनंदी चेहरा पाहत हर्षल तिच्या समोरच्या खुर्चीवर बसला व आनंदाने तिच्याशी बोलू लागला.

"मी पण मजेत आहे. कसा सुरू आहे तुझा अभ्यास?..."


हर्षल तिच्याशी बोलत होता तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव, बोलण्याचा स्वर आणि शब्दांची होणारी त्याची गडबड हे सर्व विद्या पाहत होती.

हर्षलला बोलायचे काही वेगळे आहे व तो बोलतो आहे काही वेगळेच! त्याच्या डोळ्यात वेगळ्याच भावना आहेत
.
हे विद्याच्या लक्षात येत होते.

"काय झाले हर्षल?"

विद्याने साशंकतेने हर्षलला विचारले.

"विद्या, तुला मी जे काही सांगणार आहे ते शांतपणे ऐक आणि मग तू बोल.
जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिले, तेव्हापासून तुझ्याबद्दल एक वेगळीच भावना माझ्या मनात निर्माण झाली. आणि नंतर जेव्हाही तू मला भेटत गेली, माझ्यासमोर आली..तेव्हा तुझ्या वागण्याबोलण्यातून तू मला अजून जास्त आवडू लागली. इतर मुलींपेक्षा तुझ्यात काहीतरी वेगळे असल्याचे फिलिंग नेहमीच माझ्या मनात येते. मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. आजपर्यंत तुला हे सर्व सांगण्याची संधी मिळाली नाही आणि माझ्यात तशी हिंमत नव्हती. असे म्हटले तरी चालेल. आज तू एकटी व शांत बसलेली दिसली. आज मी माझ्या मनाला आवरू शकलो नाही. त्यामुळे माझ्या मनातील भावनांना तुझ्यासमोर व्यक्त केले. तुलाही माझ्याबद्दल काय वाटते? ते सांग."


हर्षलचे बोलणे विद्या शांतपणे ऐकत होती. ऐकताना हर्षलविषयी आश्चर्याचे भाव तिच्या मनात येत होते. त्याच्या बोलण्यावर काय प्रतिक्रिया द्यावी? हे तिला सुचत नव्हते.

'काय बोलू?'
असा प्रश्न तिच्या मनात आला पण तेवढ्यात दीप्ती त्यांच्याकडे येताना तिला दिसली.

दीप्तीला पाहून तिला हायसे वाटले व मनातील टेन्शन जाऊन तिचा चेहरा आनंदाने खुलला. मनातून तिने दीप्तीचे व देवाचे आभारही मानले.

"काही सिरीयस विषयावर चर्चा सुरू आहे का? मी जाऊ का?"

दीप्तीने परिस्थितीचा अंदाज घेत विचारले.

"नाही गं, असे सिरीयस वगैरे काही नाही. नेहमीचा विषय आपला. अभ्यासाविषयी बोलत होतो. तू कशी आहेस?"

हर्षल दीप्तीला म्हणाला.

दीप्तीला काही वेगळे वाटू नये म्हणून हर्षल थोडा वेळ दीप्तीशी बोलला आणि नंतर तिथून चालला गेला.

आपल्या मनातील भावना विद्यासमोर व्यक्त केल्यामुळे हर्षलला मन हलके झाल्यासारखे वाटत होते. एकीकडे त्याच्या मनात विद्याचे उत्तर काय असेल? याविषयी उत्सुकता होती आणि दुसरीकडे पुढे काय होईल? या विचाराने त्याला थोडे टेन्शनही आले होते.

हर्षल तेथून गेल्यावर विद्या व दीप्ती दोघीही तो गेला त्या दिशेने पाहत होत्या. दोघांच्याही मनात विचार सुरू होते.


क्रमश:
नलिनी बहाळकर



"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all