Login

लग्नगाठ भाग 14

About Love And Marriage
हर्षल आपल्या मनातील भावना विद्याजवळ बोलून तिथून निघून गेला. विद्याने त्यावर काही प्रतिक्रिया दिली नाही. दीप्ती आल्यामुळे विद्या थोडी रिलॅक्स झाली आणि काही झालेच नाही असे दाखवत तिच्याशी नेहमीप्रमाणे छान गप्पा मारू लागली.

हर्षल व विद्यामध्ये काहीतरी सिरीयस विषयावर बोलणे सुरू होते. असे दीप्तीला आल्याबरोबर वाटत होते; पण हर्षल तिच्याशी छान मोकळेपणाने बोलला व विद्याही अगदी नॉर्मल वाटत होती त्यामुळे दीप्ती जास्त खोलात शिरली नाही आणि तीही मग विद्याशी छान गप्पा मारू लागली.

अभ्यास, प्रोजेक्ट आणि इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर विद्या दीप्तीला म्हणाली,

"कॉलेजला दोन-तीन दिवस सुट्टी आहे. मी घरी जाऊन येते. सर्वांची खूप आठवण येते आहे."

"जाऊन ये ना मग. आई-बाबांना व भावाला भेटून ये."

दीप्ती विद्याला म्हणाली.

"तू पण जाऊन ये ना घरी. तू तर किती दिवसापासून गेली नाही आहे घरी. तुला आठवण येत नाही का घराची?"

विद्या दीप्तीला म्हणाली.

"खरं सांगू का विद्या. मला ना घरी जावेसेच वाटत नाही. माझ्या आई-बाबांचे अजिबात पटत नाही. दोघांमध्ये सारखी भांडणे सुरू असतात. कोणाची बाजू घ्यावी? हेच मला समजत नाही. आईच्या बाजूने विचार केला की बाबा चुकीचे वाटतात आणि बाबांच्या बाजूने विचार केला की आई चुकीची वाटते. दोघांचे लग्न कसे झाले? माहित नाही. देवाने अशी कशी यांची लग्नगाठ बांधली? हा प्रश्न नेहमी माझ्या मनात येतो. निदान मी तरी यांच्या घरी जन्माला आली नसती तर बरे झाले असते. असे वाटते कधी कधी. तुझी किंवा इतरांची छान अशी फॅमिली पाहिली की मला तुमचा खरंच खूप हेवा वाटतो गं.
आमच्याकडे पैसा भरपूर आहे; पण सुख नाही. मी आई बाबांना अनेकदा खूप समजावून सांगितले,पण त्यांच्यावर काही परिणाम होत नाही. थोडे दिवस चांगले राहतात आणि मग पुन्हा मूळ पदावर येतात. त्यांच्या स्वभावामुळे त्यांना खूप त्रास होतो आहे आणि मलाही खूप त्रास होतो आहे. ते माझा विचारच करत नाही. अशा लोकांना देवाने मुलेच देऊ नये असे मला वाटते."

दीप्ती आपल्या मनातील भावना विद्याजवळ व्यक्त करत होती.

आपल्या मैत्रीणीचे दु:ख ऐकून विद्याला खूप वाईट वाटले.

"तुझ्या भावना, तुझे दु:ख मला समजते गं. होईल गं काहीतरी चांगले तुझ्या आयुष्यात. देवावर विश्वास ठेव."

दीप्तीच्या डोळ्यातील अश्रू पुसत विद्या तिला म्हणाली.

क्रमश:
नलिनी बहाळकर


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all