मनातील दुःख दीप्तीने विद्याला सांगितले. ते ऐकून विद्याला खूप वाईट वाटले.
'आई वडिलांच्या भांडणाचा मुलांवर खूप परिणाम होत असतो?
घरातील वातावरण चांगले असले की,मुले आनंदी राहतात व मुलांवर चांगले संस्कारही होतात.
पैशाने मिळणारे सर्व सुख दीप्तीकडे असूनही ती दुःखी आहे. कारण तिला जे सुख समाधान हवे ते मिळत नाही. घरात शांती, समाधान तिला कधी जाणवत नाही. त्यामुळे घरापेक्षा तिला होस्टेलला राहणे बरे वाटते.
दीप्तीच्या आईबाबांइतके आपले आईबाबा श्रीमंत नाही. पण आपले आईबाबा आपल्यावर खूप प्रेम करतात. आपली काळजी घेतात. आपल्या सुखासाठी कष्ट करतात. आपल्याला हवे नको ते पाहतात.
खरंच कुटुंबातील प्रेम व जिव्हाळा याचे महत्त्व पैशापेक्षा खूप जास्त असते.
दीप्तीप्रमाणे असे अनेक जण असतील. आपण त्यांच्या सुखासाठी देवाकडे प्रार्थना करू शकतो. एवढेच आपल्या हातात आहे.
दीप्तीप्रमाणे असे अनेक जण असतील. आपण त्यांच्या सुखासाठी देवाकडे प्रार्थना करू शकतो. एवढेच आपल्या हातात आहे.
आपल्याला चांगले आई बाबा मिळाले. खरंच आपण खूप भाग्यवान आहोत. त्यासाठी देवाचे खरंच खूप आभार.'
या विचाराने विद्याला खूप आनंद झाला आणि घरी जाऊन आई-बाबांना कधी एकदाची भेटू! असे तिला वाटू लागले.
दीप्तीच्या विचाराबरोबरच तिच्या मनात हर्षलचाही विचार येत होता.
हर्षलने सांगितलेले ऐकून विद्याला आश्चर्याचा धक्काच बसला होता.
हर्षलच्या मनात आपल्याविषयी प्रेमाची भावना असेल. असे तिला कधी वाटलेच नाही. हर्षल दिसायला एकदम हँडसम व अभ्यासातही हुशार आहे. वर्गातील बऱ्याच मुलींचा तो क्रश आहे. त्याने स्वतःहून आपल्याला प्रपोज केले. यावर विद्याचा विश्वासच बसत नव्हता.
इतर मुलींप्रमाणे विद्याला त्याच्याबद्दल प्रेम वगैरे असे काही वाटत नव्हते. अभ्यास,प्रोजेक्ट किंवा इतर काही कारणांसाठी त्याच्याशी तिचे बोलणे व्हायचे. त्याच्याशी खास अशी मैत्रीही झालेली नव्हती. फक्त एक क्लासमेट म्हणून ओळख होती एवढंच!
दिसायला सुंदर, अभ्यासात हुशार आणि वागण्याबोलण्यातून दिसून येणारे संस्कार आणि इतरांना मदत करण्याचा त्याचा स्वभाव. सर्व काही त्याच्या बाबतीत चांगलेच आहे. नाव ठेवावे, चुकीचे ठरवावे असे काही त्याच्यात नाहीच.
हर्षलविषयी एवढा विचार करण्याची विद्यावर पूर्वी कधी वेळ आली नव्हती. पण त्याने त्याचे मन व्यक्त केल्यावर विद्याचे मन त्याच्याविषयी विचार करू लागले.
त्याच्या प्रपोजला नकार देण्याचे निश्चित कारण काय द्यावे? हे समजत नव्हते आणि त्याच्या प्रेमाचा स्वीकार करायला मनात अजून तशी भावनाही नाही.
अशी द्विधा मनस्थिती विद्याची होती. आणि या मनस्थितीतच ती घरी गेली.
क्रमश:
नलिनी बहाळकर
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा