Login

लग्नगाठ भाग 16

About Love And Marriage
विद्याच्या मनात खूप सारे विचार होते. एकीकडे त्या विचारांनी तिचे मन अस्वस्थ होते आणि दुसरीकडे घरी जाण्याचा आनंदही तिला होत होता.
आणि त्या आनंदातच ती घरी पोहोचली.

आई बाबांना व भावाला भेटून तिला खूप आनंद झाला. त्यांनाही विद्याला भेटून खूप आनंद झाला.

आपण आल्याचा आई-बाबांना व अनिकेतला आनंद झाला आहे; पण त्यांना काहीतरी टेन्शन आहे. हे तिला जाणवले.

"आई,तू आणि बाबा टेन्शनमध्ये दिसत आहेत. काही झाले आहे का?"

विद्याकडून राहवले गेले नाही आणि तिला आईला विचारले.

"अगं, आपली स्मिता एका मुलासोबत पळून गेली. गावाकडून शेखर भाऊजींचा फोन आला होता यांना."

दुःखी स्वरात रेखाताई विद्याला म्हणाल्या.


ही बातमी ऐकताच विद्याला शॉकच बसला.

"काय! तू सांगते आहे ते खरे आहे का ?"

आश्चर्याच्या भावनेने विद्याने आईला विचारले.

"हे खोटे असते तर किती बरे झाले असते! पण दुर्दैवाने हे खरे आहे.

स्मिताने असे करायला नको होते. छाया वहिनींसाठी हा खूप मोठा धक्का आहे."

रेखाताई म्हणाल्या.

"फक्त काकूलाच नाही तर आपल्या सर्वांसाठी हा खूप मोठा धक्का आहे. स्मिताने असे का केले? कोण आहे तो मुलगा? काही कळाले का?"

विद्या म्हणाली.

"शेखर भाऊजींनी फोनवर जास्त काही सांगितले नाही. स्मिता एका मुलासोबत पळाली एवढेच सांगितले. मी आणि तुझे बाबा गावाला जात आहोत. तिथे गेल्यावर समजेल सर्व. आजीनेही खूप धसका घेतला या गोष्टीचा आणि आजारी पडली आहे."

रेखाताई म्हणाल्या.


"जाऊन या तुम्ही दोघे. मी आणि अनिकेत थांबतो इथे. तुम्ही तेथे गेले म्हणजे काकूलाही थोडे बरे वाटेल आणि आजीची काळजीही घेतली जाईल. स्मिताचे लग्न जिथे ठरले होते; आता तिकडच्या लोकांना काय सांगणार?"

विद्या म्हणाली.

"त्याविषयी अजून काही माहित नाही. गावी गेल्यावर समजेल."

रेखाताई म्हणाल्या.



होस्टेलवरून विद्या जेव्हा घरी यायची, तेव्हा घरात उत्सवाचे वातावरण असायचे. विद्याला आवडणारे पदार्थ बनवण्यात आई थकायची नाही. आवडीने सर्व बनवायची. बाबाही विद्याच्या आवडीचा खाऊ आणायचे. अनिकेतही शहाण्या लहान भावासारखा वागायचा. ताईने सांगितलेले सर्व काम आनंदाने करायचा.

असे आनंदाचे क्षण सोडून विद्याला पुन्हा होस्टेलला जाण्याची इच्छा नसायची.
पण यावेळी वातावरण थोडे वेगळे होते. मनातील दु:ख रेखाताई बोलून, रडून व्यक्त करत होत्या. पण अरूणराव शांत होते. जास्त काही बोलत नव्हते. खूप विचार करत होते. झालेल्या घटनेने त्यांनाही खूप दु:ख झाले होते.


क्रमश :

नलिनी बहाळकर



"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all