Login

लग्नगाठ भाग 17

About Love And Marriage
आई-बाबांची व अनिकेतची आठवण येत होती आणि कॉलेजलाही दोन-तीन दिवस सुट्टी होती. त्यामुळे विद्या होस्टेलवरून घरी आली होती. होस्टेलचे जेवण खाऊन कंटाळा आला होता. आता आईच्या हातचे जेवण खाण्यास मिळेल. आईबाबा व अनिकेत सोबत गप्पागोष्टी करू.
दोन, तीन दिवस त्यांच्यासोबत राहू. असे विद्याने ठरवले होते.

पण ठरवतो काही आणि होते काही वेगळेच!
असेच विद्याच्या बाबतीत झाले होते.

ती घरी आली आणि तिला अशी बातमी ऐकायला मिळाली.

अशा परिस्थितीत आईबाबांना गावी जाणे गरजेचे होते; त्यामुळे ते गावी गेले.


आपली मुलगी घरी आली आणि आपल्याला गावी जावी लागते आहे. याचेही त्यांना वाईट वाटत होते.

काही वेळेस भावनांपेक्षा कर्तव्य महत्त्वाचे असते.

या विचाराला अनुसरून त्यांनी गावी जाण्याचे ठरवले. आपली विद्या आपल्याला समजून घेईल. ती खूप समजूतदार आहे.

विद्याच्या आई-वडिलांना हे माहित होते. त्यामुळे ते गावी गेले.


आई बाबा गावी गेले. अनिकेत मित्रांबरोबर कामासाठी बाहेर गेला.

विद्या घरात एकटीच होती. घरात कामे बरीच होती ; पण काम करायला विद्याची इच्छा होत नव्हती.
मनात सारखे स्मिताचे विचार येत होते.


'स्मिता माझ्यापेक्षा फक्त चार महिन्यांनी मोठी. एकाच घरात लहानाचे मोठे झालो. एकत्र खाणे पिणे, शाळेत जाणे, अभ्यास करणे, खेळणे सर्व. खूप मजा यायची.

आवडणारी गोष्ट मिळावी म्हणून स्मिता हट्ट करायची, रडायची आणि काहीही करून ती मिळवायची.

स्मिता जितकी जिद्दी. तितकीच मी शांत होती. मिळेल त्यात खुश होणारी.

स्मिता एखाद्या वस्तूसाठी रडत असली की, मी माझ्या जवळची ती वस्तू तिला स्वतःहून द्यायची.

स्मितावर माझे खूप प्रेम होते. ती आनंदी दिसली की मलाही आनंद वाटायचा.

स्मिताचेही माझ्यावर खूप प्रेम होते. माझ्यासाठी इतरांशी ती भांडायची. माझ्या शांत स्वभावामुळे मी कोणाला काही उलट बोलत नव्हते, भांडण पण करत नव्हते. पण स्मिता नेहमी माझी बाजू घेत असायची.

स्मिताचे बाबा आम्ही लहान होतो तेव्हाच वारले. सर्व मुलांचे खूप लाड करायचे. खूप खाऊ आणायचे. खेळणीही खूप आणायचे. काका वारल्यानंतर काकूने आपल्या दोन्ही मुलींसाठी दुसरे लग्न केले नाही. त्यांनी आईची व वडिलांची अशा दोन्ही भूमिका पार पाडल्या. आपल्या संपूर्ण परिवाराचा काकूला खूप आधार होता. एकत्र राहत होतो तेव्हाही कुटुंबात प्रेम होते आणि बाबांची दुसऱ्या गावी बदली झाली. बदलीच्या गावी राहण्यास गेलो तेव्हाही कुटुंबातील प्रेम तसेच होते.
बाबा आपल्या कुटुंबाची जबाबदारी नेहमी पार पाडत असतात. आताही आईबाबा त्यासाठीच गावाला गेले आहेत. स्मिताचे लग्न ठरले. तिला सर्व काही चांगले मिळाले. याचा सर्वांना खूप आनंद झाला होता. पण स्मिताने असे का केले? तिने स्वतः तिच्या इच्छेने असे केले? की तिला कोणी प्रेमाच्या जाळ्यात फसवले?'


क्रमश:
नलिनी बहाळकर



"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all