स्मिता व तिच्या मैत्रिणीचा भाऊ यांचे एकमेकांवर प्रेम होते आणि ते दोघे पळून गेले.
ही गोष्ट दोन्ही कुटुंबासाठी धक्कादायक होती. ते असे काही करतील? असे कोणालाच वाटत नव्हते आणि त्यांचे प्रेम प्रकरण सुरू होते. हे कधी घरातील लोकांना जाणवले नाही.
घडलेल्या गोष्टीमुळे घराच्या आजूबाजूला राहणारे लोक, नातेवाईक हे सर्वजण उलटसुलट चर्चा करत होते.
'मुलगी काय करते? कुठे जाते? कोणाशी मैत्री करते? हे सर्व आईला माहीत असते. मुलीच्या मनातील आईला सर्व जाणवत असते. मग स्मिताच्या आईला तिच्या प्रेमाविषयी का जाणवले नाही? आईला व तिच्या बहिणीला सर्व माहित असेल. उगाच रडण्याचा व काही माहित नसण्याचा दिखावा करत आहेत.
स्मिताच्या मैत्रिणीला स्मिताच्या व आपल्या भावाच्या प्रेमाविषयी काहीतरी कळलेच असेल ना? तिची साथ असल्याशिवाय हे होऊ शकत नाही.
रडणे, शोधाशोध करणे हे सर्व नाटक आहे या सर्वांचे.'
रडणे, शोधाशोध करणे हे सर्व नाटक आहे या सर्वांचे.'
लोकांचे असे बोलणे कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षपणे दोन्ही घरातील लोकांना ऐकायला मिळत होते.
वहिनी तर खूप रडत होत्या.
' स्मिताने तिच्या मनात काय होते? ते एकदा तरी मला सांगायला हवे होते. काहीतरी मार्ग निघाला असता. तिने असे करायला नको होते. आई म्हणून मी कुठे चुकले का? माझे संस्कार, माझे प्रेम कुठे कमी पडले का? स्मिताने फक्त स्वतःचा विचार केला. माझा व पूर्वाचा विचार केलाच नाही. ती गेल्यावर आमचे काय होईल? निदान हा विचार तरी करायला हवा होता ना! नशिबाने किती चांगला मुलगा तिला भेटला होता! माणसेही खूप चांगली भेटली होती. सर्व काही चांगले होते. आयुष्यात पुढे सर्व सुख होते, आनंद होता. अशी आयुष्यातील सुखाची व आनंदाची वाट सोडून, स्मिताने पळून जाण्याचा निर्णय का घेतला? आणि आता सर्व होत्याचे नव्हते होऊन गेले. माझी तर आता जगण्याची इच्छाच राहिली नाही.'
या विचाराने खूप रडत होत्या.
आजी तर झालेल्या गोष्टीचा वहिनींनाच दोष होती. अगोदरच मुलगा नाही झाला म्हणून वहिनींना टोमणे मारणारी आजी, आता वहिनींना घालूनपाडून बोलत होती. पूर्वालाही उलटसुलट विचारत, तिच्या मनातले जाणून घेत होती. मोठी गेली पळून आता लहान ही जाईल कोणाबरोबर निघून. असे आजी म्हणत होती.
अगोदरच दुःखी असलेल्या वहिनी, आजीच्या कडू बोलण्याने व लोकांच्या टोमण्यांनी अजून दु:खी झाल्या होत्या.
क्रमश:
नलिनी बहाळकर
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा