मी, तुझे बाबा, शेखर काका व निशा काकू, आम्ही सर्वांनी वहिनींना खूप समजावले. त्यांच्या माहेरच्यांनीही धीराचे दोन शब्द सांगून त्यांना आधार दिला.
विनयच्या घरच्या मंडळींना फोन करून सर्व सांगितले. आणि झालेल्या गोष्टीसाठी त्यांची माफीही मागितली. स्मिताचे कोणा मुलावर प्रेम होते आणि ती त्याच्याबरोबर पळून गेली. ही गोष्ट त्यांच्यासाठी खूप धक्कादायक होती. कुठेतरी त्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोहचवणारी गोष्ट घडली होती.
'आपल्या विनयला खूप सुंदर व श्रीमंत घरातील मुलींची स्थळे आली होती. पण त्या दिवशी लग्नात स्मिता दिसली, सर्वांना आवडली आणि मग पुढे साखरपुडाही केला. तिचे अगोदरच कोणावर प्रेम वगैरे होते, तर लग्नाला तिने होकार का दिला? विनयच्या भावनांचा तरी विचार करायचा ना? साखरपुडा झाल्यानंतर लग्न मोडले म्हणजे समाजात नाचक्की होण्यासारखी गोष्ट आहे.
विनयमध्ये आणि आमच्या परिवारात काही प्रॉब्लेम नसताना, समाज आमच्याविषयी काहीही बोलायला कमी करणार नाही. लोक नको त्या अफवाही पसरवतील. यामुळे समाजात आमची किती बदनामी होणार आहे? विनयला कोण मुलगी देईल आता? विनयचे लग्न होईल का? चूक स्मिताची आणि शिक्षा विनयला होईल.'
विनयचे बाबा रागारागाने बोलत होते.
स्मिता पळून गेली हे सत्य होते पण आता पुढे काय? हा मोठा प्रश्न सर्वांसमोर उभा होता.
लग्न एक महिन्यांनी होते. या एक महिन्याच्या काळात एखादी मुलगी लक्षात आली तर तिचे विनयसोबत लग्न करण्याचे ठरले. बघू पुढे काय होते?
'जे पण होईल, ते चांगले होऊ दे. विनयला चांगली पत्नी मिळो व त्याचे आयुष्य सुखाचे होवो.' अशी सर्वजण देवाला प्रार्थना करीत होते.
तुला हॉस्टेलला जायचे होते आणि यांनाही शाळा होती, म्हणून आम्ही घरी आलो. पुढे फोनवर बोलणे सुरू राहीलच. तुझे बाबाही खूप दुखावले गेले आहेत. अगोदरच शांत असलेले तुझे बाबा या घटनेने अजून शांत राहू लागले आहेत. मनातले दुःख बोलतही नाही.
विद्या, तू या सर्व गोष्टींचे टेन्शन घेऊ नकोस. तुझ्या अभ्यासावर लक्ष दे. स्मितासारखे तू काही करणार नाही. याची खात्री आहे आम्हांला.
आपली मुले गुणी असली आणि त्यांनी आयुष्यात चांगले यश मिळवले, तर आई-बाबांना त्यांचा किती अभिमान असतो! कौतुकाने ते सर्वांना सांगत असतात व समाजात मान वर करून चालतात. पण मुलांनी काही चुकीचे केले, तर आई-बाबांना किती दुःख होते! समाजात बदनामी होते. मुलांच्या चुकीमुळे त्यांना इतरांचे ऐकून घ्यावे लागते.
स्मिताच्या वागण्याने वहिनींना किती त्रास होतो आहे. हे पाहिले आम्ही."
क्रमश:
नलिनी बहाळकर
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा