Login

लग्नगाठ भाग 27

About Love And Marriage
स्मिताचे लग्न, घरातील टेन्शन व विनयचे भविष्य या सर्व गोष्टींचा विचार विद्याने डोक्यातून काढून टाकला व ती हॉस्टेलला आली. नेहमीप्रमाणे अभ्यासात लक्ष देऊ लागली.

अशा परिस्थितीत मनाला व भावनांना नियंत्रित ठेवणे गरजेचे असते, नाहीतर अभ्यासात लक्ष लागत नाही. असे विद्याचे म्हणणे होते आणि त्याप्रमाणे ती वागत होती.


आई बाबांशी तिचे फोनवर बोलणे होत होते.

एकदा असेच आईशी फोनवर बोलत असताना तिला कळाले की,

विनयसाठी तिच्या निशा काकूच्या भावाच्या मुलीचा विषय सुरू आहे. विनयसाठी सर्व बाबतीत ती अनुरूप आहे. कोणाची काही हरकत नसेल आणि सर्व काही छान जुळले तर, ज्या तारखेला लग्न ठरले होते; त्या दिवशी त्या ठिकाणी लग्न होईल.

हे कळल्यावर विद्याने देवाला प्रार्थना केली, 'विनयच्या आयुष्यात सर्व काही चांगले होऊ दे.'

विनयच्या आयुष्यात काहीतरी चांगले होत आहे. यामुळे तिला खूप आनंद झाला.


पुढे सेमिस्टर एक्झाम होती. त्या अगोदर अभ्यासासाठी विद्याला सुट्टी होती आणि म्हणून ती घरी आली होती.

'आता घरी आईला कामात थोडी मदत करायची आणि फक्त अभ्यासच करायचा.'

असे ठरवून ती आनंदाने घरी आली होती.

घरातील वातावरण नेहमीप्रमाणे शांत होते.
आई-बाबा व अनिकेशी विद्याने गप्पा मारल्या. सर्वांना भेटून तिला बरे वाटले.

विद्या थोडी निवांत झाल्यावर,

तिचे बाबा तिला म्हणाले,

"विद्या, विनयसोबत तुझे लग्न ठरवले तर तू लग्न करशील का?"


"काय? माझे विनयबरोबर लग्न? कसे शक्य आहे? निशा काकूच्या भावाच्या मुलीसोबत विनयचे लग्न ठरत होते ना?"

बाबांनी विचारलेल्या प्रश्नावर विद्या आश्चर्याने म्हणाली.

" निशा काकूच्या भावाच्या मुलीसोबत विनयचे लग्न ठरत होते. दिसणे, शिक्षण इत्यादी गोष्टी पाहून जमण्यासारखे होते;पण त्यांची पत्रिका जुळत नव्हती. त्यामुळे पुढे काही ठरवलेच नाही.


विनयच्या घरातल्यांनीही एक दोन मुली पाहिल्यात. पण कुठे ना कुठे काही अडचण येतच होती.

लग्नासाठी बुक केलेला हॉल, बँड व इतर सर्व गोष्टी कॅन्सल करणार होते आणि नंतर काही महिन्यांनी ते लग्नाचे पाहणार होते.


पण आता शेवटचा पर्याय म्हणून आशा आत्यांच्या मिस्टरांनी तुझ्या नावाचा प्रस्ताव मांडला. आम्ही अजून हो किंवा नाही असे काही सांगितले नाही. तू हो म्हटली तरच पुढे ठरवू. नाहीतर हा विषय इथेच थांबवू."

बाबांनी विद्याचा विचार करत तिला सांगितले.

"आई व बाबा, मला थोडा वेळ द्या. मी विचार करून सांगते."

विद्या शांतपणे म्हणाली.

क्रमश:
नलिनी बहाळकर


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all