Login

लग्नगाठ भाग 28

About Love And Marriage
"बाबा, मला ती बाहुली घेऊन द्या ना. ती बाहुली मला खूप आवडली आहे."

स्मिता आपल्या बाबांकडे हट्ट करत होती.

मुलींचे लाड करणार्‍या, हट्ट पूर्ण करणाऱ्या बाबांनी स्मिताला लगेच ती बाहुली घेऊन दिली.

आपल्याला आवडलेली बाहुली आपल्याजवळ येताच स्मिता खूप खुश झाली.

"विद्या बेटा, तुला कोणती बाहुली आवडली गं?"

शरद काकांनी स्मिताच्या बाजूला शांतपणे उभे असलेल्या विद्याला विचारले.

एका सुंदर बाहुलीकडे बोट दाखवत विद्या आपल्या लाडक्या काकांना म्हणाली,

"काका, मला ही बाहुली आवडली."

शरद काकांनी ती बाहुली विद्याला घेऊन दिली. बाहुली मिळताच विद्याही खूप खुश झाली.


शरद काका घरातील सर्व मुलांचे खूप लाड करत होते. फिरायला घेऊन जात होते. भरपूर खाऊ आणत होते.

असेच एकदा मुलांना बाहेर फिरायला घेऊन गेले होते, तेव्हा स्मिताने बाहुलीसाठी हट्ट केला होता व त्यांनी नेहमीप्रमाणे तिचा तो हट्ट पूर्ण केला होता.




"विद्या, तुझी बाहुली मला दे ना खेळायला."


एके दिवशी खेळता खेळता स्मिता विद्याला म्हणाली.

स्मिता हट्टी होती तशी लहरीही होती. स्वतःच्या आनंदासाठी इतरांचा विचार करणारी नव्हती. स्वतःच्या मनाला वाटेल तसेच करणारी होती.

विद्या तितकीच शांत. इतरांच्या आनंदात आनंद मानणारी. मिळेल त्यात समाधानी असणारी.


विद्याने लगेच आपली बाहुली स्मिताला दिली.
व ती दुसऱ्या बाहुलीसोबत खेळू लागली.




काही दिवसांनी,

"विद्या, तुझी बाहुली घे. मला नको आहे. मी मामाकडे गेली होती तेव्हा मामाने मला नवीन आणि खूप सुंदर बाहुली घेऊन दिली."


लहानपणाची ही गोष्ट आठवत, विद्या विचार करू लागली.


'लहानपणापासून स्मिताला पाहिजे तसे, हवे तसे ती करत गेली. हवे ते मिळवत गेली. यात ती इतरांचा विचार कधीच करत नव्हती. फक्त स्वतःपुरता विचार करत होती.

आणि याउलट मी नेहमी दुसऱ्यांचा विचार करत होती. आपल्या मनाला काय वाटते? ते कधी मी व्यक्त करत नव्हती.


लहानपणी स्मिता नेहमी माझा खाऊ आणि माझी खेळणी घ्यायची आणि काही नाही आवडले किंवा तिला दुसरे काही मिळाले की माझी वस्तू मला परत करायची.

आणि आताही तसेच होते आहे.

विनय पहिल्याच भेटीत मला आवडला होता. त्याच्यावर मी प्रेम करू लागले होते. पण स्मिताच्या सुंदरतेने किंवा नशिबाने विनयच्या घरातल्यांना ती आवडली होती व विनयसोबत तिचे लग्नही होणार होते.



विनय आपला होणार नाही आणि जे होते आहे ते चांगलेच होणार आहे.

असे समजून मी अभ्यास व करियर यात रमून गेली होती.


पण पुन्हा फक्त आपल्याच आनंदाचा विचार करणाऱ्या, स्मिताने दुसऱ्या मुलासोबत पळून जाऊन सर्वांना दुःख दिले होते.

स्मिता तर आता आपल्या विश्वात आनंदी झाली असेल; पण इकडे आलेल्या प्रसंगातून कसा मार्ग काढावा? याचे टेन्शन सर्वांना आले होते.


क्रमश :

नलिनी बहाळकर


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all