Login

लग्नगाठ भाग 29

About Love And Marriage
"आई-बाबा, विनयबरोबर लग्न करायला मी तयार आहे."


विद्याने आई-बाबांना असे सांगतातच,

आनंदी चेहऱ्याने बाबा तिच्याकडे पाहतच राहिले आणि काहीशा नाराजीच्या भावनेने आई तिला म्हणाली,

"तू पूर्ण विचार करूनच निर्णय घेतला आहेस ना?"

"हो आई, मी पूर्ण विचारांती हा निर्णय घेतला आहे."

विद्या शांतपणे व ठामपणे म्हणाली.

"बघ रेखा, तुला म्हणालो होतो ना मी, आपली विद्या खरंच खूप समजूतदार आहे. परिस्थितीचा विचार करणारी आहे. माझ्या मनात होते तसाच तिने निर्णय घेतला आहे."

बाबा आईला म्हणाले.

"विनय खूप चांगला मुलगा आहे. घरातील माणसेही चांगले आहेत. सर्व काही चांगले आहे. जावई म्हणून मला विनय नक्कीच आवडला असता; पण आताची परिस्थिती पाहता मला हे योग्य वाटत नाही.

स्मिता दुसऱ्या मुलाबरोबर पळून गेली. लग्नाचे आता सर्व ठरलेले आहे आणि म्हणून आता नाईलाजाने माझ्या मुलीला तिथे देणे. हे माझ्या मनाला पटत नाही."


आईने मनातले बोलून दाखवले.

"अगं रेखा, जे काही झाले त्यात विनयची काही चूक आहे का? उलट त्याच्या मनाचा विचार कर ना तू. त्याला काय वाटत असेल?

जे झाले त्यातून चांगले शोधण्याचा प्रयत्न कर ना. फक्त साखरपुडा झाला होता ना? लग्न तर नव्हते झाले ना? आणि भविष्यात आपल्या विद्यासाठी आपण असाच मुलगा शोधला असता ना?"

बाबांनी आईला समजावून सांगितले.


बाबांच्या छान समजावून सांगण्याने, आईही आनंदाने या लग्नासाठी तयार झाली.

बाबांनी फोन करून छाया काकू, शेखर काका व दोन्ही आत्या या सर्वांना ही आनंदाची बातमी दिली. बातमी समजताच सर्वांना खूप आनंद झाला व विद्याला मनापासून त्यांनी धन्यवाद दिले आणि आशीर्वादही दिले.

"विद्या बेटा, तू खरंच खूप चांगली मुलगी आहेस. लहानपणी तू नेहमी स्मिताने केलेली चूक सावरून घ्यायची.


आणि आताही,

स्मितामुळे आम्हांला मान खाली घालावी लागली; पण तुझ्यामुळे आम्ही पुन्हा मान वर करू शकलो. तुझा अभिमान वाटतो आहे मला. तुझे खरंच खूप धन्यवाद. आयुष्यात तू नेहमी सुखी रहा."


छाया काकूंनी फोन करून आपल्या भावना व्यक्त केल्या.


सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद होता. सर्वांचे टेन्शन जाऊन लग्नाच्या तयारीसाठी सर्वांमध्ये उत्साह निर्माण झाला होता.



"अगं विद्या, उठ ना. अभ्यास करायला लवकर उठणार होती ना?"


आईच्या आवाजाने विद्याला जाग आली आणि आपण आता जे पाहिले ते स्वप्न होते. हे तिला समजले.


क्रमश:

नलिनी बहाळकर


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all